करिंथकर यांना दुसरं पत्र १०:१-१८
१० आता मी, पौल, तुमच्यामध्ये असताना दीनदुबळा,+ पण तुमच्यापासून दूर असताना कडकपणे वागणारा असा वाटत असलो,+ तरी ख्रिस्ताच्या सौम्यतेने आणि कृपेने+ मी तुम्हाला विनंती करतो.
२ मी आशा करतो, की तिकडे आल्यावर कडकपणे वागण्याची वेळ माझ्यावर येऊ नये. अर्थात, आम्ही जगाच्या रितीप्रमाणे वागतो असा आमच्याबद्दल विचार करणाऱ्या काहींविरुद्ध कदाचित मला कठोर पावलं उचलावी लागतील.
३ कारण आम्ही जरी जगामध्ये राहत असलो, तरी जगाप्रमाणे लढाई करत नाही.
४ कारण आमच्या लढाईची शस्त्रं जगातल्या शस्त्रांसारखी नाहीत.+ तर ती देवाकडून मिळालेली शक्तिशाली शस्त्रं आहेत.+ त्यांच्या मदतीने आम्ही भक्कम बुरुजांसारख्या असलेल्या गोष्टीही उलथून टाकू शकतो.
५ कारण, सर्व प्रकारचे तर्क-वितर्क आणि देवाच्या ज्ञानाच्या विरोधात उभी केलेली प्रत्येक गोष्ट आम्ही उलथून टाकतो+ आणि प्रत्येक विचाराला कैदी बनवून ख्रिस्ताच्या आज्ञा पाळायला लावतो.
६ आज्ञा न पाळणाऱ्या प्रत्येक माणसाला शिक्षा करायला आम्ही तयार आहोत.+ पण, आधी तुम्ही तुमचा आज्ञाधारकपणा पूर्णपणे सिद्ध करून दाखवा.
७ तुम्ही बाहेरचं रूप पाहून मत बनवता. आपण ख्रिस्ताचे आहोत असा जर एखाद्याला स्वतःबद्दल भरवसा असेल, तर त्याने एका गोष्टीचा पुन्हा विचार करावा. जितका तो ख्रिस्ताचा आहे, तितकेच आम्हीसुद्धा आहोत.
८ कारण प्रभूने, तुम्हाला खाली पाडायचा नाही, तर तुम्हाला प्रोत्साहन द्यायचा जो अधिकार आम्हाला दिला आहे,+ त्याबद्दल मी जरा जास्तच बढाई मारली, तरी मला लज्जित व्हावं लागणार नाही.
९ मी माझ्या पत्रांद्वारे तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे, असं समजू नका.
१० कारण काही जण म्हणतात: “त्याची पत्रं तर फार वजनदार आणि प्रभावी असतात. पण प्रत्यक्षात तो दुबळा आहे आणि त्याची भाषणं मुळीच ऐकण्यासारखी नसतात.”
११ असं म्हणणाऱ्या माणसाने हे लक्षात घ्यावं, की तुमच्यापासून दूर असताना पत्रात आम्ही जे काही म्हणतो,* ते प्रत्यक्ष तुमच्यामध्ये असताना आम्ही करूनही दाखवू.*+
१२ कारण स्वतःची शिफारस करणाऱ्यांमध्ये स्वतःला मोजण्याचं किंवा त्यांच्यासोबत आपली तुलना करण्याचं धाडस आम्ही करत नाही.+ असे लोक, जेव्हा स्वतःच्याच स्तरांप्रमाणे स्वतःला मापतात आणि स्वतःची तुलना स्वतःशीच करतात, तेव्हा ते किती बुद्धिहीन आहेत हे दाखवून देतात.+
१३ पण आम्हाला नेमून दिलेल्या मर्यादेपलीकडे आम्ही बढाई मारणार नाही. तर देवाने जे क्षेत्र आम्हाला मापून दिलं आहे,* त्याच्या मर्यादेत राहूनच आम्ही बढाई मारू; आणि त्या क्षेत्रात तुम्हीसुद्धा येता.+
१४ आम्ही तुमच्याकडे आलो, तेव्हा खरंतर आम्हाला नेमून दिलेल्या क्षेत्रापलीकडे आम्ही गेलो नाही. कारण, ख्रिस्ताचा आनंदाचा संदेश घेऊन आम्ही सगळ्यात आधी तुमच्याकडेच आलो होतो.+
१५ आम्हाला नेमून दिलेल्या मर्यादेपलीकडे जाऊन आम्ही दुसऱ्या कोणाच्या मेहनतीबद्दल बढाई मारत नाही. तर, जसजसा तुमचा विश्वास वाढत जाईल, तसतशी आमच्या क्षेत्रात आम्ही केलेल्या कार्याची प्रगती होत जाईल, अशी आम्हाला आशा आहे. मग आमचं कार्य वाढतच जाईल.
१६ हे यासाठी, की तुमच्यासोबत इतर देशांतही आम्ही आनंदाचा संदेश घोषित करावा आणि दुसऱ्या कोणाच्या क्षेत्रात अगोदरच झालेल्या कार्याबद्दल आम्ही बढाई मारू नये.
१७ “पण जो बढाई मारतो, त्याने यहोवाच्या* बाबतीत बढाई मारावी.”+
१८ कारण जो स्वतःची शिफारस करतो त्याला नाही,+ तर ज्याची शिफारस यहोवा* करतो, त्यालाच मान्य केलं जातं.+
तळटीपा
^ शब्दशः “कृतीतही असू.”
^ शब्दशः “शब्दात आम्ही जे आहोत.”
^ किंवा “मापून आम्हाला वाटून दिलं आहे.”