यहेज्केल १४:१-२३
१४ त्यानंतर, इस्राएलचे काही वडीलजन आले आणि माझ्यासमोर येऊन बसले.+
२ तेव्हा यहोवाकडून मला असा संदेश मिळाला:
३ “मनुष्याच्या मुला, या लोकांनी त्यांच्या घृणास्पद मूर्तींच्या* मागे चालत राहण्याचा निश्चयच केलाय. शिवाय, लोकांना पाप करायला लावणारं एक मोठं अडखळण त्यांनी त्यांच्यापुढे ठेवलंय. हे असे लोक माझ्याकडे मार्गदर्शनासाठी येतात, तेव्हा मी का त्यांना उत्तर देऊ?+
४ आता त्यांच्याशी बोल आणि त्यांना सांग, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “एखाद्या इस्राएली माणसाने जर त्याच्या घृणास्पद मूर्तींच्या मागे चालत राहण्याचा ठाम निश्चय केला आणि लोकांना पाप करायला लावणारं मोठं अडखळण त्यांच्यापुढे ठेवलं, आणि त्यानंतर तो मार्गदर्शनासाठी एखाद्या संदेष्ट्याकडे आला, तर मी, यहोवा त्याला बरोबर उत्तर देईन; त्याच्याकडे जितक्या घृणास्पद मूर्ती असतील, तितकी कडक शिक्षा मी त्याला देईन.
५ मी इस्राएलच्या घराण्यातल्या सगळ्या लोकांच्या मनात मोठी दहशत निर्माण करीन. कारण, त्यांनी मला सोडून दिलंय आणि ते त्यांच्या घृणास्पद मूर्तींच्या नादी लागलेत.”’+
६ म्हणून आता इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांना सांग, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “तुमच्या घृणास्पद मूर्तींपासून दूर व्हा, तुमच्या सगळ्या किळसवाण्या कामांपासून मागे वळा आणि माझ्याकडे या.+
७ कारण जर एखादा इस्राएली किंवा इस्राएलमध्ये राहणारा एखादा विदेशी माझ्यापासून दूर गेला, आणि त्याने त्याच्या घृणास्पद मूर्तींच्या मागे जाण्याचा ठाम निश्चय केला, आणि लोकांना पाप करायला लावणारं अडखळण त्यांच्यापुढे ठेवलं, आणि त्यानंतर तो माझ्या संदेष्ट्याकडे मार्गदर्शन मागायला आला,+ तर मी यहोवा, स्वतः त्याला उत्तर देईन.
८ मी त्याचा विरोध करीन. मी त्याची अशी दशा करीन, की तो लोकांसाठी इशारा देणारं उदाहरण बनेल आणि लोक त्याच्यावर म्हणी रचतील. मी माझ्या लोकांमधून त्याचं नामोनिशाण मिटवून टाकीन.+ तेव्हा तुम्हाला समजून येईल, की मी यहोवा आहे.”’
९ ‘आणि जर एखाद्या संदेष्ट्याची फसवणूक होऊन त्याने संदेश दिला, तर असं समजावं की मी, यहोवानेच त्या संदेष्ट्याची फसवणूक केली आहे.+ मी त्याच्यावर माझा हात उगारीन आणि माझ्या इस्राएली लोकांमधून त्याचं नामोनिशाण मिटवून टाकीन.
१० त्या दोघांनाही आपल्या दोषाचा भार वाहावा लागेल; मार्गदर्शन मागणारा जितका दोषी आहे, तितकाच तो संदेष्टाही दोषी ठरेल.
११ म्हणजे मग इस्राएलच्या घराण्यातले लोक माझ्यापासून भरकटणार नाहीत आणि आपल्या सर्व अपराधांनी स्वतःला अशुद्ध करणार नाहीत. तेव्हा ते माझे लोक होतील, आणि मी त्यांचा देव होईन,’+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.”
१२ नंतर यहोवाकडून मला परत असा संदेश मिळाला:
१३ “मनुष्याच्या मुला, एखाद्या देशाने अविश्वासूपणे वागून माझ्याविरुद्ध पाप केलं, तर मी त्यावर आपला हात उगारीन आणि त्याचा अन्नपुरवठा बंद करून टाकीन.*+ मी त्या देशावर दुष्काळ आणीन+ आणि त्यातल्या माणसांचा आणि प्राण्यांचा नाश करून टाकीन.”+
१४ “‘त्या देशात नोहा,+ दानीएल+ आणि ईयोब+ हे तिघं जरी असले, तरी आपल्या नीतिमत्त्वामुळे ते फक्त स्वतःचा जीव वाचवू शकतील,’+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.”
१५ “‘किंवा मी जर देशात सगळीकडे जंगलातले हिंस्र प्राणी पाठवले आणि त्यांच्यामुळे देशातले लोक नाहीसे होऊन देश ओसाड झाला, आणि हिंस्र प्राण्यांच्या भीतीमुळे त्यातून कोणीही ये-जा करत नसला,’+
१६ तर सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, ‘माझ्या जीवनाची शपथ! तिथे हे तिघं जरी असले, तरी ते फक्त स्वतःचा जीव वाचवू शकतील; ते आपल्या मुलामुलींना वाचवू शकणार नाहीत. तो सगळा देश ओसाड होईल.’”
१७ “‘किंवा मी जर त्या देशावर तलवार पाठवून+ म्हणालो: “या संपूर्ण देशात तलवार चालवली जावी,” आणि त्यातून मी माणसांचा व प्राण्यांचा नाश केला,’+
१८ तर सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, ‘माझ्या जीवनाची शपथ! तिथे हे तिघं जरी असले, तरी ते फक्त स्वतःचा जीव वाचवू शकतील; ते आपल्या मुलामुलींना वाचवू शकणार नाहीत.’”
१९ “‘किंवा मी जर देशात रोगराई पाठवली+ आणि देशावर माझ्या क्रोधाचा प्याला ओतल्यामुळे तिथल्या माणसांचा आणि प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला,’
२० तर सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, ‘माझ्या जीवनाची शपथ! तिथे नोहा,+ दानीएल+ आणि ईयोब+ हे तिघं जरी असले, तरी आपल्या नीतिमत्त्वामुळे ते फक्त स्वतःचा जीव वाचवू शकतील; ते आपल्या मुलामुलींना वाचवू शकणार नाहीत.’”+
२१ “सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: ‘यरुशलेममधून माणसांचा आणि प्राण्यांचा नाश करून टाकायला+ मी जेव्हा तलवार, दुष्काळ, हिंस्र प्राणी आणि रोगराई+ या चार गोष्टी पाठवून तिला शिक्षा करीन,+ तेव्हा असंच घडेल.
२२ पण तिच्यातले काही लोक निसटून जातील. त्यांना आणि त्यांच्या मुलामुलींना तिच्यातून बाहेर आणलं जाईल.+ ते सगळे तुमच्याकडे येतील. तुम्ही जेव्हा त्यांचं वागणं आणि त्यांची कामं पाहाल, तेव्हा मी यरुशलेमवर हे संकट का आणलं, मी तिच्या विरोधात या सगळ्या गोष्टी का केल्या हे तुम्हाला समजेल.’”
२३ “सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, ‘तुम्ही जेव्हा त्यांचं वागणं आणि त्यांची कामं पाहाल तेव्हा तुम्हाला कळून येईल, की मी यरुशलेमच्या विरोधात जे केलं, ते काही उगाच केलं नाही.’”+
तळटीपा
^ इथे वापरलेला हिब्रू शब्द, “विष्ठा” या अर्थाच्या शब्दाशी संबंधित असावा आणि तो तिरस्कार दाखवण्यासाठी वापरला जातो.
^ शब्दशः “भाकरींची प्रत्येक सळई मोडीन.” हे कदाचित भाकरी अडकवून ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सळयांना सूचित करत असावं.