यिर्मया ४२:१-२२
४२ त्यानंतर कारेहचा मुलगा योहानान,+ होशायाचा मुलगा यजन्या, सगळे सेनाधिकारी आणि सगळे लहान-मोठे लोक येऊन
२ यिर्मया संदेष्ट्याला म्हणाले: “आमच्यापैकी खूप कमी लोक उरलेत हे तर तुम्ही पाहतच आहात. तेव्हा कृपा करून आमची विनंती ऐका. उरलेल्या या लोकांसाठी, आमच्यासाठी तुमचा देव यहोवा याच्याकडे प्रार्थना करा.+
३ आम्ही काय करावं आणि कोणत्या मार्गाने चालावं, हे तुमचा देव यहोवा याने आम्हाला कळवावं.”
४ त्यावर यिर्मया संदेष्टा त्यांना म्हणाला: “ठीक आहे. तुमच्या विनंतीप्रमाणे मी तुमच्या देवाकडे, यहोवाकडे प्रार्थना करीन. आणि यहोवा मला जे काही सांगेल, ते मी तुम्हाला कळवीन. मी तुमच्यापासून काहीही लपवणार नाही.”
५ तेव्हा ते यिर्मयाला म्हणाले: “तुमचा देव यहोवा तुमच्याद्वारे आम्हाला जे काही सांगेल त्याप्रमाणे जर आम्ही केलं नाही, तर यहोवा आमच्याविरुद्ध खरा आणि विश्वासू साक्षीदार बनो.
६ पाहा! ज्या आमच्या देवाकडे, यहोवाकडे आम्ही तुम्हाला पाठवत आहोत, तो आम्हाला जे काही सांगेल ते आम्ही करू; मग ते आम्हाला पसंत असो किंवा नसो. म्हणजे मग आमचा देव यहोवा याचं ऐकल्यामुळे आमचं भलं होईल.”
७ मग दहा दिवसांनी यिर्मयाला यहोवाकडून संदेश मिळाला.
८ म्हणून त्याने कारेहचा मुलगा योहानान आणि त्याच्यासोबत असलेल्या सगळ्या सेनाधिकाऱ्यांना, तसंच लहान-मोठ्या सगळ्या लोकांना बोलावून घेतलं.+
९ तो त्यांना म्हणाला: “तुम्ही मला ज्याच्याकडे विनंती करायला पाठवलं होतं, तो इस्राएलचा देव यहोवा असं म्हणतो:
१० ‘तुम्ही जर या देशात राहिलात, तर मी तुम्हाला उभारीन, मी तुम्हाला पाडणार नाही; मी रोपासारखं तुम्हाला लावीन, तुम्हाला उपटून टाकणार नाही. आणि मी तुमच्यावर जे संकट आणलंय त्याबद्दल मला वाईट वाटेल.+
११ बाबेलच्या ज्या राजाची तुम्हाला भीती वाटते, त्याला घाबरू नका.’+
यहोवा म्हणतो: ‘त्याला घाबरू नका, कारण तुम्हाला वाचवायला आणि त्याच्या हातून सोडवायला मी तुमच्यासोबत आहे.
१२ मी तुमच्यावर दया करीन.+ तोसुद्धा तुमच्यावर दया करेल आणि तुम्हाला तुमच्या देशात परत पाठवेल.
१३ ‘पण जर तुम्ही म्हणालात, की “नाही, आम्ही या देशात राहणार नाही!” आणि तुमचा देव यहोवा याचं जर तुम्ही ऐकलं नाही,
१४ आणि म्हणालात, “आम्ही त्याऐवजी इजिप्तला जाऊ.+ तिथे आम्हाला युद्ध पाहावं लागणार नाही, रणशिंगाचा आवाज ऐकावा लागणार नाही, किंवा आमची उपासमार होणार नाही; आम्ही तिथेच जाऊन राहू,”
१५ तर हे यहूदाच्या उरलेल्या लोकांनो, यहोवा काय म्हणतो ते ऐका. इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा असं म्हणतो: “जर इजिप्तला जायचा तुमचा निर्णय पक्का असेल, आणि तुम्ही तिथे जाऊन राहिलात,*
१६ तर ज्या तलवारीची तुम्हाला भीती वाटते, ती इजिप्तमध्ये तुम्हाला गाठेल. आणि ज्या दुष्काळाची तुम्हाला भीती वाटते, तो इजिप्तमध्ये तुमचा पाठलाग करेल आणि तुम्ही तिथेच मराल.+
१७ ज्या-ज्या लोकांनी इजिप्तला जाऊन राहायचं ठरवलंय, ते सगळे तलवारीने, दुष्काळाने आणि रोगराईने मरतील. मी जे संकट त्यांच्यावर आणणार आहे, त्यातून कोणीही वाचणार नाही किंवा सुटणार नाही.”’
१८ कारण इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: ‘तुम्ही जर इजिप्तला गेलात, तर मी जसा यरुशलेमच्या रहिवाशांवर माझ्या क्रोधाचा आणि संतापाचा वर्षाव केला होता,+ तसा तुमच्यावरही करीन. तुम्ही शापित व्हाल, तुमची अवस्था पाहून लोकांना दहशत बसेल, ते तुम्हाला शिव्याशाप देतील आणि तुमची बदनामी करतील.+ तुम्ही परत कधीच हे ठिकाण पाहणार नाही.’
१९ हे यहूदाच्या उरलेल्या लोकांनो, यहोवाने तुमच्याविरुद्ध संदेश दिलाय. इजिप्तला जाऊ नका. लक्षात ठेवा, आज मी तुम्हाला इशारा देतोय, की
२० तुम्ही जर ही चूक केली, तर तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागेल. कारण तुमचा देव यहोवा याच्याकडे मला पाठवताना तुम्ही म्हणाला होता, ‘आमचा देव यहोवा याच्याकडे आमच्यासाठी प्रार्थना कर. आणि आमचा देव यहोवा जे काही सांगेल, ते सगळं आम्हाला सांग. आणि आम्ही त्याप्रमाणेच करू.’+
२१ बघा, आज ते सगळं मी तुम्हाला सांगितलंय. पण तुम्ही तुमचा देव यहोवा याचं ऐकणार नाही, किंवा त्याने माझ्याद्वारे तुम्हाला जे काही कळवलंय त्याप्रमाणे करणार नाही.+
२२ म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी जाऊन तुम्हाला राहायची इच्छा आहे तिथे तुम्ही नक्की तलवारीने, दुष्काळाने आणि रोगराईने मराल.”+
तळटीपा
^ किंवा “काही काळासाठी राहिलात.”