यशया ५३:१-१२

  • यहोवाच्या सेवकाचा छळ, मृत्यू आणि त्याचं दफन (१-१२)

    • त्याला तुच्छ समजण्यात आलं आणि टाळलं गेलं ()

    • त्याने आजार आणि दुःखं वाहिली ()

    • “एखाद्या मेंढरासारखं त्याला कत्तल करण्यासाठी नेण्यात आलं” ()

    • “त्याने अनेकांच्या पापांचं ओझं वाहिलं” (१२)

५३  आमच्याकडून ऐकलेल्या गोष्टीवर* कोणी विश्‍वास ठेवला आहे?+ आणि यहोवाच्या हाताचं सामर्थ्य+ कोणाला प्रकट झालं आहे?+  २  तो त्याच्यासमोर* एका छोट्या फांदीसारखा वाढेल,+ कोरड्या जमिनीत तो मुळासारखा रुजेल. त्याचं रूप दिमाखदार नाही किंवा वैभवशाली नाही;+त्याला पाहून आकर्षित व्हावं असंही त्याचं रूप नाही.  ३  त्याला तुच्छ समजण्यात आलं आणि लोकांनी त्याला टाळलं,+दुःख काय असतं हे त्या माणसाला चांगलं समजत होतं, आणि आजारपण काय असतं हे त्याला चांगलं माहीत होतं. त्याचा चेहरा जसा काय आमच्यापासून लपलेला होता.* त्याला तुच्छ समजण्यात आलं, आणि आम्ही त्याची काहीच किंमत केली नाही.+  ४  खरंच, त्याने आमचे आजार+ आणि आमची दुःखं स्वतःवर घेतली.+ आम्ही मात्र त्याला पिडलेला, देवाकडून शिक्षा झालेला आणि दुःख सोसलेला असं समजलं.  ५  पण आमच्या अपराधांसाठी+ त्याला भोसकलं गेलं;+आमच्या पापांसाठी त्याला चिरडलं गेलं.+ त्याला झालेल्या शिक्षेमुळे आम्हाला शांती मिळाली,+आणि त्याला झालेल्या जखमांमुळे आम्ही बरे झालो.+  ६  आम्ही सगळे मेंढरांसारखे भरकटलेले आहोत,+प्रत्येक जण आपापल्या मार्गाने चालत आहे,आणि आमच्या सगळ्यांच्या पापांचा भार यहोवाने त्याच्यावर लादला आहे.+  ७  त्याच्यावर जुलूम करण्यात आले,+ पण त्याने ते सोसले.+ त्याने आपल्या तोंडातून एक शब्दही काढला नाही. एखाद्या मेंढरासारखं त्याला कत्तल करण्यासाठी नेण्यात आलं.+ मेंढी जशी लोकर कातरणाऱ्‍यांपुढे गप्प राहते,तसं तो गप्प राहिला; त्याने आपलं तोंड उघडलं नाही.+  ८  त्याच्यावर जुलूम करण्यात आला आणि योग्य न्याय न करताच त्याला नेण्यात आलं;कोणी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला का, की तो कोण आहे, कुठला आहे?* त्याला जिवंतांच्या देशातून छाटून टाकण्यात आलं;+माझ्या लोकांच्या अपराधांसाठी त्याला मारण्यात आलं.*+  ९  त्याने कोणताही अपराध केला नव्हता,आणि त्याच्या तोंडून कपटीपणाच्या* गोष्टी कधी निघाल्या नव्हत्या.+ पण तरी दुष्टांच्या कबरेत त्याची कबर नेमण्यात आली,*+आणि मृत्यूनंतर त्याला श्रीमंताच्या कबरेत पुरण्यात आलं.+ १०  पण, तो चिरडला जावा ही यहोवाची इच्छा होती, आणि म्हणून त्याने त्याला दुःख सोसू दिलं. हे देवा, तू जर त्याचं जीवन दोषार्पण म्हणून दिलंस,+तर तो आपली संतती* पाहील, आणि त्याला दीर्घायुष्य लाभेल.+ आणि त्याच्याद्वारे यहोवाची इच्छा पूर्ण होईल.+ ११  सगळं काही सोसल्यानंतर तो आपल्या कष्टाचं फळ पाहील आणि त्याला समाधान मिळेल. माझा नीतिमान सेवक+ आपल्या ज्ञानाने अनेकांना नीतिमान ठरायला मदत करेल,+आणि तो त्यांच्या पापांचा भार वाहील.+ १२  म्हणून मी त्याला अनेकांसोबत वाटा देईन,आणि तो शूरवीरांसोबत लूट वाटून घेईल. कारण त्याने आपलं जीवन दिलं,*+आणि त्याला अपराध्यांमध्ये मोजण्यात आलं;+त्याने अनेकांच्या पापांचं ओझं वाहिलं,+आणि अपराध्यांसाठी त्याने मध्यस्थी केली.+

तळटीपा

किंवा कदाचित, “आम्ही ऐकलेल्या गोष्टीवर.”
“त्याच्यासमोर,” हे पाहणाऱ्‍या एखाद्या माणसाला किंवा देवाला सूचित करत असावं.
किंवा कदाचित, “त्याला पाहून लोक आपलं तोंड फिरवायचे.”
शब्दशः “त्याच्या पिढीची माहिती जाणून घेण्याचा कोणी प्रयत्न केला का?”
किंवा “मारून टाकण्यात आलं.”
किंवा “हिंसेच्या.”
किंवा “तो त्याची कबर दुष्टांच्या कबरेत नेमेल.”
शब्दशः “बीज.”
शब्दशः “मरेपर्यंत आपलं जीवन ओतलं.”