यहेज्केल २१:१-३२

  • देवाच्या न्यायदंडाची तलवार म्यानातून बाहेर पडेल (१-१७)

  • बाबेलचा राजा यरुशलेमवर हल्ला करेल (१८-२४)

  • इस्राएलच्या दुष्ट प्रधानाला काढून टाकलं जातं (२५-२७)

    • “आपला मुकुट काढून टाक” (२६)

    • “ज्याला तो मिळण्याचा कायदेशीर हक्क आहे,” तो येईपर्यंत (२७)

  • अम्मोनी लोकांविरुद्ध तलवार (२८-३२)

२१  यहोवाकडून मला पुन्हा एकदा संदेश मिळाला; तो मला म्हणाला: २  “मनुष्याच्या मुला, यरुशलेमकडे तोंड कर आणि पवित्र जागांविरुद्ध घोषणा कर. तसंच, इस्राएल देशाविरुद्धही भविष्यवाणी कर. ३  इस्राएल देशाला सांग, ‘यहोवा असं म्हणतो: “बघ, मी तुझ्या विरोधात उठलोय. मी माझी तलवार म्यानातून काढीन,+ आणि तुझ्यातल्या सगळ्या नीतिमान आणि दुष्ट लोकांची कत्तल करीन. ४  दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत सगळ्या नीतिमान आणि दुष्ट लोकांची कत्तल करायला माझी तलवार म्यानातून बाहेर पडेल. ५  मग, सगळ्या लोकांना कळून येईल, की मी यहोवानेच म्यानातून माझी तलवार बाहेर काढली आहे. आणि ती परत आत जाणार नाही.”’+ ६  मनुष्याच्या मुला, लोकांसमोर थरथर कापत उसासे टाक. तू मोठ्या दुःखाने त्यांच्यासमोर उसासे टाक.+ ७  आणि त्यांनी जर तुला विचारलं, की ‘तू उसासे का टाकतोस?’ तर त्यांना म्हण, ‘एका बातमीमुळे.’ कारण लोकांच्या कानांवर नक्की एक बातमी येईल, आणि ती ऐकून सगळ्या लोकांच्या काळजाचं पाणी पाणी होईल. त्यांच्यापैकी प्रत्येकाचे हातपाय गळून जातील, त्यांचं मन खचून जाईल आणि प्रत्येकाच्या गुडघ्यावरून पाणी गळेल.*+ ‘पाहा! ती बातमी नक्की तुमच्या कानांवर येईल, आणि त्याप्रमाणेच घडेल,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.” ८  मग यहोवाकडून मला पुन्हा एकदा संदेश मिळाला; तो मला म्हणाला: ९  “मनुष्याच्या मुला, भविष्यवाणी कर आणि असं म्हण, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “एक तलवार! पाहा, एक तलवार+ घासून चकचकीत करण्यात आली आहे. तिला धार लावण्यात आली आहे. १०  मोठी कत्तल करण्यासाठी तिला धार लावण्यात आली आहे; ती विजेसारखी चमकावी म्हणून तिला घासून चकचकीत करण्यात आलंय.”’” “आपण आनंदी व्हायला नको का?” “‘ती* जर प्रत्येक झाड नाकारते, तर ती माझ्या मुलाचाही राजदंड नाकारणार नाही का?+ ११  मी ती तलवार घासून चकचकीत करायला दिली आहे. तिच्याने लोकांची कत्तल करता यावी म्हणून मी ती दिली आहे. आता त्या तलवारीला धार लावून चकचकीत करण्यात आलंय, आणि ती कत्तल करणाऱ्‍याच्या हाती दिली जाईल.+ १२  हे मनुष्याच्या मुला, मोठ्याने रड आणि आक्रोश कर.+ कारण ती तलवार माझ्या लोकांच्या विरोधात आली आहे; इस्राएलच्या सगळ्या प्रधानांच्या विरोधात ती आली आहे.+ माझ्या लोकांसोबत तेही त्या तलवारीला बळी पडतील. म्हणून तू दुःखाने आपल्या मांडीवर मारून घे. १३  कारण माझ्या लोकांची पारख करण्यात आली आहे.+ तलवारीने जर राजदंडाला नाकारलं तर काय होईल? तसं झालं तर राजदंड अस्तित्वात राहणार नाही,’+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो. १४  हे मनुष्याच्या मुला, भविष्यवाणी कर आणि टाळी वाजवून तीन वेळा ‘तलवार!’ असं म्हण. लोकांचा बळी घेणारी, चारही बाजूंनी त्यांना घेरणारी आणि मोठ्या प्रमाणात लोकांची कत्तल करणारी ही तलवार आहे.+ १५  भीतीने लोकांच्या काळजाचं पाणी पाणी होईल+ आणि त्यांच्यापैकी बरेच जण आपल्या शहरांच्या दरवाजांमध्ये मरून पडतील. मी तलवारीने त्यांची कत्तल करीन. हो, ती तलवार विजेसारखी चमकत आहे; तिला कत्तलीसाठी घासून चकचकीत करण्यात आलंय. १६  हे तलवार, वार कर! उजवीकडे आणि डावीकडे सपासप वार कर! ज्या दिशेला तुझं पातं असेल, त्या दिशेने तू जा! १७  मीपण टाळी वाजवून माझा राग शांत करीन.+ मी यहोवा स्वतः हे बोललोय.” १८  मग यहोवाकडून मला परत असा संदेश मिळाला: १९  “हे मनुष्याच्या मुला, बाबेलच्या राजाची तलवार यावी म्हणून दोन रस्ते रेखाट. दोन्ही रस्ते एकाच देशातून निघतील आणि ज्या ठिकाणी ते वेगळे होऊन दोन शहरांकडे जातील, त्या ठिकाणी मार्ग दाखवणारं एक चिन्ह कर. २०  अम्मोनी लोकांच्या राब्बा शहराविरुद्ध तलवार यावी म्हणून एक रस्ता रेखाट,+ तर यहूदाच्या तटबंदी शहराविरुद्ध, म्हणजे यरुशलेमविरुद्ध+ तलवार यावी म्हणून दुसरा रस्ता रेखाट. २१  कारण, ज्या ठिकाणी ते दोन रस्ते वेगळे होतात, त्या ठिकाणी बाबेलचा राजा येऊन थांबेल आणि तिथे तो शकुन पाहील. त्यासाठी तो आपल्या भात्यातले बाण हलवेल, आपल्या मूर्तींचा* सल्ला घेईल आणि प्राण्याच्या यकृताची पारख करेल. २२  त्याच्या उजव्या हातातला शकुन यरुशलेमकडे इशारा करेल. शहराभोवती तट पाडणारी यंत्रं ठेवायला, कत्तल करायचा हुकूम द्यायला आणि युद्धाची घोषणा करायला तो यरुशलेमकडे इशारा करेल. तसंच, शहराच्या दरवाजांसमोर दरवाजे तोडणारी यंत्रं ठेवायला, दगड-मातीचा ढिगारा रचायला आणि वेढा घालण्यासाठी शहराभोवती भिंत उभारायला तो इशारा करेल.+ २३  ज्यांनी* त्यांना शपथा दिल्या,+ त्यांना हा शकुन खोटा वाटेल. पण तो त्यांचे अपराध आठवून त्यांना कैद करून नेईल.+ २४  म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘तुम्ही आपली वाईट कृत्यं उजेडात आणली आहेत आणि आपल्या कामांतून आपली पापं सगळ्यांसमोर उघड केली आहेत. असं करून तुम्ही स्वतःच आपल्या अपराधांची आठवण करून दिली आहे. तुमची आठवण झालीच आहे, तर आता तुम्हाला बळजबरीने नेलं जाईल.’ २५  जबर जखमी झालेल्या इस्राएलच्या दुष्ट प्रधाना!+ तुझी वेळ आली आहे. तुला शेवटची शिक्षा द्यायची वेळ आली आहे. २६  सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘आपल्या डोक्यावरची पगडी काढ आणि आपला मुकुट काढून टाक.+ आधीसारखं काहीच राहणार नाही.+ जो खाली आहे त्याला वर उचललं जाईल+ आणि जो वर आहे त्याला खाली आणलं जाईल.+ २७  मी नाश करीन! हो, मी त्याचा नाश करीन! नाश केल्याशिवाय मी राहणार नाही! तो मुकुट कोणालाही मिळणार नाही. पण ज्याला तो मिळण्याचा कायदेशीर हक्क आहे, तो येईल+ तेव्हा मी त्याला तो देईन.’+ २८  मनुष्याच्या मुला, भविष्यवाणी कर आणि म्हण, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा अम्मोनी लोकांबद्दल आणि ते करत असलेल्या अपमानांबद्दल असं म्हणतो: एक तलवार! कत्तल करायला एक तलवार उपसण्यात आली आहे; तिने लोकांचा बळी घ्यावा आणि विजेसारखं चमकावं म्हणून तिला घासून चकचकीत करण्यात आलंय. २९  तुझ्याबद्दल* खोटे दृष्टान्त आणि खोटे शकुन पाहण्यात आले असले, तरी कत्तल झालेल्यांवर* तुझा ढिगारा रचला जाईल; ज्या दुष्ट माणसांची वेळ आली आहे, शेवटची शिक्षा भोगायची ज्यांची वेळ आली आहे, त्यांच्यावर तुझा ढिगारा रचला जाईल. ३०  तलवार परत म्यानात ठेवली जावी. तुला जिथे बनवण्यात आलं, तू मूळची ज्या देशातली आहेस, तिथेच मी तुझा न्याय करीन. ३१  मी तुझ्यावर माझ्या क्रोधाचा प्याला ओतीन, तुझ्यावर माझ्या संतापाची आग फुंकीन. आणि तुला क्रूर माणसांच्या, नाशाच्या कारागिरांच्या हाती देईन.+ ३२  तू आगीसाठी सरपण बनशील,+ तुझ्या देशात तुझं स्वतःचं रक्‍त सांडलं जाईल आणि कोणालाही तुझी आठवण राहणार नाही. कारण मी यहोवा स्वतः हे बोललोय.’”

तळटीपा

म्हणजे, त्यांना भीतीने लघवी होईल.
म्हणजे, यहोवाची तलवार.
शब्दशः “तेराफीम मूर्ती.”
म्हणजे, यरुशलेमचे रहिवासी.
हे अम्मोनी लोकांच्या राब्बा शहराला उद्देशून म्हटलंय असं दिसतं.
शब्दशः “कत्तल झालेल्यांच्या मानांवर.”