स्तोत्रं ३९:१-१३
दावीदचं गीत. संचालकासाठी सूचना. यदूथून*+ याच्या चालीवर गायलं जावं.
३९ मी म्हणालो: “आपल्या जिभेने पाप करू नये+म्हणून मी सांभाळीन.
दुष्ट माणूस माझ्यासमोर असेपर्यंत,मी आपल्या तोंडाला लगाम घालीन.”*+
२ मी गप्प बसलो आणि शांत राहिलो;+चांगल्या गोष्टींबद्दलही बोललो नाही.
पण माझं दुःख असह्य झालं.
३ माझं हृदय आतल्या आत धुमसत होतं.*
मी विचार करू लागलो,* तेव्हा माझ्या मनात आग धगधगत होती.
मग मी म्हणालो:
४ “हे यहोवा माझं आयुष्य अगदी थोडं आहे;आणि मला मोजकेच दिवस देण्यात आले आहेत, हे ओळखायला मला मदत कर.+
माझं जीवन किती क्षणभंगुर* आहे हे मला कळू दे.
५ खरंच, तू मला अगदी थोडे दिवस* दिले आहेस;+माझा जीवनकाळ तुझ्यापुढे काहीच नाही.+
माणूस कितीही खंबीर वाटत असला, तरी तो नुसता श्वासासारखा आहे.+ (सेला )
६ खरंच, माणूस सावलीसारखा फिरत असतो.
तो उगाचच धावपळ* करत राहतो.
तो संपत्ती साठवतो, पण तिचा उपभोग कोण घेईल हे त्याला माहीत नसतं.+
७ हे यहोवा, मग मी कशाची आशा बाळगू?
तूच माझी एकमेव आशा आहेस.
८ माझ्या सगळ्या अपराधांपासून मला वाचव.+
मला तुच्छ लेखण्याची मूर्ख माणसाला संधी देऊ नकोस.
९ मी अबोल झालो;मला तोंड उघडता येईना,+कारण हे सर्व तू केलं होतंस.+
१० तू माझ्यावर आणलेली पीडा दूर कर.
तुझ्या हाताच्या तडाख्यांमुळे मी अगदी गळून गेलोय.
११ तू माणसाच्या अपराधाची शिक्षा देऊन त्याला सुधारतोस;+कपड्यांना जशी कसर लागते, तसा तू, त्याने साठवलेल्या मौल्यवान गोष्टी खाऊन टाकतोस.
खरंच, माणूस फक्त श्वासासारखा आहे.+ (सेला )
१२ हे यहोवा, माझी प्रार्थना ऐक.
माझी मदतीची याचना ऐक.+
माझ्या अश्रूंकडे दुर्लक्ष करू नकोस.
कारण माझ्या सर्व वाडवडिलांसारखाच मीही तुझ्यासमोर एखाद्या विदेश्यासारखा,+तात्पुरत्या आलेल्या एखाद्या प्रवाशासारखा* आहे.+
१३ माझा मृत्यू होऊन मी कायमचा निघून जाण्याआधी,तुझी निष्ठुर नजर माझ्यावरून हटव, म्हणजे मी आनंदी होईन.”
तळटीपा
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “आपलं मुस्कट बांधीन.”
^ शब्दशः “गरम झालं.”
^ किंवा “उसासे टाकत होतो.”
^ किंवा “कमी काळाचं.”
^ शब्दशः “चार बोटांची रुंदी.”
^ शब्दशः “गोंगाट.”
^ किंवा “परक्या माणसासारखा.”