यहोशवा ९:१-२७

  • गिबोनी लोक चतुराईने शांतीचा करार करतात (१-१५)

  • गिबोनी लोकांनी केलेली फसवणूक पकडली जाते (१६-२१)

  • गिबोनी लोकांना लाकूड तोडणारे आणि पाणी भरणारे म्हणून नेमलं जातं (२२-२७)

 मग यार्देनच्या पश्‍चिमेकडे असलेल्या डोंगराळ भागातल्या, शेफीलातल्या,* महासागराच्या*+ संपूर्ण किनाऱ्‍याजवळच्या आणि लबानोनसमोरच्या भागातल्या सर्व राजांनी,+ म्हणजे हित्ती, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी+ यांच्या सर्व राजांनी, जे काही घडलं होतं त्याविषयी ऐकलं. २  तेव्हा ते यहोशवा आणि इस्राएली लोकांविरुद्ध लढण्यासाठी एक झाले.+ ३  यहोशवाने यरीहो+ आणि आय+ शहरांच्या बाबतीत जे केलं ते गिबोनच्या+ लोकांनीसुद्धा ऐकलं. ४  तेव्हा गिबोनी लोक चतुराईने वागले. त्यांनी आपल्या गाढवांवर, झिजलेल्या पोत्यांमध्ये खाण्याच्या वस्तू घेतल्या. तसंच फाटलेल्या आणि ठिगळ लावलेल्या द्राक्षारसाच्या बुधल्याही* घेतल्या. ५  त्यांनी पायांत फाटलेले आणि ठिगळ लावलेले जोडे, तर अंगात जुने व फाटके-तुटके कपडे घातले. तसंच, त्यांनी वाळलेल्या आणि लगेच भुगा होतील अशा भाकरीही सोबत घेतल्या. ६  मग ते गिलगाल+ इथल्या छावणीत आले आणि यहोशवा व इस्राएलच्या पुरुषांना म्हणाले: “आम्ही खूप दूरच्या देशातून आलो आहोत. आता आमच्याशी एक करार करा.” ७  पण इस्राएली पुरुष त्या हिव्वी+ लोकांना* म्हणाले: “कदाचित तुम्ही जवळपासच राहत असाल. मग आम्ही तुमच्यासोबत करार कसा करू शकतो?”+ ८  ते यहोशवाला म्हणाले: “आम्ही तुमचे सेवक* आहोत.” तेव्हा यहोशवाने त्यांना विचारलं: “तुम्ही कोण आणि कुठून आलात?” ९  ते त्याला म्हणाले: “आम्ही तुझे सेवक आहोत आणि खूप दूरच्या देशातून आलो आहोत.+ कारण आम्ही तुझा देव यहोवा याच्या नावाविषयी ऐकलंय. तो किती महान आहे आणि त्याने इजिप्तमध्ये काय-काय केलं हे सगळं आम्ही ऐकलंय.+ १०  तसंच यार्देनच्या पलीकडे* असलेल्या अमोरी लोकांच्या दोन राजांचं, म्हणजेच हेशबोनचा राजा सीहोन+ आणि अष्टरोथमध्ये असलेला बाशानचा राजा ओग,+ यांचं त्याने काय केलं तेसुद्धा आम्ही ऐकलंय. ११  म्हणून आमचे वडीलजन आणि देशातले सगळे लोक आम्हाला म्हणाले, ‘प्रवासासाठी खाण्यापिण्याच्या वस्तू बांधून घ्या आणि इस्राएली लोकांकडे जा. त्यांना म्हणा: “आम्ही तुमचे सेवक बनू;+ आता आमच्यासोबत एक करार करा.”’+ १२  तुमच्याकडे येण्यासाठी आम्ही घरातून निघालो, तेव्हा आमच्या या भाकरी गरम आणि ताज्या होत्या. आता पाहा, त्या पार वाळून गेल्या आहेत आणि त्यांचा भुगा होतोय.+ १३  द्राक्षारसांच्या बुधल्या* आम्ही भरून घेतल्या तेव्हा त्या नवीन होत्या, पण आता त्या फाटल्या आहेत.+ आणि फार लांबचा प्रवास करून आल्यामुळे आमचे कपडे आणि पायांतले जोडेसुद्धा जीर्ण होऊन फाटले आहेत.” १४  त्यामुळे इस्राएली पुरुषांनी त्यांच्या खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन* पाहिल्या. पण त्यांनी यहोवाचा सल्ला मात्र घेतला नाही.+ १५  यहोशवाने त्यांच्याशी शांतीचा करार केला+ आणि त्यांना वचन दिलं, की तो त्यांना जिवंत राहू देईल. इस्राएली लोकांच्या प्रधानांनीसुद्धा हीच शपथ वाहिली.+ १६  करार केल्यावर तिसऱ्‍या दिवशी इस्राएली लोकांना समजलं, की हे लोक शेजारच्या प्रदेशातले असून जवळच राहणारे आहेत. १७  तेव्हा इस्राएली लोक निघाले आणि तिसऱ्‍या दिवशी त्यांच्या शहरांजवळ येऊन पोहोचले. गिबोन,+ कफीरा, बैरोथ आणि किर्याथ-यारीम+ ही त्यांची शहरं होती. १८  पण इस्राएली लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला नाही. कारण लोकांच्या प्रधानांनी इस्राएलचा देव यहोवा याच्या नावाने शपथ घेतली होती.+ त्यामुळे इस्राएलचे लोक प्रधानांविरुद्ध कुरकुर करू लागले. १९  तेव्हा प्रधान इस्राएलच्या लोकांना म्हणाले: “इस्राएलचा देव यहोवा याच्या नावाने शपथ घेतल्यामुळे आम्ही त्यांचा नाश करू शकत नाही. २०  आम्ही त्यांना जिवंत ठेवू. कारण आम्ही जर शपथ मोडली, तर देवाचा क्रोध आमच्यावर भडकेल.”+ २१  आणि गिबोनी लोकांना वचन दिल्याप्रमाणे ते पुढे असंही म्हणाले: “आपण त्यांना जिवंत ठेवू. पण इस्राएलच्या सगळ्या लोकांसाठी ते लाकूड तोडणारे आणि पाणी भरणारे होतील.” २२  यहोशवाने गिबोनी लोकांना बोलावून म्हटलं: “तुम्ही तर आमच्या जवळच राहता, पण ‘आम्ही फार दूरच्या देशाहून आलो आहोत,’ असं सांगून तुम्ही आमची फसवणूक का केली?+ २३  म्हणून आतापासून तुम्ही शापित आहात.+ तुम्ही नेहमी दास बनून राहाल, आणि माझ्या देवाच्या घरासाठी लाकूड तोडण्याचं आणि पाणी भरण्याचं काम कराल.” २४  ते यहोशवाला म्हणाले: “हे सगळं आम्ही यासाठी केलं, कारण आम्ही असं ऐकलं होतं, की तुझा देव यहोवा याने त्याचा सेवक मोशे याला या देशातल्या सगळ्या लोकांचा नाश करायची आणि हा संपूर्ण देश तुम्हाला द्यायची आज्ञा दिली होती.+ त्यामुळे तुम्ही आम्हालाही मारून टाकाल अशी भीती आम्हाला वाटली,+ आणि म्हणून आम्ही असं वागलो.+ २५  आता आम्ही तुझ्या हातांत आहोत. तुला जे योग्य वाटेल ते तू कर.” २६  आणि यहोशवाने तसंच केलं; त्याने त्यांना इस्राएली लोकांच्या हातून वाचवलं. इस्राएली लोकांनी त्यांना मारून टाकलं नाही. २७  पण त्या दिवशी यहोशवाने त्यांना इस्राएलच्या सर्व लोकांसाठी आणि यहोवा निवडेल त्या ठिकाणी+ त्याच्या वेदीसाठी लाकूड तोडणारे आणि पाणी भरणारे म्हणून नेमलं;+ आणि आजपर्यंत ते हेच काम करत आहेत.+

तळटीपा

म्हणजे, भूमध्य समुद्र.
किंवा “टेकड्यांच्या प्रदेशातल्या.”
त्या काळी गिबोनमध्ये हिव्वी लोक राहायचे.
किंवा “दास.”
म्हणजे, पूर्वेकडे.
किंवा “तपासून.”