मत्तयने सांगितलेला संदेश २३:१-३९
२३ मग येशू जमलेल्या लोकांना आणि आपल्या शिष्यांना म्हणाला:
२ “शास्त्री आणि परूशी यांनी मोशेची जागा घेतली आहे.
३ म्हणून, ज्या गोष्टी ते तुम्हाला करायला सांगतात त्या सगळ्या करा, पण त्यांच्यासारखं वागू नका. कारण ते बोलतात पण त्याप्रमाणे वागत नाहीत.+
४ ते जड ओझी बांधून लोकांच्या खांद्यांवर लादतात,+ पण स्वतः तर त्या ओझ्याला बोटही लावत नाहीत.+
५ ते जे काही करतात ते लोकांनी आपल्याला पाहावं म्हणून करतात.+ कारण ज्या शास्त्राच्या डब्या* ते ताईत म्हणून घालतात, त्यांचा आकार ते मुद्दामहून वाढवतात+ आणि आपल्या झग्यांचे गोंडे मोठे करतात.+
६ त्यांना मेजवान्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या जागेवर आणि सभास्थानांतल्या पुढच्या* आसनांवर बसायला आवडतं.+
७ शिवाय, बाजारांत इतरांनी आपल्याला आदराने नमस्कार करावा आणि लोकांनी आपल्याला रब्बी* म्हणावं असं त्यांना वाटतं.
८ पण तुम्ही स्वतःला रब्बी म्हणवून घेऊ नका. कारण तुमचा गुरू+ एकच आहे आणि तुम्ही सगळे भाऊ आहात.
९ तसंच, पृथ्वीवर कोणालाही पिता म्हणू नका. कारण तुमचा पिता+ एकच आहे आणि तो स्वर्गात राहतो.
१० स्वतःला प्रमुखही म्हणवून घेऊ नका. कारण तुमच्यात प्रमुख फक्त एकच, म्हणजे ख्रिस्त आहे.
११ उलट तुमच्यामध्ये जो सर्वात मोठा त्याने तुमचा सेवक व्हावं.+
१२ जो स्वतःचा गौरव करतो त्याला नमवलं जाईल+ आणि जो स्वतःला नम्र करतो त्याचा गौरव केला जाईल.+
१३ अरे ढोंगी शास्त्र्यांनो आणि परूश्यांनो, तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही लोकांसाठी स्वर्गाच्या राज्याचं दार बंद करता. तुम्ही स्वतः तर आत जातच नाही, पण जे जात आहेत त्यांनाही जाऊ देत नाही.+
१४ *——
१५ अरे ढोंगी शास्त्र्यांनो आणि परूश्यांनो,+ तुमचा धिक्कार असो! कारण एखाद्याला यहुदी धर्म स्वीकारायला लावण्यासाठी तुम्ही समुद्र आणि जमीन पालथी घालता. आणि जेव्हा तो तसं करतो, तेव्हा तुम्ही त्याला स्वतःपेक्षा दुप्पट, गेहेन्नात* जाण्याच्या लायकीचं बनवता.
१६ दुसऱ्यांना मार्ग दाखवणाऱ्या आंधळ्यांनो,+ तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही म्हणता, ‘एखाद्याने मंदिराच्या नावाने शपथ घेतली तर त्यात काहीच नाही. पण जर कोणी मंदिराच्या सोन्याची शपथ घेतली, तर ती पूर्ण करणं त्याचं कर्तव्य आहे.’+
१७ मूर्खांनो आणि आंधळ्यांनो! दोन्हीपैकी खरंतर कोणतं जास्त महत्त्वाचं आहे, मंदिराचं सोनं की ज्यामुळे ते सोनं पवित्र झालं ते मंदिर?
१८ तुम्ही असंही म्हणता, की ‘कोणी वेदीच्या नावाने शपथ घेतली तर त्यात काहीच नाही. पण जर कोणी त्यावरच्या अर्पणाच्या नावाने शपथ घेतली, तर ती पूर्ण करणं त्याचं कर्तव्य आहे.’
१९ अरे आंधळ्यांनो! खरंतर जास्त महत्त्वाचं काय आहे, अर्पण की ज्यामुळे ते अर्पण पवित्र होतं ती वेदी?
२० म्हणून, जो वेदीची शपथ घेतो, तो वेदीची आणि तिच्यावर असलेल्या सगळ्या गोष्टींची शपथ घेतो.
२१ आणि जो मंदिराची शपथ घेतो, तो मंदिराची आणि त्यात राहणाऱ्या देवाची+ शपथ घेतो.
२२ आणि जो स्वर्गाची शपथ घेतो, तो देवाच्या राजासनाची आणि त्यावर बसणाऱ्याची शपथ घेतो.
२३ अरे ढोंगी शास्त्र्यांनो आणि परूश्यांनो, तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही पुदिना, बडीशेप आणि जिरं यांचा दहावा भाग* देता.+ पण, नियमशास्त्रातल्या जास्त महत्त्वाच्या गोष्टी, म्हणजेच न्याय,+ दया+ आणि विश्वासूपणा यांकडे तुम्ही दुर्लक्ष केलंय. या गोष्टी देणं तर आवश्यक होतंच, पण इतर गोष्टींकडे दुर्लक्ष न करता!+
२४ दुसऱ्यांना मार्ग दाखवणाऱ्या आंधळ्यांनो!+ तुम्ही माशी गाळून काढता+ पण उंट गिळून टाकता!+
२५ अरे ढोंगी शास्त्र्यांनो आणि परूश्यांनो, तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही प्याला आणि ताट बाहेरून स्वच्छ करता,+ पण आतून ते लोभ*+ आणि बेतालपणा* यांनी भरलेलं आहे.+
२६ अरे आंधळ्या परूश्या, आधी प्याला आणि ताट आतून स्वच्छ कर, म्हणजे ते बाहेरूनपण स्वच्छ होईल.
२७ अरे ढोंगी शास्त्र्यांनो आणि परूश्यांनो,+ तुमचा धिक्कार असो! तुम्ही चुना लावलेल्या कबरींसारखे आहात.+ त्या बाहेरून तर फार सुंदर दिसतात, पण आत त्या मेलेल्या माणसांच्या हाडांनी आणि सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत.
२८ त्याच प्रकारे तुम्हीही लोकांना बाहेरून नीतिमान दिसता, पण आत तुम्ही ढोंगीपणाने आणि अनीतीने भरलेले आहात.+
२९ अरे ढोंगी शास्त्र्यांनो आणि परूश्यांनो,+ तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरी बांधता आणि नीतिमान माणसांच्या कबरी* सजवता,+
३० आणि म्हणता, ‘जर आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात राहत असतो, तर संदेष्ट्यांची हत्या करण्यात आम्ही त्यांना साथ दिली नसती.’
३१ असं म्हणून खरंतर, आपण संदेष्ट्यांची हत्या करणाऱ्यांची मुलं आहोत अशी तुम्ही स्वतःच आपल्याविरुद्ध साक्ष देत आहात.+
३२ तर आता, तुमच्या वाडवडिलांच्या कृत्यांमध्ये राहिलेली कमी तुम्ही भरून काढा.
३३ विषारी सापाच्या पिल्लांनो,+ गेहेन्नाच्या* न्यायदंडापासून तुम्ही कसं वाचाल?+
३४ म्हणूनच, मी तुमच्याकडे संदेष्टे,+ विद्वान आणि लोकांना शिकवणारे शिक्षक+ पाठवतोय. त्यांच्यापैकी काहींना तुम्ही ठार माराल+ आणि वधस्तंभावर* मृत्युदंड द्याल, तर काहींना तुमच्या सभास्थानांत फटके माराल+ आणि एका शहरातून दुसऱ्या शहरात त्यांच्यामागे जाऊन त्यांचा छळ कराल.+
३५ यासाठी की, नीतिमान हाबेलच्या+ रक्तापासून, बरख्याचा मुलगा जखऱ्या ज्याला तुम्ही मंदिराच्या आणि वेदीच्या मधोमध ठार मारलं+ त्याच्या रक्तापर्यंत, ज्या सगळ्या नीतिमान माणसांचं रक्त आजपर्यंत पृथ्वीवर सांडण्यात आलंय, त्याचा दोष तुमच्यावर यावा.
३६ मी तुम्हाला खरं सांगतो, या सर्व गोष्टी या पिढीवर येतील.
३७ यरुशलेम, यरुशलेम, संदेष्ट्यांची हत्या करणारी आणि तुझ्याकडे पाठवलेल्यांना दगडमार करणारी नगरी!+ कोंबडी जशी आपल्या पिल्लांना आपल्या पंखांखाली एकत्र करते, तसंच तुमच्या मुलांना एकत्र करण्याची माझी कितीतरी वेळा इच्छा होती! पण तुम्हाला ते नको होतं.+
३८ म्हणून पाहा! देवाने तुमच्या घराचा* त्याग केलाय.*+
३९ कारण मी तुम्हाला सांगतो, की आतापासून, ‘यहोवाच्या* नावाने येणारा आशीर्वादित असो,’+ असं जोपर्यंत तुम्ही म्हणणार नाही तोपर्यंत तुम्ही मला पाहणारच नाही!”
तळटीपा
^ यहुदी लोक कपाळावर आणि डाव्या हातावर शास्त्रपट असलेली एक लहानशी पेटी बांधायचे. यामुळे वाइटापासून आपलं रक्षण होईल असा त्यांचा समज होता.
^ किंवा “सर्वात चांगल्या.”
^ किंवा “गुरू.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “दशांश.” शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “लुटीचा माल.”
^ किंवा “असंयम.”
^ किंवा “स्मारक कबरी.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ म्हणजे, मंदिराचा.
^ किंवा कदाचित, “ओसाड होण्यासाठी सोडून दिलंय.”