स्तोत्रं ८६:१-१७

  • यहोवासारखा देव नाही

    • यहोवा क्षमाशील आहे ()

    • सगळी राष्ट्रं यहोवाची उपासना करतील ()

    • “मला तुझ्या मार्गाचं शिक्षण दे” (११)

    • “मला तुझ्या नावाचं मनापासून भय बाळगायला शिकव” (११)

दावीदची प्रार्थना. ८६  हे यहोवा, माझी प्रार्थना ऐक* आणि मला उत्तर दे,कारण मी असाहाय्य आणि गरीब आहे.+  २  माझ्या जिवाचं रक्षण कर, कारण मी एकनिष्ठ आहे.+ तुझ्यावर भरवसा ठेवणाऱ्‍या तुझ्या या सेवकाला वाचव,कारण तू माझा देव आहेस.+  ३  हे यहोवा, माझ्यावर कृपा कर+कारण मी दिवसभर तुला हाक मारतो.+  ४  हे यहोवा, तुझ्या या सेवकाला* आनंदी होऊ देकारण तुझ्याकडे माझे डोळे लागले आहेत.  ५  हे यहोवा, तू चांगला+ आणि क्षमाशील आहेस;+तुला हाक मारणाऱ्‍या सर्वांवर तुझं अपार प्रेम* आहे.+  ६  हे यहोवा, माझी प्रार्थना ऐक;आणि माझ्या मदतीच्या याचनांकडे लक्ष दे.+  ७  संकटाच्या दिवशी मी तुला हाक मारतो,+कारण तू मला नक्की उत्तर देशील.+  ८  हे यहोवा, देवांमध्ये तुझ्यासारखा कोणीही नाही.+ तुझ्यासारखी कार्यं करणारा दुसरा कोणीही नाही.+  ९  तू निर्माण केलेली सगळी राष्ट्रंतुझ्यापुढे येऊन तुला नमन करतील.+ हे यहोवा, ती तुझ्या नावाचा गौरव करतील.+ १०  कारण तू महान आणि अद्‌भुत गोष्टी करतोस;+तू, फक्‍त तूच देव आहेस.+ ११  हे यहोवा, मला तुझ्या मार्गाचं शिक्षण दे.+ मी तुझ्या सत्याच्या मार्गाने चालीन.+ मला तुझ्या नावाचं मनापासून* भय बाळगायला शिकव.+ १२  हे यहोवा, माझ्या देवा, मी अगदी पूर्ण मनाने+ तुझी स्तुती करतोआणि मी सर्वकाळ तुझ्या नावाचं गुणगान करीन. १३  कारण तू माझ्यावर भरभरून एकनिष्ठ प्रेम केलं आहेस;तू अगदी खोल कबरेतून* माझा जीव वाचवला आहेस.+ १४  हे देवा, गर्विष्ठ माणसं माझ्याविरुद्ध उठतात;+क्रूर माणसांची टोळी माझा जीव घ्यायला टपून बसली आहे,त्यांना तुझ्याबद्दल जराही आदर नाही.*+ १५  पण हे यहोवा, तू दयाळू आणि करुणामय* देव आहेस. तू सहनशील, एकनिष्ठ प्रेमाने भरलेला आणि विश्‍वासू देव आहेस.+ १६  माझ्याकडे लक्ष दे आणि माझ्यावर कृपा कर.+ तुझ्या या सेवकाला ताकद दे+आणि तुझ्या दासीच्या या मुलाला वाचव. १७  मला तुझ्या चांगुलपणाची एखादी खूण* दाखव,म्हणजे माझा द्वेष करणारे ती पाहून लज्जित होतील. कारण हे यहोवा, मला मदत करणारा आणि माझं सांत्वन करणारा तूच आहेस.

तळटीपा

किंवा “खाली वाकून ऐक.”
किंवा “तुझ्या या सेवकाचा जीव.”
किंवा “एकनिष्ठ प्रेम.”
किंवा “एकाग्र मनाने.”
हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.
किंवा “त्यांनी तुला आपल्यापुढे ठेवलं नाही.”
किंवा “कृपाळू.”
किंवा “पुरावा.”