यहेज्केल १२:१-२८

  • लोक बंदिवासात कसं जातील याचं प्रात्यक्षिक (१-२०)

    • बंदिवासात जाण्यासाठी सामान बांधलं जातं (१-७)

    • लोकांचा प्रधान अंधारात बाहेर पडेल (८-१६)

    • चिंतेची भाकर आणि दहशतीचं पाणी (१७-२०)

  • म्हण खोटी ठरेल (२१-२८)

    • “माझा कोणताही शब्द पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही” (२८)

१२  मला यहोवाकडून परत असा संदेश मिळाला, तो मला म्हणाला: २  “मनुष्याच्या मुला, तू बंडखोर लोकांच्या घराण्यात राहतोस. त्यांना डोळे असून ते बघत नाहीत, कान असून ते ऐकत नाहीत.+ कारण ते एक बंडखोर घराणं आहे.+ ३  मनुष्याच्या मुला, बंदिवासात जाण्यासाठी तू आपलं सामान बांध. मग भरदिवसा ते तुला पाहत असताना बंदिवासात जा. तू आपल्या घरातून निघ आणि त्यांच्या नजरेसमोर दुसऱ्‍या एखाद्या ठिकाणी बंदिवासात जा. ते बंडखोर घराण्यातले लोक असले तरी या सगळ्याचा काय अर्थ होतो याकडे ते कदाचित लक्ष देतील. ४  मग बंदिवासात जाण्यासाठी तू जे सामान बांधशील, ते दिवसा त्यांच्यासमोर बाहेर आण. आणि एखादा बंदिवासात जायला निघतो, तसा तू संध्याकाळी त्यांच्यासमोर जायला निघ.+ ५  ते तुला बघत असताना तू भिंतीला एक मोठं छिद्र कर आणि आपल्या सामानासोबत त्यातून बाहेर जा.+ ६  नंतर अंधार पडल्यावर ते तुला पाहत असताना आपलं सामान खांद्यावर घे आणि तिथून निघून जा. जाताना तू आपलं तोंड कपड्याने झाकून घे, म्हणजे तुला जमीन दिसणार नाही. कारण मी तुला इस्राएलच्या घराण्यासाठी एक चिन्ह म्हणून नेमतोय.”+ ७  मग, मला आज्ञा मिळाली होती तसंच मी केलं. बंदिवासात जाण्यासाठी जसं सामान बाहेर काढतात, तसं मी माझं सामान भरदिवसा बाहेर काढलं, आणि संध्याकाळी आपल्या हातांनी भिंत फोडून तिच्यात एक मोठं छिद्र केलं. नंतर, अंधार पडल्यावर मी त्यातून माझं सामान घेऊन बाहेर पडलो आणि त्यांच्यादेखत मी सामान खांद्यावर घेऊन निघालो. ८  मग सकाळी मला यहोवाकडून परत असा संदेश मिळाला: ९  “मनुष्याच्या मुला, त्या बंडखोर घराण्याने, इस्राएलच्या घराण्याने तुला असं विचारलंय ना, की ‘तू हे काय करतोस?’ १०  तर आता त्यांना असं सांग, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “हा न्यायसंदेश यरुशलेममधल्या प्रधानासाठी+ आणि शहरातल्या इस्राएलच्या संपूर्ण घराण्यासाठी आहे.”’ ११  तू त्यांना म्हण, ‘मी तुमच्यासाठी एक चिन्ह आहे.+ मी जसं केलं तसंच त्यांच्यासोबतही होईल. ते बंदिवासात आणि गुलामीत जातील.+ १२  त्यांच्यामध्ये जो प्रधान आहे, तो आपलं सामानसुमान खांद्यावर घेऊन अंधारात बाहेर पडेल. तो भिंत फोडून तिच्यात मोठं छिद्र पाडेल आणि आपल्या सामानासोबत त्यातून निघून जाईल.+ तो आपलं तोंड कपड्याने झाकून घेईल, म्हणजे त्याला जमीन दिसणार नाही.’ १३  मी त्याच्यावर माझं जाळं टाकीन आणि तो त्यात अडकेल.+ मग मी त्याला बाबेलमध्ये, खास्द्यांच्या देशात घेऊन जाईन. पण, तो देश त्याला पाहता येणार नाही; त्याचा तिथेच मृत्यू होईल.+ १४  त्याच्यासोबत असलेल्या सगळ्यांची, म्हणजे त्याला मदत करणाऱ्‍यांची आणि त्याच्या सैनिकांची मी चारही दिशांना पांगापांग करीन.+ आणि मी तलवार उपसून त्यांचा पाठलाग करीन.+ १५  मी जेव्हा राष्ट्रा-राष्ट्रांमध्ये आणि देशा-देशांमध्ये त्यांची पांगापांग करीन, तेव्हा त्यांना कळून येईल की मी यहोवा आहे. १६  पण, त्यांच्यातल्या काहींना मी तलवारीपासून, दुष्काळापासून आणि रोगराईपासून वाचवीन. म्हणजे ज्या-ज्या राष्ट्रांमध्ये ते जातील, त्या-त्या राष्ट्रांमध्ये ते आपल्या घृणास्पद कामांची कहाणी सांगतील. आणि त्यांना कळून येईल, की मी यहोवा आहे.” १७  नंतर परत एकदा मला यहोवाकडून असा संदेश मिळाला: १८  “मनुष्याच्या मुला, तू भीतीने थरथर कापत आपली भाकर खा आणि चिंताग्रस्त व दुःखी मनाने आपलं पाणी पी.+ १९  आणि देशातल्या लोकांना सांग, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा इस्राएलमध्ये राहत असलेल्या यरुशलेमच्या लोकांबद्दल असं म्हणतो: “ते चिंताग्रस्त होऊन आपली भाकर खातील आणि दहशतीत राहून आपलं पाणी पितील. कारण देशात राहणारे लोक करत असलेल्या हिंसेमुळे+ त्यांचा सगळा देश पूर्णपणे ओसाड होईल.+ २०  लोकांनी वसलेली सगळी शहरं उद्ध्‌वस्त होतील आणि देश पडीक जमिनीसारखा होईल.+ त्या वेळी तुम्हाला कळून येईल, की मी यहोवा आहे.”’”+ २१  मग यहोवाकडून मला आणखी एकदा असा संदेश मिळाला: २२  “मनुष्याच्या मुला, इस्राएलमध्ये अशी एक म्हण आहे ना, की ‘दिवस निघून चाललेत आणि एकही दृष्टान्त खरा होत नाही’?+ २३  म्हणून आता तू त्यांना असं सांग, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “मी ही म्हण नाहीशी करीन आणि इस्राएलमध्ये परत कधीच ते या म्हणीचा वापर करणार नाहीत.”’ पण तू त्यांना असं सांग, ‘दिवस जवळ आलेत,+ आणि प्रत्येक दृष्टान्त खरा ठरेल.’ २४  कारण इस्राएलच्या घराण्यात पुढे कधीच कोणी खोटे दृष्टान्त पाहणार नाही किंवा फसवे* शकुन सांगणार नाही.+ २५  ‘“कारण मी, यहोवा बोलेन. आणि मी जे काही बोलेन ते पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही.+ हे बंडखोर घराण्या! तुझ्या जीवनकाळात+ मी बोलेन आणि ते पूर्णही करेन,” असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.’” २६  नंतर यहोवाकडून मला पुन्हा एकदा असा संदेश मिळाला: २७  “मनुष्याच्या मुला, इस्राएलच्या घराण्यातले लोक असं म्हणत आहेत, ‘हा माणूस जो दृष्टान्त बघतो, तो पूर्ण व्हायला अजून बराच काळ आहे, आणि तो जी भविष्यवाणी करतो ती खूप पुढच्या काळासाठी आहे.’+ २८  म्हणून त्यांना असं सांग, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “‘माझा कोणताही शब्द पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही; मी जे बोलेन ते पूर्ण होईलच,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.”’”

तळटीपा

किंवा “खूश करणारे.”