यशया ४१:१-२९

  • विजय मिळवणारा पूर्वेकडून येतो (१-७)

  • देवाचा सेवक म्हणून इस्राएलची निवड (८-२०)

    • अब्राहाम देवाचा मित्र ()

  • इतर दैवतांना आव्हान (२१-२९)

४१  “हे द्वीपांनो!* शांत राहा आणि माझं ऐका;* राष्ट्रांनो! नव्या जोमाने भरून जा;माझ्यापुढे या आणि मग बोला.+ आपण समोरासमोर येऊ म्हणजे मी तुमचा न्याय करीन.  २  पूर्वेकडून ज्याने एकाला बोलावलंय, तो कोण?+ न्याय करण्यासाठी ज्याने त्याला आपल्या पायांजवळ बोलावलंय,* तो कोण? ज्याने राष्ट्रांना त्याच्या हाती देण्यासाठी,आणि राजांना त्याच्या अधीन करण्यासाठी त्याला बोलावलंय, तो कोण?+ ज्याने त्याच्या तलवारीपुढे त्यांना धुळीस मिळवलंय,आणि त्याच्या धनुष्यापुढे त्यांना वाऱ्‍याने उडणाऱ्‍या भुशासारखं केलंय, तो कोण?  ३  तो त्यांचा पाठलाग करतो;आणि ज्या रस्त्यांवरून तो कधी गेला नाही त्यांवरून तो न अडखळता जातो.  ४  हे सगळं कोणी केलं? या सगळ्या गोष्टी कोणी घडवून आणल्या? सुरुवातीपासून पिढ्यांना एकापाठोपाठ एक कोणी बोलावलं? मी, यहोवा यानेच हे केलंय. मी सगळ्यात पहिला आहे,+आणि शेवटच्या पिढ्यांसाठीही मी कधी बदलणार नाही.”+  ५  द्वीपांनी हे पाहिलं आणि त्यांचा थरकाप उडाला. पृथ्वीचे कानेकोपरेही हादरू लागले. ते एकत्र जमून पुढे आले.  ६  प्रत्येक जण आपल्या सोबत्याला मदत करतो,आणि आपल्या भावाला म्हणतो: “हिंमत धर.”  ७  कारागीर धातूकाम करणाऱ्‍याला धीर देतो.+ हातोड्याने धातू सपाट करणारा ऐरणीवर काम करणाऱ्‍याला धीर देतो. तो त्याला म्हणतो: “धातूचा जोड छान बसलाय.” मग मूर्ती स्थिर उभी राहावी म्हणून तो खिळे ठोकून ती पक्की बसवतो.  ८  “पण हे इस्राएल, तू माझा सेवक आहेस.+ हे याकोब, मी तुला निवडलंय.+ तू माझ्या मित्राची, अब्राहामची संतती* आहेस.+  ९  मी तुला पृथ्वीच्या टोकांपासून आणलं,+तिच्या अगदी दूरच्या भागांतून तुला बोलावून घेतलं. मी तुला म्हणालो, ‘तू माझा सेवक आहेस;+मी तुला निवडलंय; मी तुझा त्याग केलेला नाही.+ १०  भिऊ नकोस, मी तुझ्यासोबत आहे.+ घाबरू नकोस, मी तुझा देव आहे.+ मी तुला बळ देईन; हो, मी तुला मदत करीन.+ नीतिमत्त्वाच्या माझ्या उजव्या हाताने मी तुला आधार देईन.’ ११  बघ! तुझ्याविरुद्ध रागाने पेटून उठणारे सगळे जण लज्जित आणि अपमानित होतील.+ तुझ्याशी लढणाऱ्‍यांना धुळीस मिळवून त्यांचं नामोनिशाण मिटवलं जाईल.+ १२  तुझ्याशी संघर्ष करणाऱ्‍यांना तू शोधशील, पण तुला ते सापडणार नाहीत;तुझ्याशी युद्ध करणाऱ्‍या माणसांचं अस्तित्व नाहीसं होईल; ते शून्यवत होतील.+ १३  कारण मी तुझा देव यहोवा, तुझा उजवा हात धरून तुला म्हणत आहे,‘घाबरू नकोस, मी तुला मदत करीन.’+ १४  हे याकोब! लहानशा कीटका,* घाबरू नकोस.+ हे इस्राएलच्या लोकांनो, मी तुम्हाला मदत करीन,” असं तुमची सुटका करणारा,+ इस्राएलचा पवित्र देव यहोवा म्हणतो. १५  “बघ! मी तुला मळणीच्या फळीसारखं केलंय;+धारदार दात असलेल्या मळणीच्या नव्या अवजारासारखं केलंय. तू डोंगरांची मळणी करून त्यांचा चुराडा करशील,आणि टेकड्यांचा भुसा करून टाकशील. १६  तू त्यांची पाखडणी करशील,आणि वारा त्यांना उडवून नेईल;सोसाट्याच्या वाऱ्‍याने ते विखुरले जातील. यहोवामुळे तू खूप आनंदी होशील,+आणि इस्राएलच्या पवित्र देवाबद्दल तू गर्वाने बोलशील.”+ १७  “गरीब आणि गरजू लोक पाण्यासाठी वणवण भटकतात, पण त्यांना ते मिळत नाही. तहानेने त्यांची जीभ कोरडी पडली आहे.+ मी, यहोवा त्यांना मदत करीन.+ मी, इस्राएलचा देव त्यांना कधीही सोडून देणार नाही.+ १८  मी उजाड पडलेल्या टेकड्यांवर नद्या,+आणि खोऱ्‍यांतल्या मैदानांत पाण्याचे झरे वाहायला लावीन.+ ओसाड रानांना मी पाण्याचं तळं* बनवीन,आणि कोरड्या प्रदेशांना मी पाण्याचे झरे करून टाकीन.+ १९  वाळवंटात मी देवदाराची, बाभळीची, मेंदीची आणि पाईनची झाडं लावीन.+ वाळवंटी प्रदेशात मी गंधसरूची, भद्रदारूची आणि सुरूची झाडं लावीन.+ २०  म्हणजे सर्व लोक हे बघतील आणि त्यांना कळेल,ते लक्ष देतील आणि त्यांना समजेल,की हे स्वतः यहोवाने, इस्राएलच्या पवित्र देवाने केलंय.”+ २१  यहोवा म्हणतो, “तुमचा खटला पुढे आणा.” याकोबचा राजा म्हणतो, “तुमची बाजू मांडा. २२  पुरावे सादर करा आणि पुढे काय घडेल ते आम्हाला सांगा. मागे घडून गेलेल्या गोष्टींबद्दल आम्हाला सांगा,म्हणजे आम्ही त्यांवर विचार करू आणि त्यांचा परिणाम आम्हाला कळेल. किंवा मग पुढे होणाऱ्‍या गोष्टींबद्दल आम्हाला सांगा.+ २३  भविष्यात काय घडेल ते आम्हाला सांगा,म्हणजे तुम्ही देव आहात हे आम्हाला कळेल.+ हो, काहीतरी करून दाखवा! चांगलं किंवा वाईट काहीतरी करा,म्हणजे ते पाहून आम्ही चकित होऊ.+ २४  पाहा! तुम्ही असून नसल्यासारखे आहात,आणि तुमची कामं शून्यवत आहेत.+ जो कोणी तुमची उपासना करण्याची निवड करतो तो किळसवाणा आहे.+ २५  मी एकाला प्रवृत्त केलंय आणि तो उत्तरेकडून येईल.+ पूर्वेकडे राहणारा+ तो, माझ्या नावाचा गौरव करेल. कुंभार जसं ओली माती पायांखाली तुडवतो,तसं तो शासकांना* चिखलाप्रमाणे आपल्या पायांखाली तुडवेल.+ २६  आम्हाला हे कळावं, म्हणून सुरुवातीपासून ही गोष्ट कोणी सांगितली? किंवा ‘तो बरोबर आहे’ असं आम्ही म्हणावं, म्हणून पूर्वीपासून ही गोष्ट कोणी सांगितली?+ खरंतर कोणीच नाही! कोणीच त्याविषयी घोषणा केली नाही! कोणीही तुमच्याकडून काही ऐकलं नाही!”+ २७  सगळ्यात आधी मीच सीयोनला म्हणालो: “काय होणार आहे ते बघ!”+ मी एकाला आनंदाचा संदेश घेऊन यरुशलेमला पाठवीन.+ २८  मी पाहत राहिलो, पण मला कोणीच दिसलं नाही;सल्ला देणारा त्यांच्यामध्ये कोणीही नव्हता. मी विचारत राहिलो, पण कोणीच उत्तर दिलं नाही. २९  पाहा! ते सर्व निरुपयोगी आहेत,*त्यांची कामं व्यर्थ आहेत. त्यांच्या धातूच्या ओतीव मूर्ती वायफळ आणि शून्यवत आहेत.+

तळटीपा

किंवा “माझ्यापुढे गप्प राहा.”
किंवा “बेटांनो.”
म्हणजे, आपल्या सेवेसाठी.
शब्दशः “बीज.”
म्हणजे, लाचार आणि दीनदुबळा.
शब्दशः “बोरू असलेलं तळं.”
किंवा “उपअधिकाऱ्‍यांना.”
किंवा “जणू अस्तित्वातच नाहीत.”