२ इतिहास ३३:१-२५

  • यहूदाचा राजा मनश्‍शे (१-९)

  • मनश्‍शेचा पश्‍चात्ताप (१०-१७)

  • मनश्‍शेचा मृत्यू (१८-२०)

  • यहूदाचा राजा आमोन (२१-२५)

३३  मनश्‍शे+ राजा बनला तेव्हा तो १२ वर्षांचा होता. आणि त्याने ५५ वर्षं यरुशलेममधून राज्य केलं.+ २  मनश्‍शेने यहोवाच्या नजरेत जे वाईट ते केलं. यहोवाने ज्या राष्ट्रांना इस्राएली लोकांमधून घालवून दिलं होतं, त्यांच्या घृणास्पद चालीरितींचं त्याने अनुसरण केलं.+ ३  त्याचे वडील हिज्कीया यांनी उपासनेची जी उच्च स्थानं* पाडून टाकली होती, ती त्याने पुन्हा बांधली.+ तसंच, त्याने बआल दैवतांसाठी वेदी बांधल्या आणि पूजेचे खांब* बनवले. त्याने आकाशातल्या सगळ्या सैन्याला नमन केलं आणि त्यांची उपासना केली.+ ४  यहोवा ज्या मंदिराबद्दल असं म्हणाला होता, की “यरुशलेम हे कायम माझ्या नावाने ओळखलं जाईल,”+ त्या यहोवाच्या मंदिरात त्याने वेदी बांधल्या.+ ५  तसंच, यहोवाच्या मंदिराच्या दोन्ही अंगणांत+ त्याने आकाशातल्या सगळ्या सैन्यासाठी वेदी बांधल्या. ६  मनश्‍शेने ‘हिन्‍नोम वंशजांच्या खोऱ्‍यात’+ आपल्या स्वतःच्या मुलांचा अग्नीत होम केला.*+ याशिवाय, त्याने जादूटोणा केला,+ शकुन पाहिले, भूतविद्येची कामं केली आणि भूतविद्या करणाऱ्‍यांना व ज्योतिष्यांना नेमलं.+ त्याने फार मोठ्या प्रमाणात यहोवाच्या नजेरत जे वाईट ते केलं आणि त्याचा क्रोध भडकवला. ७  तसंच, आपण बनवलेली कोरीव मूर्तीही त्याने खऱ्‍या देवाच्या मंदिरात ठेवली.+ देव या मंदिराविषयी दावीद आणि त्याचा मुलगा शलमोन यांना म्हणाला होता: “हे मंदिर, आणि इस्राएलच्या सर्व वंशांतून मी निवडलेलं यरुशलेम, कायम माझ्या नावाने ओळखलं जाईल.+ ८  आणि जो देश मी इस्राएली लोकांच्या पूर्वजांना दिला होता, त्यातून मी पुन्हा कधीही त्यांना बाहेर काढणार नाही. पण त्यासाठी त्यांनी माझ्या सगळ्या आज्ञांचं, म्हणजे मोशेद्वारे दिलेल्या संपूर्ण नियमशास्त्राचं, कायद्यांचं आणि न्याय-निर्णयांचं* काळजीपूर्वक पालन करणं गरजेचं आहे.” ९  मनश्‍शे यहूदाच्या आणि यरुशलेमच्या लोकांना बहकवत राहिला; यहोवाने ज्या राष्ट्रांचा इस्राएली लोकांसमोर सर्वनाश केला होता, त्यांच्यापेक्षाही जास्त वाईट कामं करायला लावून त्याने त्यांना बहकवलं.+ १०  यहोवा मनश्‍शेसोबत आणि त्याच्या लोकांसोबत बोलत राहिला, पण त्यांनी मुळीच लक्ष दिलं नाही.+ ११  म्हणून यहोवाने अश्‍शूरच्या राजांच्या सेनाधिकाऱ्‍यांना त्याच्यावर हल्ला करायला लावलं. त्यांनी मनश्‍शेला आकड्यांनी पकडलं* आणि त्याला तांब्याच्या बेड्या घालून बाबेलला नेलं. १२  आपल्या या दुःखाच्या काळात मनश्‍शेने त्याचा देव यहोवा याच्याकडे दयेची भीक मागितली. आणि तो त्याच्या पूर्वजांच्या देवासमोर फार नम्र बनला. १३  तो देवाला प्रार्थना करत राहिला. आणि देवाला त्याची दया आली. देवाने त्याची कृपेची विनंती ऐकून यरुशलेममध्ये त्याचं राज्यपद त्याला परत दिलं.+ तेव्हा मनश्‍शेला समजलं, की यहोवा हाच खरा देव आहे.+ १४  त्यानंतर, मनश्‍शेने दावीदपुरासाठी खोऱ्‍यात असलेल्या गीहोनच्या+ पश्‍चिमेकडे बाहेरून एक अतिशय उंच भिंत बांधली.+ ही भिंत ‘मासे फाटकापर्यंत,’+ आणि तिथून पुढे शहराला वळसा घालून ओफेलपर्यंत बांधण्यात आली.+ याशिवाय, त्याने यहूदातल्या सर्व तटबंदीच्या शहरांमध्ये सेनाधिकारी नेमले. १५  मग त्याने परक्या दैवतांच्या मूर्ती व यहोवाच्या मंदिरातल्या मूर्ती काढून शहराबाहेर फेकून दिल्या.+ यासोबतच, त्याने यहोवाच्या मंदिराच्या डोंगरावर आणि यरुशलेममध्ये ज्या वेदी बांधल्या होत्या+ त्याही काढून शहराबाहेर फेकून दिल्या. १६  त्याने यहोवाची वेदीसुद्धा दुरुस्त केली+ आणि तिच्यावर तो शांती-अर्पणं+ व आभाराची अर्पणं देऊ लागला.+ त्याने यहूदाच्या लोकांना इस्राएलचा देव यहोवा याची उपासना करायला सांगितलं. १७  लोक जरी आपला देव यहोवा यालाच बलिदानं अर्पण करत असले, तरी ते ही बलिदानं अजूनही उच्च स्थानांवर* देत होते. १८  मनश्‍शेबद्दलची बाकीची माहिती, म्हणजे त्याने देवाला केलेली प्रार्थना आणि इस्राएलचा देव यहोवा याच्या नावाने दृष्टान्त पाहणारे त्याच्याशी जे काही बोलले, ते सगळं इस्राएलच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिण्यात आलं आहे. १९  याशिवाय, त्याची प्रार्थना+ आणि ती कशा प्रकारे मान्य करण्यात आली याविषयीची माहिती; तसंच त्याने केलेली सगळी पापं व त्याचा अविश्‍वासूपणा+ यांविषयीची सर्व माहिती त्याच्या दृष्टान्त पाहणाऱ्‍यांच्या लिखाणांत नमूद आहे. यासोबतच, त्याने जिथे-जिथे उच्च स्थानं बांधली व पूजेचे खांब* उभे केले+ त्या ठिकाणांबद्दलची माहिती आणि नम्र होण्याआधी त्याने बनवलेल्या कोरीव मूर्तींबद्दलची माहितीसुद्धा त्या लिखाणांत नमूद आहे. २०  मग मनश्‍शेचा मृत्यू झाला* आणि त्यांनी त्याला त्याच्या राजमहालाजवळ दफन केलं. त्याच्यानंतर, त्याचा मुलगा आमोन हा राजा बनला.+ २१  आमोन+ राजा बनला तेव्हा तो २२ वर्षांचा होता. आणि त्याने दोन वर्षं यरुशलेममधून राज्य केलं.+ २२  आपले वडील मनश्‍शे यांच्याप्रमाणेच आमोन हा यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करत राहिला.+ मनश्‍शेने ज्या कोरीव मूर्ती बनवल्या होत्या, त्या सगळ्यांना आमोन बलिदानं अर्पण करत राहिला+ आणि त्यांची सेवा करत राहिला. २३  पण त्याचे वडील मनश्‍शे यांच्याप्रमाणे+ तो यहोवासमोर नम्र झाला नाही.+ उलट, त्याने आणखी जास्त पापं केली. २४  पुढे आमोनच्या सेवकांनी त्याच्याविरुद्ध कट रचून+ त्याच्याच महालात त्याला ठार मारलं. २५  पण देशातल्या लोकांनी आमोन राजाविरुद्ध कट रचणाऱ्‍या सगळ्यांना मारून टाकलं+ आणि त्याच्या जागी त्याचा मुलगा योशीया+ याला राजा बनवलं.

तळटीपा

शब्दशः “अग्नीतून पार केलं.”
किंवा कदाचित, “खड्ड्यांत पकडलं.”
शब्दशः “आपल्या पूर्वजांकडे जाऊन निजला.”