स्तोत्रं १०९:१-३१
दावीदचं गीत. संचालकासाठी.
१०९ हे स्तुतिपात्र देवा,+ शांत राहू नकोस.
२ कारण दुष्ट आणि कपटी लोक माझ्याविरुद्ध बोलतात.
ते आपल्या जिभेने माझ्याबद्दल खोटं बोलतात.+
३ ते माझ्यावर द्वेषपूर्ण शब्दांचा भडिमार करतात,ते विनाकारण माझ्यावर हल्ला करतात.+
४ माझ्या प्रेमाच्या बदल्यात ते माझा विरोध करतात;+पण मी तुला प्रार्थना करत राहतो.
५ मी केलेल्या चांगल्याची परतफेड ते वाइटाने+आणि माझ्या प्रेमाची परतफेड ते द्वेषाने करतात.+
६ माझ्या शत्रूवर* एका दुष्ट माणसाला नियुक्त कर;त्याच्या उजव्या हाताला विरोधी* उभा राहो.
७ त्याचा न्याय होईल तेव्हा तो दोषी* ठरो;त्याची प्रार्थनाही पाप समजली जावो.+
८ त्याच्या आयुष्याचे दिवस कमी होवोत;+देखरेख करण्याची त्याची जबाबदारी दुसऱ्याला मिळो.+
९ त्याची मुलंबाळं* अनाथ होवोत,त्याची बायको विधवा होवो.
१० त्याची मुलं* भीक मागत वणवण फिरोत,आपल्या उद्ध्वस्त घरांमध्ये ती अन्न शोधत फिरोत.
११ त्याला कर्ज देणारा त्याच्याकडून सर्वकाही जप्त करो,*अनोळखी माणसं त्याची संपत्ती लुटून नेवोत.
१२ कोणीही त्याला दया* न दाखवो,त्याच्या अनाथ मुलांवर कोणीही कृपा न करो.
१३ त्याच्या वंशजांचा नाश होवो;+एकाच पिढीत त्यांचं नामोनिशाण मिटून जावो.
१४ यहोवा त्याच्या वाडवडिलांचे अपराध आठवणीत ठेवो,+त्याच्या आईचं पाप पुसलं न जावो.
१५ त्यांचे अपराध यहोवा नेहमी लक्षात ठेवो;तो पृथ्वीवरून त्यांची आठवण नाहीशी करो.+
१६ कारण त्याने दया* दाखवली नाही,+पण पीडित, गरीब आणि खचलेल्या मनाच्या माणसाला मारून टाकण्यासाठी,+तो त्याचा पाठलाग करत राहिला.+
१७ त्याला शाप द्यायला आवडायचं, म्हणून त्याच्यावर शाप आला;आशीर्वाद देण्याची त्याची इच्छा नव्हती, म्हणून त्यालाही आशीर्वाद मिळाला नाही.
१८ त्याने शापांचं वस्त्र घातलं होतं;त्याचे शाप त्याच्या शरीरात पाण्यासारखे ओतले गेलेआणि ते तेलासारखे त्याच्या हाडांत भिनले.
१९ त्याने पांघरलेल्या कपड्यांसारखे ते होवोत;+त्याने कंबरेला बांधलेल्या पट्ट्यासारखे ते होवोत.
२० माझा विरोध करणाऱ्यालाआणि माझ्याविरुद्ध वाईट गोष्टी बोलणाऱ्याला यहोवाकडून हाच मोबदला मिळेल.+
२१ पण हे सर्वोच्च प्रभू यहोवा,तुझ्या नावासाठी माझ्या वतीने कार्य कर.+
मला वाचव कारण तुझं एकनिष्ठ प्रेम चांगलं आहे.+
२२ मी असाहाय्य आणि गरीब आहे;+माझं हृदय घायाळ झालंय.+
२३ सावलीसारखा मी विरून चाललोय;टोळासारखं मला झटकून टाकण्यात आलंय.
२४ उपासामुळे माझे गुडघे लटपटत आहेत.
माझं शरीर कमजोर झालंय आणि मी खंगत चाललोय.
२५ ते मला सतत टोमणे मारतात.+
मला पाहून ते डोकं हलवतात.+
२६ हे यहोवा, माझ्या देवा, मला मदत कर.
तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे मला वाचव.
२७ हे तुझ्या हाताने घडून आलंय, हे त्यांना कळू दे;हे यहोवा, तूच माझं तारण केलंस हे त्यांना समजू दे.
२८ त्यांनी शाप दिला, तरी तू मला आशीर्वाद दे.
ते जरी माझ्याविरुद्ध उठले, तरी त्यांना लज्जित होऊ दे.
पण, तुझ्या या सेवकाला मात्र आनंदी होऊ दे.
२९ माझा विरोध करणाऱ्यांवर अपमानाचं वस्त्र पांघरलं जावं;त्यांना त्यांच्या लज्जेचा झगा घातला जावो.+
३० मी आपल्या तोंडाने यहोवाची भरभरून स्तुती करीन;मी पुष्कळ लोकांसमोर त्याचं गुणगान करीन.+
३१ कारण गरिबाला दोषी ठरवणाऱ्यापासून त्याला वाचवण्यासाठी,देव त्याच्या उजव्या हाताला उभा राहील.
तळटीपा
^ शब्दशः “त्याच्यावर.”
^ किंवा “दोष लावणारा.”
^ किंवा “दुष्ट.”
^ शब्दशः “पुत्र.”
^ शब्दशः “पुत्र.”
^ किंवा “लुबाडणूक करणारे त्याच्यासाठी सापळे रचोत.”
^ किंवा “एकनिष्ठ प्रेम.”
^ किंवा “एकनिष्ठ प्रेम.”