यहेज्केल ४१:१-२६

  • मंदिरातलं पवित्र स्थान (१-४)

  • मंदिराची भिंत आणि त्याला लागून असलेल्या खोल्या (५-११)

  • मंदिराच्या पश्‍चिमेकडची इमारत (१२)

  • इमारतींचं मोजमाप घेतलं जातं (१३-१५क)

  • मंदिराचा आतला भाग (१५ख-२६)

४१  नंतर तो माणूस मला मंदिराच्या पवित्र स्थानात घेऊन आला. आणि त्याने तिथल्या उजवीकडच्या आणि डावीकडच्या स्तंभांचं माप घेतलं; दोन्ही स्तंभांची लांबी सहा-सहा हात होती,* २  आणि रुंदी पाच-पाच हात होती. आणि प्रवेशाची रुंदी दहा हात होती. मग त्याने पवित्र स्थानाचं माप घेतलं; ते ४० हात लांब आणि २० हात रुंद होतं. ३  नंतर तो आत* गेला आणि त्याने प्रवेशाजवळच्या दोन्ही स्तंभांचं माप घेतलं; त्यांची रुंदी दोन-दोन हात आणि लांबी सात-सात हात होती. आणि प्रवेशाची रुंदी सहा हात होती. ४  त्याने पवित्र स्थानाकडे तोंड असलेल्या त्या खोलीचं माप घेतलं; ती खोली २० हात लांब आणि २० हात रुंद होती.+ मग तो मला म्हणाला: “हे परमपवित्र स्थान आहे.”+ ५  त्यानंतर त्याने मंदिराची भिंत मोजली; तिची जाडी सहा हात होती. मंदिराला लागून असलेल्या खोल्यांची रुंदी चार हात होती.+ ६  तिथे तीन मजले असून प्रत्येक मजल्यावर ३० खोल्या होत्या. मंदिराची भिंत अशा प्रकारे बांधलेली होती, की तिला खाचा न पाडताच खोल्यांच्या तुळ्या* तिच्यावर आधारलेल्या होत्या.+ ७  मंदिराच्या दोन्ही बाजूंना एक-एक नागमोडी जिना होता. जसजसा तो जिना वर गेला तसतसा तो मोठा होत गेला;+ खालच्या मजल्यावर त्याची रुंदी कमी होती आणि मधल्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर जाईपर्यंत त्याची रुंदी वाढत गेली. ८  मंदिराच्या सभोवती मला एक उंच चौथरा दिसला. आणि मंदिराला लागून असलेल्या खोल्यांच्या पायाची उंची जमिनीपासून वरच्या कोपऱ्‍यापर्यंत एक पूर्ण काठी, म्हणजे सहा हात इतकी होती. ९  या खोल्यांच्या बाहेरच्या भिंतीची जाडी पाच हात होती. खोल्यांच्या बाजू-बाजूने थोडी मोकळी जागा* सोडण्यात आली होती आणि तीसुद्धा मंदिराचाच भाग होती. १०  मंदिराच्या दोन्ही बाजूंना, म्हणजे मंदिर आणि जेवणाच्या खोल्या+ यांच्यामध्ये २० हात रुंदीची जागा होती. ११  मंदिराच्या बाजूच्या खोल्या आणि मोकळी जागा यांच्यामध्ये उत्तरेकडे एक प्रवेशमार्ग आणि दक्षिणेकडे एक प्रवेशमार्ग होता. खोल्यांच्या बाजू-बाजूने असलेली मोकळी जागा पाच हात रुंद होती. १२  मंदिराच्या पश्‍चिमेला असलेल्या मोकळ्या जागेसमोर एक इमारत होती; तिचं तोंड त्या मोकळ्या जागेकडे असून, ती ९० हात लांब आणि ७० हात रुंद होती. तिच्या भिंतीची जाडी सगळ्या बाजूंनी पाच हात होती. १३  त्याने मंदिराचं माप घेतलं; त्याची लांबी १०० हात होती. शिवाय त्याने इमारतीचं,* तिच्या भिंतींचं आणि मोकळ्या जागेचंही माप घेतलं; त्या सगळ्यांची एकूण लांबी १०० हात होती. १४  मंदिराच्या समोरच्या भागाची, म्हणजे पूर्वेकडच्या भागाची आणि मंदिराच्या दोन्ही बाजूंना असलेल्या मोकळ्या जागांची एकूण रुंदी १०० हात होती. १५  मग त्याने मंदिराच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेसमोरच्या इमारतीची आणि त्यासोबत तिच्या दोन्ही बाजूंना असलेल्या वऱ्‍हांड्यांची लांबी मोजली; ती एकूण १०० हात होती. तसंच त्याने पवित्र स्थानाचं, परमपवित्र स्थानाचं+ आणि अंगणातल्या द्वारमंडपांचंही माप घेतलं. १६  शिवाय, त्याने या तिन्ही ठिकाणांच्या उंबरठ्यांचं, आतून बाहेर निमुळत्या होत जाणाऱ्‍या खिडक्यांचं+ आणि वऱ्‍हांड्यांचं माप घेतलं. उंबरठ्याजवळ जमिनीपासून वर खिडक्यांपर्यंत लाकडी चौकटी+ होत्या आणि खिडक्या झाकलेल्या होत्या. १७  त्याने प्रवेशद्वाराच्या वरच्या भागाचं, मंदिराच्या आतल्या आणि बाहेरच्या भागांचं आणि सभोवती असलेल्या संपूर्ण भिंतीचं माप घेतलं. १८  आणि तिथे करुबांच्या+ आणि खजुराच्या झाडांच्या आकृत्या कोरल्या होत्या.+ दोन करुबांच्या मधे एक खजुराचं झाड असून, प्रत्येक करुबाला दोन तोंडं होती; १९  एक माणसाचं आणि एक सिंहाचं. त्यांपैकी माणसाचं तोंड एका बाजूच्या खजुराच्या झाडाकडे, तर सिंहाचं तोंड दुसऱ्‍या बाजूच्या खजुराच्या झाडाकडे होतं.+ संपूर्ण मंदिरात अशाच प्रकारे आकृत्या कोरण्यात आल्या होत्या. २०  मंदिराच्या भिंतीवर जमिनीपासून प्रवेशाच्या वरच्या भागापर्यंत सगळीकडे करुबांच्या आणि खजुराच्या झाडांच्या आकृत्या कोरल्या होत्या. २१  मंदिराच्या दाराच्या चौकटी* चौकोनी होत्या.+ आणि पवित्र स्थानाच्या* समोर २२  लाकडी वेदीसारखं काहीतरी होतं.+ त्याची उंची तीन हात आणि लांबी दोन हात होती. त्याला चार कोपरे होते, आणि त्याचा खालचा भाग आणि त्याचे बाजूचे भाग लाकडी होते. मग तो माणूस मला म्हणाला: “हा यहोवासमोर असलेला मेज आहे.”+ २३  मंदिराच्या पवित्र स्थानाला आणि परमपवित्र स्थानाला दोन-दोन दरवाजे होते.+ २४  आणि प्रत्येक दरवाजाला मधोमध दुमडणारी दोन दारं होती. २५  मंदिराच्या भिंतींवर जशा करुबांच्या आणि खजुराच्या झाडांच्या आकृत्या कोरल्या होत्या, तशाच या दरवाजांवरही कोरल्या होत्या.+ मंदिराच्या द्वारमंडपाच्या छताला बाहेरच्या बाजूने एक लाकडी कड होती. २६  द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूंना आणि मंदिराला लागून असलेल्या खोल्यांना, तसंच छताच्या लाकडी कडांना निमुळत्या खिडक्या+ आणि खजुराच्या झाडांच्या आकृत्या होत्या.

तळटीपा

हे “लांब हातांचं” माप आहे. अति. ख१४ पाहा.
म्हणजे, परमपवित्र स्थानात.
किंवा “बीम.” छताला आधार देणारा लाकडाचा लांब ओंडका.
मंदिराच्या सभोवती चालण्यासाठी असलेली छोटी जागा.
म्हणजे, मंदिराच्या पश्‍चिमेकडची इमारत.
हे पवित्र स्थानाच्या प्रवेशाला सूचित करत असावं.
हे परमपवित्र स्थानाला सूचित करत असावं.