यशया १४:१-३२

  • इस्राएली लोक आपल्या देशात राहतील (१, २)

  • बाबेलच्या राजाला टोमणे मारले जातात (३-२३)

    • तेजस्वी तारा आकाशातून खाली पडेल (१२)

  • यहोवाचा हात अश्‍शूरला चिरडेल (२४-२७)

  • पलेशेथविरुद्ध न्यायाचा संदेश (२८-३२)

१४  यहोवा याकोबवर दया करेल+ आणि पुन्हा इस्राएलला निवडेल.+ तो त्यांना त्यांच्या देशात वसवेल.*+ विदेशी लोक त्यांना येऊन मिळतील आणि स्वतःला याकोबच्या घराण्याशी जोडतील.+ २  राष्ट्रा-राष्ट्रांतले लोक इस्राएली लोकांना त्यांच्या देशात पोहोचवतील. आणि इस्राएलचं घराणं त्या लोकांना यहोवाच्या देशात आपले दास आणि दासी म्हणून ठेवून घेईल;+ ज्यांनी त्यांना बंदी बनवलं होतं, त्यांनाच ते बंदी बनवतील. आणि जे त्यांच्याकडून बळजबरीने काम करून घ्यायचे, त्यांना ते आपल्या अधीन करतील. ३  ज्या दिवशी यहोवा तुला तुझ्या सगळ्या दुःखातून, चिंतेतून आणि तुझ्यावर लादलेल्या सक्‍तीच्या गुलामगिरीतून विसावा देईल,+ ४  त्या दिवशी तू बाबेलच्या राजाला टोमणे मारून असं म्हणशील: “पाहा! दुसऱ्‍यांकडून जबरदस्तीने काम करून घेणाऱ्‍याचा कसा अंत झालाय! त्याच्या जुलमाचा बघा कसा शेवट झालाय!+  ५  यहोवाने दुष्टाची छडी आणि शासकांची काठी मोडून टाकली आहे;+  ६  रागाने पेटून लोकांना वारंवार फटके मारणाऱ्‍याला,+संतापून राष्ट्रांचा सतत छळ करणाऱ्‍याला,+आणि त्यांना आपल्या अधीन करणाऱ्‍याला, त्याने मोडून टाकलंय.  ७  आता संपूर्ण पृथ्वीला विसावा मिळालाय, सगळीकडे शांती आहे;आणि लोक जल्लोष करत आहेत.+  ८  तुझी अवस्था पाहून गंधसरूच्या झाडांना,आणि लबानोनच्या देवदार वृक्षांनाही आनंद झालाय. ते म्हणतात, ‘बरं झालं तू पडलास! आता कोणताही लाकूडतोड्या आमच्या विरोधात येणार नाही.’  ९  तू इथे येणार म्हणून तुला भेटायला खाली कबरेतसुद्धा* गडबड उडाली आहे. तुझ्यासाठी कबर मेलेल्यांना उठवत आहे,पृथ्वीवरच्या सगळ्या जुलमी अधिकाऱ्‍यांना* ती जागं करत आहे. ती राष्ट्रांच्या सर्व राजांना त्यांच्या राजासनांवरून उठवत आहे. १०  ते सगळे तुला म्हणतात,‘तूही आमच्यासारखाच कमजोर झालास! तुझी दशा आमच्यासारखीच झाली! ११  तुझा अहंकार आणि तुझ्या तंतुवाद्यांचा गाजावाजा,हे सगळं खाली कबरेत* आणण्यात आलंय.+ किडे तुझं अंथरूण आणि अळ्या तुझं पांघरूण बनल्या आहेत.’ १२  हे तेजस्वी ताऱ्‍या! हे प्रभातपुत्रा! तू कसा काय आकाशातून खाली पडलास? राष्ट्रांना धुळीस मिळवणाऱ्‍या,तुला कसं काय जमिनीवर लोळवण्यात आलं?+ १३  तू आपल्या मनात म्हणालास, ‘मी आकाशात वर चढून जाईन.+ मी माझं सिंहासन देवाच्या ताऱ्‍यांच्याही वर स्थापन करीन.+ मी उत्तरेच्या सर्वात दूरच्या भागात,सभेच्या पर्वतावर जाऊन बसेन.+ १४  मी ढगांच्याही वर जाईन;मी स्वतःला सर्वोच्च देवासारखं करीन.’ १५  पण तुला तर खाली कबरेत,*खड्ड्याच्या सगळ्यात खालच्या भागात टाकलं जाईल. १६  तुला पाहणारे तुझ्याकडे डोळे फाडून पाहतील;ते जवळून तुझं निरीक्षण करतील, आणि म्हणतील,‘पृथ्वी हादरवून टाकणारा आणि राज्यांचा थरकाप उडवणारा, तो हाच ना?+ १७  ज्याने पृथ्वी ओसाड केली आणि तिची शहरं उलथवून टाकली,+ज्याने आपल्या बंदिवानांना जाऊ दिलं नाही, तो हाच ना?’+ १८  सर्व राष्ट्रांच्या राजांना,हो, त्या सगळ्यांना मानसन्मानाने दफन करण्यात आलं,प्रत्येकाला आपापल्या कबरेत पुरण्यात आलं. १९  पण तुला तर कबरही लाभली नाही. तुला कुजलेल्या फांदीप्रमाणे टाकून देण्यात आलंय. तलवारीला बळी पडलेले,दगडांनी भरलेल्या खड्ड्यात फेकलेले,अशांच्या प्रेतांमध्ये तू पडला आहेस. पायांखाली तुडवलेल्या एखाद्या शवाप्रमाणे तुला टाकून देण्यात आलंय. २०  तुला राजांसोबत पुरलं जाणारं नाही,कारण तू स्वतःच्याच देशाचा नाश केलास,आणि स्वतःच्याच लोकांना मारून टाकलंस. यापुढे दुष्टांच्या मुलांचं नावही कोणी काढणार नाही. २१  वाडवडिलांच्या अपराधांमुळे त्यांच्या मुलांची कत्तल करायची तयारी करा. नाहीतर ते शक्‍तिशाली होऊन पृथ्वी आपल्या ताब्यात घेतील,आणि आपल्या शहरांनी ती भरून टाकतील.” २२  सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “मी त्यांच्या विरोधात उठेन.”+ यहोवा म्हणतो: “मी बाबेलचं नाव आणि तिचे उरलेले लोक, तिचे वंशज आणि तिच्या येणाऱ्‍या पिढ्या यांचा समूळ नाश करून टाकीन.”+ २३  सैन्यांचा देव यहोवा म्हणतो: “मी तिला साळिंदरांचं राहण्याचं ठिकाण आणि दलदलीचा प्रदेश बनवीन. मी तिला विनाशाच्या झाडूने झाडून टाकीन.”+ २४  सैन्यांचा देव यहोवा शपथ घेऊन म्हणालाय: “मी मनात जसं ठरवलंय, तसंच घडून येईल. मी जो निश्‍चय केलाय, तो नक्कीच पूर्ण होईल. २५  मी अश्‍शूरला माझ्या देशात चिरडीन,मी त्याला माझ्या डोंगरांवर पायांखाली तुडवीन.+ माझ्या लोकांवर त्याने लादलेलं जू* काढून टाकलं जाईल,त्यांच्या खांद्यांवर त्याने टाकलेलं ओझं उतरवलं जाईल.”+ २६  संपूर्ण पृथ्वीच्या बाबतीत हेच ठरवण्यात आलंय,आणि सर्व राष्ट्रांवर उगारलेला त्याचा हात हाच आहे. २७  कारण सैन्यांच्या देवाने, यहोवाने जे ठरवलंय ते कोण बदलू शकेल?+ त्याने उगारलेला हात कोण मागे घेऊ शकेल?+ २८  आहाज राजाचा मृत्यू झाला+ त्या वर्षी देवाने असा न्यायसंदेश दिला: २९  “हे पलेशेथ! तुला मारणारी काठी मोडण्यात आली म्हणून खूश होऊ नकोस. कारण सापाच्या वंशातून*+ एक विषारी साप निघेल,+आणि त्याचा वंशज एक चपळ व जहरी साप* असेल. ३०  गोरगरिबांची मुलं पोटभर खातील,आणि दीनदुबळे सुखाने झोपतील. पण तुझ्या लोकांना* मात्र मी उपासमारीने मारून टाकीन,आणि तुझे उरलेले लोक ठार मारले जातील.+ ३१  अरे शहरा, शोक कर! हे दरवाजा, आक्रोश कर! हे पलेशेथच्या लोकांनो! तुमच्या सगळ्यांचा धीर खचेल. कारण उत्तरेकडून एक सैन्य धुरासारखं येत आहे,आणि त्याच्या सैनिकांपैकी एकही मागे राहणार नाही.” ३२  राष्ट्राच्या दूतांना ते काय उत्तर देतील? हेच, की यहोवाने सीयोनचा पाया घातला आहे,+आणि त्याच्या लोकांपैकी जे दीनदुबळे ते तिच्यात आश्रय घेतील.

तळटीपा

किंवा “विसावा देईल.”
हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “बोकडांना.”
हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.
हिब्रू भाषेत “शिओल.”  शब्दार्थसूची पाहा.
शब्दशः “मुळातून.”
किंवा “उडता आग्या साप.”
शब्दशः “तुझं मूळ.”