रोमकर यांना पत्र १५:१-३३
१५ पण विश्वासात मजबूत असलेले आपण, मजबूत नसलेल्यांच्या कमजोरपणाचा भार वाहिला पाहिजे.+ आपण फक्त स्वतःच्याच सुखाचा विचार करू नये,+
२ तर आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याला मजबूत करण्यासाठी, त्याचं भलं करून त्याच्या सुखाचा विचार केला पाहिजे.+
३ कारण ख्रिस्तानेही स्वतःच्या सुखाचा विचार केला नाही,+ तर त्याच्याबद्दल असं लिहिण्यात आलं आहे: “तुझी निंदा करणाऱ्यांनी केलेली निंदा माझ्यावर आली आहे.”+
४ आधीपासूनच लिहून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी, आपल्याला शिक्षण देण्यासाठी लिहून ठेवण्यात आल्या होत्या.+ या शास्त्रवचनांमुळे आपल्याला आशा मिळते, कारण ती आपल्याला धीर धरायला+ मदत करतात आणि सांत्वन देतात.+
५ तर आता धीर आणि सांत्वन देणारा देव तुम्हा सगळ्यांना ख्रिस्त येशूसारखी मनोवृत्ती बाळगायला मदत करो.
६ हे यासाठी, की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता याचा तुम्ही एकजुटीने+ आणि एका आवाजात गौरव करावा.
७ त्यामुळे, देवाचा गौरव करण्यासाठी ख्रिस्ताने जसा तुमचा स्वीकार* केला,+ तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा.+
८ कारण मी तुम्हाला सांगतो, देव खरा आहे हे दाखवून देण्यासाठी ख्रिस्त सुंता झालेल्यांचा सेवक बनला.+ हे यासाठी, की देवाने त्यांच्या पूर्वजांना दिलेली अभिवचनं भरवशालायक ठरावीत+
९ आणि विदेशी राष्ट्रांनी त्यांना दाखवण्यात आलेल्या दयेमुळे देवाचा गौरव करावा.+ जसं शास्त्रात लिहिलं आहे: “म्हणून विदेशी राष्ट्रांमध्ये मी उघडपणे तुझा महिमा करीन आणि तुझ्या नावाची स्तुतीगीतं गाईन.”+
१० आणि पुन्हा असं म्हटलं आहे: “राष्ट्रांनो, त्याच्या लोकांसोबत आनंदी व्हा.”+
११ आणि परत असं म्हटलं आहे: “सर्व राष्ट्रांनो, यहोवाची* स्तुती करा, आणि सर्व लोक त्याची स्तुती करोत.”+
१२ तसंच, यशयासुद्धा म्हणतो: “इशायच्या मुळाला अंकुर फुटेल;+ तो राष्ट्रांवर राज्य करायला उभा राहील;+ राष्ट्रा-राष्ट्रांतले लोक त्याच्यावर आशा ठेवतील.”+
१३ तुम्ही आशा देणाऱ्या देवावर भरवसा ठेवत असल्यामुळे, तो तुम्हाला भरपूर आनंद आणि शांती देवो; म्हणजे पवित्र शक्तीच्या* सामर्थ्याने तुमची आशा वाढत जाईल.*+
१४ बांधवांनो, तुम्ही चांगुलपणाने आणि ज्ञानाने भरलेले असून एकमेकांना शिकवण्यासाठी समर्थ आहात याची मला खातरी आहे.
१५ तरीसुद्धा, काही गोष्टींची तुम्हाला पुन्हा आठवण करून देण्यासाठी, मी देवाकडून मिळालेल्या अपार कृपेने त्यांबद्दल अगदी स्पष्टपणे लिहिलं आहे.
१६ मी विदेशी राष्ट्रांसाठी ख्रिस्त येशूचा जनसेवक व्हावं,+ म्हणून मला ही कृपा दाखवण्यात आली. या विदेशी राष्ट्रांनी स्वतः पवित्र शक्तीने पवित्र केलेलं आणि देवाला स्वीकारयोग्य अर्पण असं ठरावं, म्हणून मी देवाचा आनंदाचा संदेश सांगण्याचं पवित्र कार्य करत आहे.+
१७ त्यामुळे माझ्याकडे देवाच्या गोष्टींवरून ख्रिस्त येशूमध्ये आनंदी होण्याचं कारण आहे.
१८ विदेशी राष्ट्रांनी आज्ञा पाळाव्यात म्हणून ख्रिस्ताने माझ्याद्वारे जी कार्यं केली, त्यांशिवाय आणखी कशाबद्दलही बोलायचं मी धाडस करणार नाही. त्याने माझ्या शब्दांद्वारे आणि कार्यांद्वारे,
१९ चिन्हांद्वारे आणि चमत्कारांद्वारे+ आणि पवित्र शक्तीच्या सामर्थ्याद्वारे असं केलं. मी यरुशलेमपासून ते इल्लूरिकमपर्यंत ख्रिस्ताबद्दलचा आनंदाचा संदेश सांगायचं कार्य पूर्ण केलं आहे.+
२० पण दुसऱ्याने रचलेल्या पायावर मी बांधकाम करू नये, म्हणून ज्या ठिकाणी ख्रिस्ताचं नाव आधीच सांगण्यात आलं होतं, तिथे आनंदाचा संदेश सांगायचं मी मुद्दामहून टाळलं.
२१ पण जसं लिहिण्यात आलं त्याप्रमाणे मी केलं: “ज्यांना त्याच्याबद्दल कधीच सांगण्यात आलं नाही, ते पाहतील आणि ज्यांनी ऐकलं नाही त्यांना समजेल.”+
२२ म्हणूनच कित्येकदा तुमच्याकडे यायचं ठरवूनही मी येऊ शकलो नाही.
२३ पण आता, मी प्रचार केला नाही असं एकही क्षेत्र या प्रदेशांत उरलं नाही. शिवाय, बऱ्याच* वर्षांपासून मी तुम्हाला भेटायला आतुर आहे.
२४ त्यामुळे, मी जेव्हा स्पेनला जायला निघेन, तेव्हा वाटेत तुम्हाला भेटून तुमच्यासोबत थोडा वेळ घालवीन. आणि मग काही अंतरापर्यंत तुम्ही माझ्यासोबत येऊन मला निरोप द्याल, अशी मी आशा करतो.
२५ पण आता मी पवित्र जनांची सेवा करण्यासाठी यरुशलेमला जायला निघणार आहे.+
२६ कारण यरुशलेममध्ये असलेल्या पवित्र जनांतल्या गरिबांना मदत करण्यासाठी, मासेदोनिया आणि अखया इथल्या बांधवांनी स्वेच्छेने दान दिलं आहे.+
२७ हे नक्कीच त्यांनी आनंदाने केलं; खरंतर, ते त्यांचे ऋणी* होते. कारण जर विदेशी राष्ट्रांना या पवित्र जनांसोबत आशीर्वाद मिळाले, तर त्यांच्या रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करणं हे त्यांचं कर्तव्यच आहे.+
२८ त्यामुळे, हे काम पूर्ण केल्यावर आणि हे दान* सुरक्षितपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यावर मी तुमच्याकडे येऊनच स्पेनला जाईन.
२९ शिवाय, मला माहीत आहे, की तुमच्याकडे येताना मी ख्रिस्ताचे भरपूर आशीर्वाद घेऊन येईन.
३० आता बांधवांनो, मी आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर असलेल्या विश्वासाद्वारे आणि पवित्र शक्तीने उत्पन्न होणाऱ्या प्रेमाद्वारे तुम्हाला अशी विनंती करतो, की माझ्याप्रमाणेच तुम्हीसुद्धा माझ्यासाठी देवाकडे कळकळून प्रार्थना करावी.+
३१ यहूदीयातल्या विश्वास न ठेवणाऱ्यांच्या तावडीत मी सापडू नये+ आणि यरुशलेममधल्या पवित्र जनांनी माझी सेवा स्वीकारावी म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करा.+
३२ म्हणजे देवाची इच्छा असली, तर मी आनंदाने तुमच्याकडे येईन आणि आपण एकमेकांना प्रोत्साहन देऊ.
३३ शांती देणारा देव तुम्हा सगळ्यांसोबत असो.+ आमेन.
तळटीपा
^ किंवा “स्वागत.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “ओसंडून वाहील.”
^ किंवा कदाचित, “काही.”
^ किंवा “कर्जदार.”
^ शब्दशः “फळ.”