यिर्मया २७:१-२२

  • बाबेलचं जू (१-११)

  • सिद्‌कीयाला बाबेलसमोर शरण यायला सांगितलं जातं (१२-२२)

२७  यहूदाचा राजा, म्हणजे योशीयाचा मुलगा यहोयाकीम याच्या शासनकाळाच्या सुरुवातीला यिर्मयाला यहोवाकडून असा संदेश मिळाला: २  “यहोवा मला म्हणाला, ‘तू स्वतःसाठी काही जुवं* तयार कर, आणि ती बांधायला पट्टे बनव. मग ती आपल्या मानेवर ठेव. ३  नंतर ती जुवं, यरुशलेममध्ये यहूदाचा राजा सिद्‌कीया याच्याकडे आलेल्या दूतांच्या हातून अदोमच्या+ राजाला, मवाबच्या+ राजाला, अम्मोनी+ लोकांच्या राजाला, सोरच्या+ राजाला आणि सीदोनच्या+ राजाला पाठव. ४  त्या दूतांना आपापल्या राजांना हे सांगायची आज्ञा दे: “इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा म्हणतो, की तुम्ही आपल्या मालकांना असं सांगा: ५  ‘पृथ्वी, मनुष्य आणि पृथ्वीवर राहणारे सगळे प्राणी मीच बनवले आहेत. मीच त्यांना माझ्या अफाट सामर्थ्याने, माझ्या शक्‍तिशाली हातांनी निर्माण केलंय; आणि मला पाहिजे त्याला मी ते देतो.+ ६  आता मी तुमचे देश माझ्या सेवकाला, बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याला दिले आहेत.+ जंगलातले प्राणीसुद्धा मी त्याच्या अधिकाराखाली केले आहेत. ७  सगळी राष्ट्रं त्याची, त्याच्या मुलाची आणि त्याच्या नातवाची सेवा करतील. मग त्याच्या देशाची वेळ येईल,+ तेव्हा अनेक राष्ट्रं आणि मोठमोठे राजे त्याला आपला गुलाम बनवतील.’+ ८  ‘जे राष्ट्र किंवा राज्य बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याची सेवा करायला नकार देईल, आणि बाबेलच्या राजाच्या जुवाखाली आपली मान ठेवणार नाही, त्या राष्ट्राला मी तलवारीने, दुष्काळाने आणि रोगराईने शिक्षा करीन.+ मी बाबेलच्या राजाच्या हातून त्या राष्ट्राचा पूर्णपणे नाश करेपर्यंत त्याला शिक्षा करीन,’ असं यहोवा म्हणतो. ९  ‘म्हणून जे तुम्हाला सांगतात, की “तुम्हाला बाबेलच्या राजाची सेवा करावी लागणार नाही,” त्या तुमच्या संदेष्ट्यांचं, शकुन व स्वप्न पाहणाऱ्‍यांचं, मंत्रतंत्र करणाऱ्‍यांचं आणि जादूगारांचं ऐकू नका. १०  कारण ते तुम्हाला खोट्या भविष्यवाण्या सांगतात. तुम्ही जर त्यांचं ऐकलं, तर तुम्हाला तुमच्या देशातून फार दूर नेलं जाईल. आणि मी तुमची पांगापांग करीन व तुमचा नाश होईल. ११  पण जे राष्ट्र आपली मान बाबेलच्या राजाच्या जुवाखाली ठेवेल आणि त्याची सेवा करेल, त्या राष्ट्राच्या लोकांना मी त्यांच्या स्वतःच्या देशात राहू देईन; ते स्वतःच्या देशात राहतील आणि तिथे शेतीवाडी करतील,’ असं यहोवा म्हणतो.’”’” १२  मी यहूदाचा राजा सिद्‌कीया+ यालाही तेच सांगितलं. मी त्याला म्हणालो: “तुम्ही सगळे आपल्या माना बाबेलच्या राजाच्या जुवाखाली ठेवा आणि त्याची व त्याच्या लोकांची सेवा करा, म्हणजे तुमचा जीव वाचेल.+ १३  तू आणि तुझ्या लोकांनी तलवारीने,+ दुष्काळाने+ आणि रोगराईने का मरावं?+ कारण जे राष्ट्र बाबेलच्या राजाची सेवा करणार नाही त्याच्या बाबतीत हेच घडेल, असं यहोवाने सांगितलंय. १४  ‘तुम्हाला बाबेलच्या राजाची सेवा करावी लागणार नाही,’ असं सांगणाऱ्‍या संदेष्ट्यांचं ऐकू नका.+ कारण ते खोट्या भविष्यवाण्या करतात.+ १५  ‘मी त्यांना पाठवलं नाही’ असं यहोवा म्हणतो. ‘ते माझ्या नावाने खोट्या भविष्यवाण्या करतात. तुम्ही जर त्यांचं ऐकलं, तर मी तुमची आणि तुम्हाला भविष्यवाण्या सांगणाऱ्‍या संदेष्ट्यांची पांगापांग करीन व तुमचा नाश होईल.’”+ १६  शिवाय, मी याजकांना आणि या सगळ्या लोकांना असं म्हणालो: “यहोवा म्हणतो, ‘तुमचे जे संदेष्टे तुम्हाला भविष्यवाण्या सांगून असं म्हणतात, की “पाहा! यहोवाच्या मंदिरातली भांडी लवकरच बाबेलमधून परत आणली जातील,” त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका.+ कारण ते तुम्हाला खोट्या भविष्यवाण्या सांगतात.+ १७  तुम्ही त्यांचं ऐकू नका. बाबेलच्या राजाची सेवा करा, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल.+ नाहीतर या शहराचा नाश होईल. १८  पण, ते जर खरंच संदेष्टे असतील आणि त्यांच्याकडे खरंच यहोवाचा संदेश असेल, तर त्यांनी सैन्यांचा देव यहोवा याच्याकडे अशी याचना करावी, की यहोवाच्या मंदिरात, यहूदाच्या राजाच्या महालात आणि यरुशलेममध्ये उरलेली भांडी बाबेलला नेली जाऊ नयेत.’ १९  कारण, सैन्यांचा देव यहोवा याने मंदिरातल्या खांबांविषयी,+ गंगाळ-सागराविषयी*+ आणि हाताने ढकलायच्या गाड्यांविषयी+ एक संदेश दिलाय. तसंच, त्याने या शहरात उरलेल्या भांड्यांविषयीही एक संदेश दिलाय; २०  म्हणजे, बाबेलचा राजा नबुखद्‌नेस्सर याने जेव्हा यहूदाचा राजा, अर्थात यहोयाकीमचा मुलगा यखन्या याला आणि त्याच्यासोबत यहूदा व यरुशलेमच्या सर्व प्रतिष्ठित माणसांना यरुशलेममधून बाबेलला बंदी बनवून नेलं, तेव्हा जी भांडी त्याने आपल्यासोबत नेली नव्हती, त्यांविषयी देवाने एक संदेश दिलाय.+ २१  हो, यहोवाच्या मंदिरात, यहूदाच्या राजाच्या महालात आणि यरुशलेममध्ये उरलेल्या भांड्यांविषयी इस्राएलचा देव, सैन्यांचा देव यहोवा याने असा संदेश दिलाय: २२  ‘“ती बाबेलला नेली जातील.+ आणि मी त्यांच्याकडे लक्ष देत नाही तोपर्यंत ती तिथेच राहतील. मग मी ती परत आणून या ठिकाणी ठेवीन,” असं यहोवा म्हणतो.’”+

तळटीपा

म्हणजे, मंदिरातला तांब्याचा मोठा हौद.