थेस्सलनीकाकर यांना पहिलं पत्र २:१-२०

  • थेस्सलनीका इथे पौलचं सेवाकार्य (१-१२)

  • थेस्सलनीकाकर देवाचं वचन स्वीकारतात (१३-१६)

  • पौलला थेस्सलनीकाच्या बांधवांना पाहण्याची तीव्र इच्छा (१७-२०)

 बांधवांनो, आम्ही तुम्हाला दिलेली भेट व्यर्थ ठरली नाही+ याची तुम्हाला स्वतःलाही नक्कीच जाणीव आहे. २  कारण तुम्हाला हे माहीत आहे, की फिलिप्पै इथे सुरुवातीला आमचा छळ झाला आणि आम्हाला वाईट वागणूक देण्यात आली.+ पण, इतका विरोध होत असूनही* तुम्हाला देवाबद्दलचा आनंदाचा संदेश सांगण्यासाठी आम्ही आमच्या देवाच्या मदतीने धैर्य एकवटलं.+ ३  कारण आम्ही तुम्हाला देत असलेली शिकवण ही असत्यातून किंवा वाईट हेतूंमधून उत्पन्‍न झालेली, किंवा फसवणुकीने दिलेली शिकवण नाही. ४  तर, आनंदाचा संदेश सांगण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवण्यासाठी देवाने स्वतः आम्हाला त्याची पसंती दिली आहे. म्हणून, आम्ही माणसांना खूश करण्यासाठी नाही, तर आमची मनं पारखणाऱ्‍या देवाला+ आनंदित करण्यासाठी बोलतो. ५  खरं पाहिलं, तर तुम्हाला हे माहीत आहे, की आम्ही कधीही कोणाची खोटी प्रशंसा केली नाही. किंवा लोभी हेतूने+ कधीही ढोंगीपणा केला नाही. देव स्वतः याचा साक्षी आहे! ६  तसंच, ख्रिस्ताचे प्रेषित या नात्याने खरंतर आम्ही तुम्हाला खर्चात पाडून तुमच्यावर ओझं बनू शकलो असतो.+ तरीही, आम्ही माणसांकडून, म्हणजे तुमच्याकडून किंवा इतरांकडूनही कधीच गौरव मिळवायचा प्रयत्न केला नाही. ७  उलट, अंगावर पाजणारी आई जशी स्वतःच्या मुलांची मायेने* काळजी घेते,* तसंच आम्हीही तुमच्याशी सौम्यतेने वागलो. ८  तुमच्याबद्दल जिव्हाळा वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला देवाबद्दलचा आनंदाचा संदेशच नाही, तर आमचा जीवही द्यायला तयार होतो,+ कारण तुम्ही आमच्यासाठी खूप प्रिय बनला होता.+ ९  बांधवांनो, आम्ही घेतलेली मेहनत आणि आमचे परिश्रम तुम्हाला नक्कीच आठवत असतील. तुम्हाला देवाबद्दलचा आनंदाचा संदेश सांगताना तुमच्यापैकी कोणालाही खर्चात पाडून तुमच्यावर ओझं बनू नये,+ म्हणून आम्ही रात्रंदिवस कष्ट केले. १०  विश्‍वास ठेवणाऱ्‍या तुम्हा सर्वांशी आम्ही किती एकनिष्ठ, नीतिमान आणि निर्दोष राहून वागलो, या बाबतीत तुम्ही स्वतः साक्षी आहात आणि देवसुद्धा आहे. ११  तुम्हाला हे चांगलं माहीत आहे, की पिता आपल्या मुलांना देतो, त्याप्रमाणे+ आम्ही कसं तुमच्यापैकी प्रत्येकाला सतत मार्गदर्शन देत राहिलो, तुमची समजूत काढत राहिलो आणि तुम्हाला प्रोत्साहन देत राहिलो.+ १२  ज्याने तुम्हाला आपल्या राज्यात+ आणि गौरवात+ सहभागी होण्यासाठी बोलावलं, त्या देवाच्या सेवकांना शोभेल असं तुम्ही नेहमी वागावं,+ म्हणून आम्ही असं केलं. १३  खरंतर, याच कारणामुळे आम्ही देवाचे सतत आभार मानतो.+ कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून देवाचं वचन ऐकलं, तेव्हा तुम्ही ते माणसांचं वचन म्हणून नाही, तर देवाचं वचन म्हणून स्वीकारलं; आणि ते खरोखर देवाचंच वचन आहे आणि तुम्हा विश्‍वास ठेवणाऱ्‍यांमध्ये कार्यही करत आहे. १४  कारण बांधवांनो, तुम्ही यहूदीयामध्ये ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असलेल्या देवाच्या मंडळ्यांचं अनुकरण केलं. त्यांना यहुद्यांच्या हातून ज्या गोष्टी सहन कराव्या लागत आहेत, त्याच गोष्टी तुम्हीही आपल्या स्वतःच्या देशातल्या लोकांच्या हातून सोसल्या.+ १५  त्या यहुद्यांनी तर प्रभू येशूला आणि संदेष्ट्यांना ठार मारलं+ आणि आमचाही छळ केला.+ शिवाय, ते देवाच्या इच्छेप्रमाणे वागत नाहीत, तर सगळ्या माणसांच्या हिताच्या विरोधात वागतात. १६  कारण विदेशी लोकांचं तारण व्हावं म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलतो, तेव्हा ते आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करतात.+ अशा रितीने, ते आपल्या पापाचं माप सतत भरत राहतात. पण शेवटी देवाचा क्रोध त्यांच्यावर आला आहे.+ १७  बांधवांनो, जेव्हा आम्ही फक्‍त थोड्या काळासाठी तुमच्यापासून दूर गेलो होतो* (मनाने नाही तर शरीराने), तेव्हा तुम्हाला भेटायच्या आमच्या तीव्र इच्छेमुळे आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष पाहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. १८  याच कारणासाठी आम्हाला तुमच्याकडे यायची इच्छा होती. मी, म्हणजे पौलने एकदा नाही, तर दोनदा प्रयत्न केला. पण सैतान आमच्या मार्गात आडवा आला. १९  कारण आपला प्रभू येशू याच्या उपस्थितीच्या वेळी आमची आशा, आनंद किंवा आमचा अभिमानाचा मुकुट शेवटी काय आहे? तुम्हीच नाही का?+ २०  खरोखर, तुम्हीच आमचा गौरव आणि आमचा आनंद आहात.

तळटीपा

किंवा कदाचित, “खूप संघर्ष करावा लागला तरीही.”
किंवा “कोमलतेने.”
किंवा “मुलांचा सांभाळ करते.”
किंवा “आपली थोड्या काळासाठी ताटातूट झाली होती.”