लूकने सांगितलेला संदेश ५:१-३९

  • चमत्कारिक रितीने पकडलेले मासे; पहिले शिष्य (१-११)

  • एका कुष्ठरोग्याला बरं केलं जातं (१२-१६)

  • लकवा मारलेल्या माणसाला येशू बरं करतो (१७-२६)

  • येशू लेवीला बोलावतो (२७-३२)

  • उपास करण्याबद्दल प्रश्‍न (३३-३९)

 एकदा येशू गनेसरेतच्या सरोवराजवळ*+ देवाचं वचन शिकवत असताना लोकांचा समुदाय त्याच्याभोवती गर्दी करू लागला. २  तेव्हा, किनाऱ्‍याला लावलेल्या दोन नावा त्याला दिसल्या. कोळी त्या नावांतून उतरून आपली जाळी धूत होते.+ ३  त्यांतल्या एका नावेत म्हणजे शिमोनच्या नावेत तो चढला आणि त्याने शिमोनला नाव किनाऱ्‍यापासून थोडी आत न्यायला सांगितली. मग, तो नावेत बसून लोकांच्या समुदायाला शिकवू लागला. ४  त्याचं बोलणं संपल्यावर तो शिमोनला म्हणाला: “पाणी जिथे खोल आहे तिथे नाव ने आणि मासे धरण्यासाठी आपली जाळी पाण्यात सोड.” ५  पण शिमोन त्याला म्हणाला: “गुरू, आम्ही रात्रभर कष्ट केले, पण काहीच हाती लागलं नाही.+ तरी, तू म्हणतोस म्हणून मी जाळी पाण्यात सोडतो.” ६  त्यांनी तसं केलं तेव्हा भरपूर मासे जाळ्यांत आले. इतके, की त्यांची जाळी फाटू लागली.+ ७  त्यामुळे, त्यांनी दुसऱ्‍या नावेतल्या आपल्या साथीदारांना इशारा करून मदतीसाठी बोलावलं. तेव्हा, ते आले आणि दोन्ही नावा माशांनी इतक्या भरल्या की त्या बुडू लागल्या. ८  हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला: “हे प्रभू, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी माणूस आहे.” ९  इतके मासे पाहून त्याला आणि त्याच्यासोबत असलेल्यांना आश्‍चर्याचा धक्का बसला. १०  तसंच, शिमोनच्या व्यापारात भागीदार असलेली जब्दीची मुलं, याकोब आणि योहान+ यांचीही तीच अवस्था होती. पण येशू शिमोनला म्हणाला: “घाबरू नकोस. कारण आतापासून तू जिवंत माणसं धरणारा होशील.”+ ११  मग त्यांनी आपल्या नावा पुन्हा किनाऱ्‍यावर आणल्या आणि सगळं काही सोडून ते त्याच्यामागे चालू लागले.+ १२  नंतर, येशू एका शहरात असताना, कुष्ठरोगाने भरलेला एक माणूस तिथे होता. येशूला पाहताच, तो पालथा पडला आणि गयावया करू लागला: “प्रभू, तुमची इच्छा असेल, तर तुम्ही मला शुद्ध करू शकता.”+ १३  तेव्हा त्याने आपला हात पुढे करून त्याला स्पर्श केला आणि म्हणाला: “माझी इच्छा आहे! शुद्ध हो.” आणि त्याच क्षणी त्याचा कुष्ठरोग नाहीसा झाला.+ १४  मग याबद्दल कोणालाही सांगू नकोस असं बजावून येशू त्याला म्हणाला: “तर जा, आणि याजकाकडे जाऊन स्वतःला दाखव. आणि त्यांना साक्ष मिळावी म्हणून शुद्ध होण्यासाठी मोशेने सांगितलेलं अर्पण दे.”+ १५  तरीही येशूबद्दलची बातमी दूरपर्यंत पसरत गेली. लोक त्याचं ऐकण्यासाठी आणि आपले रोग बरे करून घेण्यासाठी मोठ्या संख्येने त्याच्याकडे यायचे.+ १६  पण येशू बऱ्‍याचदा वेळ काढून एकांत ठिकाणी प्रार्थना करायला जायचा. १७  एकदा, येशू लोकांना शिकवत होता आणि रोग्यांना बरं करायची यहोवाने* दिलेली शक्‍ती त्याच्याजवळ होती. त्या वेळी, गालील आणि यहूदीयाच्या प्रत्येक गावातून आणि यरुशलेमहून आलेले परूशी* आणि नियमशास्त्राचे शिक्षकही तिथे बसले होते.+ १८  इतक्यात, काही जण लकवा मारलेल्या एका माणसाला खाटेवर घेऊन आले. ते त्याला आत आणून येशूच्या समोर ठेवायचा प्रयत्न करू लागले.+ १९  पण लोकांच्या गर्दीमुळे त्याला आत नेणं शक्य नव्हतं. म्हणून ते घराच्या छतावर चढले आणि कौलं काढून त्यांनी त्याची खाट लोकांच्या गर्दीत येशूच्या समोर खाली सोडली. २०  त्यांचा विश्‍वास पाहून येशू म्हणाला: “मित्रा, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”+ २१  तेव्हा शास्त्री आणि परूशी असा विचार करू लागले: “देवाची निंदा करणारा हा कोण आहे? कारण पापांची क्षमा देवाशिवाय कोणीच करू शकत नाही.”+ २२  पण त्यांच्या मनातले विचार ओळखून येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही काय विचार करताय? २३  ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ असं म्हणणं जास्त सोपं आहे, की ‘ऊठ आणि चालायला लाग,’ असं म्हणणं जास्त सोपं आहे? २४  पण मनुष्याच्या मुलाला पृथ्वीवर पापांची क्षमा करायचा अधिकार आहे हे तुम्हाला कळावं म्हणून . . . . ” मग लकवा मारलेल्या माणसाला तो म्हणाला: “मी तुला सांगतो, ऊठ, आपली खाट उचल आणि घरी जा.”+ २५  तेव्हा तो त्यांच्यासमोर उठून उभा राहिला आणि ज्या खाटेवर तो झोपला होता ती उचलून तो देवाचा गौरव करत आपल्या घरी गेला. २६  हे पाहून सगळे थक्क झाले. ते देवाचा गौरव करू लागले आणि भयभीत होऊन म्हणू लागले: “आज आम्ही अद्‌भुत गोष्टी पाहिल्या आहेत!” २७  त्यानंतर येशू बाहेर गेला, तेव्हा कर गोळा करणारा लेवी, जकात नाक्यावर बसलेला त्याला दिसला. येशू त्याला म्हणाला: “माझ्यामागे ये आणि माझा शिष्य हो.”+ २८  तेव्हा तो उठला आणि सगळं काही सोडून त्याच्यामागे चालू लागला. २९  मग लेवीने आपल्या घरी त्याच्यासाठी एक मोठी मेजवानी दिली. जकातदार आणि इतर बरेच लोकही त्यांच्यासोबत जेवायला बसले होते.+ ३०  तेव्हा परूशी आणि त्यांचे शास्त्री येशूच्या शिष्यांजवळ अशी कुरकुर करू लागले: “तुम्ही जकातदारांसोबत आणि पापी लोकांसोबत का खातापिता?”+ ३१  त्यावर येशूने त्यांना उत्तर दिलं: “जे निरोगी असतात त्यांना वैद्याची गरज नसते, तर आजाऱ्‍यांना असते.+ ३२  मी नीतिमान लोकांना नाही, तर पापी लोकांना पश्‍चात्तापासाठी बोलवायला आलोय.”+ ३३  ते त्याला म्हणाले: “योहानचे शिष्य वारंवार उपास आणि याचना करतात आणि परूश्‍यांचे शिष्यही तसंच करतात, पण तुमचे शिष्य मात्र खातपीत असतात.”+ ३४  येशू त्यांना म्हणाला: “नवरा मुलगा सोबत असेपर्यंत तुम्ही त्याच्या मित्रांना उपास करायला लावू शकत नाही, लावू शकता का? ३५  पण असे दिवस येतील जेव्हा नवऱ्‍या मुलाला+ त्यांच्यापासून दूर केलं जाईल. मग त्या दिवसांत ते उपास करतील.”+ ३६  येशूने त्यांना एक उदाहरणही दिलं: “कोणीही नवीन झग्याचा तुकडा कापून जुन्या झग्याला लावत नाही. कारण असं केलं, तर तो तुकडा फाटून जाईल. शिवाय, नवीन झग्याचं कापड जुन्या झग्याशी जुळणार नाही.+ ३७  तसंच, कोणीही जुन्या बुधल्यांमध्ये* नवीन द्राक्षारस भरत नाही. कारण तसं केलं, तर नव्या द्राक्षारसामुळे बुधल्या फाटून द्राक्षारस सांडेल आणि बुधल्या खराब होतील. ३८  त्यामुळे नवीन द्राक्षारस नव्या बुधल्यांमध्येच भरावा. ३९  जुना द्राक्षारस प्यायल्यानंतर कोणालाही नवा द्राक्षारस नको असतो, कारण ‘जुनाच चांगला,’ असं तो म्हणतो.”

तळटीपा

म्हणजे, गालील समुद्र.
अति. क५ पाहा.
प्राण्यांच्या कातडीपासून बनवलेल्या पिशव्या. शब्दार्थसूची पाहा.