१ इतिहास २३:१-३२
२३ दावीद जेव्हा वृद्ध झाला आणि त्याचं आयुष्य संपत आलं, तेव्हा त्याने आपला मुलगा शलमोन याला इस्राएलचा राजा बनवलं.+
२ मग त्याने इस्राएलच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, याजकांना+ आणि लेव्यांना एकत्र जमवलं.+
३ ज्या लेव्यांचं वय ३० वर्षं आणि त्याहून जास्त होतं, त्या सर्वांना मोजण्यात आलं.+ त्यांची संख्या ३८,००० इतकी होती.
४ यांच्यापैकी २४,००० यहोवाच्या मंदिराच्या कामाची देखरेख करणारे होते आणि ६,००० अधिकारी व न्यायाधीश होते.+
५ तसंच ४,००० द्वारपाल होते,+ आणि आणखी ४,००० जण यहोवाच्या स्तुतीसाठी वाद्यं वाजवून गीत गायचे.+ या वाद्यांविषयी दावीद म्हणाला होता: “देवाची स्तुती करण्यासाठी मी ती बनवली आहेत.”
६ मग दावीदने गेर्षोन, कहाथ आणि मरारी या लेवीच्या मुलांची त्यांच्या घराण्यांनुसार,+ वेगवेगळ्या गटांत विभागणी केली.*+
७ गेर्षोनच्या घराण्यातले हे: लादान आणि शिमी.
८ लादानची तीन मुलं; प्रमुख असलेला यहीएल, जेथाम व योएल.+
९ आणि शिमीची तीन मुलं; शलोमोथ, हजीएल व हारान. हे सर्व लादानच्या घराण्यांचे प्रमुख होते.
१० आणि शिमीची चार मुलं; यहथ, जीना, यऊश व बरीया. ही सगळी शिमीची मुलं होती.
११ यहथ हा प्रमुख होता, तर त्याच्या खालोखाल जीजा हा होता. यऊश व बरीया यांना जास्त मुलं नव्हती. त्यामुळे या दोघांचं घराणं हे एकच घराणं म्हणून मोजण्यात आलं आणि त्यांच्यावर एकाच प्रकारची जबाबदारी सोपवण्यात आली.
१२ कहाथची चार मुलं ही: अम्राम, इसहार,+ हेब्रोन व उज्जियेल.+
१३ अम्रामला अहरोन+ आणि मोशे+ ही मुलं झाली. अहरोनला व त्याच्या मुलांना परमपवित्र स्थान पवित्र ठेवायला, यहोवासमोर बलिदानं अर्पण करायला, त्याची सेवा करायला आणि नेहमी त्याच्या नावाने लोकांना आशीर्वाद द्यायला+ कायमचं वेगळं करण्यात आलं होतं.+
१४ खऱ्या देवाचा माणूस मोशे याच्या मुलांना मात्र लेव्यांच्या वंशात मोजण्यात आलं.
१५ मोशेच्या मुलांची नावं गेर्षोम+ आणि अलियेजर+ अशी होती.
१६ गेर्षोमच्या मुलांपैकी शबुएल+ हा प्रमुख होता.
१७ अलियेजरच्या वंशजांपैकी रहब्याह+ हा प्रमुख होता; रहब्याहशिवाय त्याला आणखी मुलं नव्हती. रहब्याहला मात्र बरीच मुलं होती.
१८ इसहारच्या+ मुलांपैकी शलोमीथ+ हा प्रमुख होता.
१९ हेब्रोनची मुलं ही: प्रमुख असलेला यरीया, दुसरा अमऱ्या, तिसरा यहजिएल आणि चौथा यकमाम.+
२० उज्जियेलची+ मुलं ही: प्रमुख असलेला मीखा आणि दुसरा इश्शीया.
२१ मरारीची मुलं ही: महली आणि मूशी.+ महलीची मुलं एलाजार व कीश ही होती.
२२ एलाजारचा मृत्यू झाला; पण त्याला एकही मुलगा नव्हता, फक्त मुलीच होत्या. म्हणून त्यांच्या नातेवाइकांपैकी* असलेल्या कीशच्या मुलांनी त्यांच्याशी लग्न केलं.
२३ मूशीची तीन मुलं ही: महली, एदर आणि यरेमोथ.
२४ ही सर्व लेवीची मुलं असून त्यांची आपापल्या घराण्यांनुसार आणि घराण्यांच्या प्रमुखांनुसार नोंदणी करण्यात आली. ज्या लेव्यांचं वय २० वर्षं आणि त्याहून जास्त होतं, त्या सगळ्यांना मोजण्यात आलं आणि यहोवाच्या मंदिरात सेवा करण्यासाठी त्यांच्या नावांनुसार त्यांची नोंदणी करण्यात आली.
२५ कारण दावीद म्हणाला होता: “इस्राएलचा देव यहोवा याने आपल्या लोकांना शांती दिली आहे,+ आणि तो कायम यरुशलेममध्ये राहील.+
२६ आणि लेव्यांना उपासना मंडप व त्यात सेवेसाठी वापरलं जाणारं कोणतंही सामान उचलून न्यावं लागणार नाही.”+
२७ दावीदने दिलेल्या शेवटल्या सूचनांनुसार, २० वर्षं आणि त्याहून जास्त वय असलेल्या लेव्यांची संख्या मोजण्यात आली होती.
२८ ते यहोवाच्या मंदिरात सेवा करणाऱ्या अहरोनच्या मुलांना मदत करायचे.+ ते मंदिराच्या अंगणांची,+ जेवणाच्या खोल्यांची, प्रत्येक पवित्र वस्तू शुद्ध करण्याच्या कामाची आणि खऱ्या देवाच्या मंदिरात गरज असेल त्या सगळ्या कामांची देखरेख करायचे.
२९ तसंच, भाकरींच्या थप्प्या,*+ अन्नार्पणासाठी चांगलं पीठ, बेखमीर पापड्या,+ तेलात मळलेलं पीठ+ आणि तव्यावर भाजलेल्या भाकरी तयार करायला ते मदत करायचे. याशिवाय, ते सर्व गोष्टींचं वजन व मोजमाप करायलाही मदत करायचे.
३० त्यांना रोज सकाळी+ व संध्याकाळी+ यहोवाचे आभार मानायला आणि त्याची स्तुती करायला उभं राहावं लागायचं.
३१ तसंच, नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे शब्बाथाच्या दिवशी,+ नवचंद्राच्या दिवशी*+ व सणांच्या वेळी जेव्हा यहोवाला होमार्पणं वाहिली जायची,+ तेव्हा ते नेहमी यहोवासमोर हजर राहून अहरोनच्या मुलांना मदत करायचे.
३२ याशिवाय, ते भेटमंडप व पवित्र स्थान या बाबतींत असलेल्या आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायचे; तसंच, यहोवाच्या मंदिरात सेवा करणाऱ्या आपल्या भाऊबंदांना, म्हणजे अहरोनच्या मुलांनाही ते मदत करायचे.
तळटीपा
^ किंवा “संघटित केलं.”
^ शब्दशः “भाऊबंदांपैकी.”
^ म्हणजे, अर्पणाच्या भाकरी.
^ चंद्राची पहिली कोर दिसते तो दिवस.