स्तोत्रं ९०:१-१७
खऱ्या देवाचा सेवक मोशे+ याची प्रार्थना.
९० हे यहोवा, आमच्या सर्व पिढ्यांमध्ये तूच आमचं निवासस्थान* होतास.+
२ तू पर्वत उत्पन्न केले त्याच्या आधीपासून;आणि तू ही पृथ्वी, ही उपजाऊ जमीन निर्माण केलीस,+त्याच्याही आधीपासून तू आहेस;अनादिकाळापासून अनंतकाळापर्यंत* तूच देव आहेस.+
३ तू नाशवंत माणसाला मातीत परत पाठवतोस.
तू म्हणतोस: “मानवांनो, परत जा.”+
४ कारण तुझ्या दृष्टीने हजार वर्षं, कालच्या दिवसासारखी;+रात्रीच्या एका प्रहरासारखी आहेत.
५ तू क्षणात त्यांचा अंत करतोस;+ ते रात्रीच्या झोपेसारखे होतात;सकाळी, ते जमिनीतून उगवणाऱ्या गवतासारखे असतात.+
६ गवत सकाळी उगवतं आणि जोमाने वाढतं,पण संध्याकाळपर्यंत ते कोमेजतं आणि सुकून जातं.+
७ कारण तुझा क्रोध आम्हाला भस्म करतो;+तुझ्या संतापाने आम्ही भयभीत होतो.
८ आमचे अपराध तू तुझ्यापुढे ठेवतोस;*+तुझ्या चेहऱ्याच्या प्रकाशाने, आमच्या गुप्त गोष्टी उघड्या पडतात.+
९ तुझ्या क्रोधामुळे आमचे दिवस हळूहळू नाहीसे होत जातात*आणि आमची वर्षं सुसकाऱ्याप्रमाणे* लगेच संपून जातात.
१० आमचं आयुष्य ७० वर्षांचंआणि एखाद्याला खूप शक्ती असेल,* तर ८० वर्षांचं+ असतं.
पण ही सगळी वर्षं त्रासाने आणि दुःखाने भरलेली असतात;ती पाहता पाहता सरून जातात आणि आम्ही निघून जातो.+
११ तुझ्या रागात किती ताकद आहे हे कोण सांगू शकतं?
आणि तुझा क्रोध कोण जाणू शकतं?
जितका तुझा क्रोध मोठा आहे, तितकं आम्ही तुझं भय मानलं पाहिजे.+
१२ आयुष्याचे दिवस कसे मोजावेत हे आम्हाला शिकव,+म्हणजे आम्हाला सुज्ञ मन* उत्पन्न करता येईल.
१३ हे यहोवा, परत ये!+ हे असं कधीपर्यंत चालेल?+
तुझ्या सेवकांवर दया कर.+
१४ पहाटेच आम्हाला तुझ्या एकनिष्ठ प्रेमाने तृप्त कर,+म्हणजे आम्ही आयुष्यभर आनंदाने जयजयकार करू.+
१५ तू जितके दिवस आम्हाला दुःख सोसू दिलंसआणि जितकी वर्षं आम्ही संकटांचा सामना केला,+ तितकाच काळ तू आम्हाला आनंदी कर.+
१६ तुझ्या सेवकांना तुझी अद्भुत कार्यं पाहू दे,त्यांच्या मुलांना तुझा महिमा पाहू दे.+
१७ हे यहोवा, आमच्या देवा, आमच्यावर तुझी कृपा असू दे;आमच्या हाताच्या कार्यांना यश दे.*
हे देवा, आमच्या हाताच्या कार्यांना यश दे.*+
तळटीपा
^ किंवा कदाचित, “आमचा आश्रय.”
^ किंवा “सर्वकाळापासून सर्वकाळापर्यंत.”
^ किंवा “तुला आमचे अपराध माहीत आहेत.”
^ किंवा “दीर्घ श्वासाप्रमाणे.”
^ किंवा “आमचं जीवन सरून जातं.”
^ किंवा “असामान्य ताकद असेल.”
^ किंवा “बुद्धीने भरलेलं हृदय.”
^ किंवा “स्थापित कर.”
^ किंवा “स्थापित कर.”