स्तोत्रं २७:१-१४
दावीदचं गीत.
२७ यहोवा माझा प्रकाश+ आणि माझं तारण आहे.
मला कोणाची भीती?+
यहोवा माझ्या जिवाचं आश्रयस्थान* आहे.+
मला कोणाचं भय?
२ माझं मांस खाण्यासाठी दुष्टांनी माझ्यावर हल्ला केला,+पण माझे विरोधक आणि माझे शत्रू स्वतःच अडखळून पडले.
३ संपूर्ण सैन्याने जरी माझ्याविरुद्ध छावणी केली,तरीही माझं हृदय घाबरणार नाही.+
ते माझ्याशी युद्ध करायला आले,तरीही मी भरवसा ठेवीन.
४ मी यहोवाकडे एकच विनंती केली आहे;माझी एवढीच इच्छा आहे,की मी आयुष्यभर यहोवाच्या घरात राहावं,+म्हणजे मला यहोवाचा चांगुलपणा पाहता येईलआणि त्याच्या मंदिराकडे बघण्याचं* सुख मला मिळेल.+
५ कारण संकटाच्या दिवशी तो मला आपल्या आश्रयात लपवेल;+तो मला त्याच्या तंबूमध्ये, त्याच्या गुप्त ठिकाणी लपवेल;+तो मला उंच खडकावर ठेवेल.+
६ मला घेरणाऱ्या शत्रूंवर, मी आता वर्चस्व मिळवलंय;मी आनंदाने जल्लोष करत त्याच्या तंबूमध्ये बलिदानं अर्पण करीन;मी यहोवाची स्तुती गाईन.*
७ हे यहोवा, मी हाक मारीन तेव्हा माझं ऐक;+माझ्यावर कृपा कर आणि मला उत्तर दे.+
८ “मला शोधा,” या तुझ्या आज्ञेची आठवणमला माझं मन करून देतं;हे यहोवा, मी तुझा शोध घेईन.+
९ माझ्यापासून तोंड फिरवू नकोस.*+
आपल्या या सेवकाला रागाने घालवून देऊ नकोस.
तू माझा सहायक आहेस;+माझं तारण करणाऱ्या देवा, माझा त्याग करू नकोस, मला सोडू नकोस.
१० माझ्या स्वतःच्या आईवडिलांनी जरी मला सोडून दिलं,+तरी यहोवा मला जवळ घेईल.+
११ हे यहोवा, तुझा मार्ग मला शिकव,+माझ्या शत्रूंपासून वाचण्यासाठी मला सरळ मार्गाने ने.
१२ मला माझ्या विरोधकांच्या हाती देऊ नकोस,+कारण माझ्याविरुद्ध खोटे साक्षीदार उठले आहेत,+ते माझा घात करण्याच्या धमक्या देतात.
१३ मी जिवंतांच्या देशात यहोवाचा चांगुलपणा पाहीन, असा विश्वास मला नसता,तर आज मी कुठे असतो?*+
१४ यहोवावर आशा ठेव;+धैर्यवान हो आणि आपलं मन खंबीर कर.+
हो, यहोवावर आशा ठेव.
तळटीपा
^ किंवा “गड.”
^ किंवा “बघून मनन करण्याचं.”
^ किंवा “यहोवासाठी संगीत रचीन.”
^ शब्दशः “चेहरा लपवू नकोस.”
^ किंवा कदाचित, “जिवंतांच्या देशात मी यहोवाचा चांगुलपणा पाहीन, असा मला पूर्ण विश्वास आहे.”