प्रेषितांची कार्यं ८:१-४०

  • छळ करणारा शौल (१-३)

  • शोमरोन इथे फिलिप्पच्या सेवेचे चांगले परिणाम (४-१३)

  • पेत्र आणि योहानला शोमरोनला पाठवलं जातं (१४-१७)

  • शिमोन पवित्र शक्‍ती विकत घ्यायचा प्रयत्न करतो (१८-२५)

  • कूशी षंढ (२६-४०)

 पण शौलला त्याची ही हत्या मान्य होती.+ त्या दिवशी यरुशलेम इथे असलेल्या मंडळीविरुद्ध छळाची लाट उसळली. प्रेषितांशिवाय बाकी सगळे जण यहूदीया आणि शोमरोनच्या प्रदेशांत विखुरले गेले.+ २  पण देवाची भीती बाळगणाऱ्‍या काही माणसांनी स्तेफनला नेऊन पुरलं आणि त्यांनी त्याच्यासाठी खूप शोक केला. ३  त्याच वेळी, शौल मंडळीला सतावू लागला. तो घरोघरी जाऊन पुरुषांना आणि स्त्रियांना बाहेर ओढून काढायचा आणि त्यांना तुरुंगात डांबायचा.+ ४  पण जे विखुरले गेले होते, ते संपूर्ण देशात वचनाबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करत गेले.+ ५  मग फिलिप्प शोमरोनच्या शहरात*+ जाऊन तिथल्या लोकांना ख्रिस्ताबद्दल शिकवू लागला. ६  फिलिप्पने सांगितलेल्या गोष्टींकडे सगळ्या लोकांनी लक्ष दिलं. ते त्याचं बोलणं मन लावून ऐकत होते आणि त्याने केलेले चमत्कार* पाहत होते. ७  कारण बरेच जण दुष्ट स्वर्गदूतांनी* पछाडलेले होते. आणि त्यांच्यामधून ते दुष्ट स्वर्गदूत मोठ्याने ओरडून बाहेर निघायचे.+ शिवाय, बऱ्‍याच लुळ्यापांगळ्या लोकांनाही बरं करण्यात आलं. ८  यामुळे त्या शहरातल्या लोकांना खूप आनंद झाला. ९  त्याच शहरात शिमोन नावाचा एक माणूस राहत होता. तो पूर्वी जादूटोणा करून शोमरोनी लोकांना थक्क करायचा आणि आपण कोणीतरी महान आहोत, असं सगळ्यांना सांगायचा. १०  लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे त्याचं लक्षपूर्वक ऐकायचे आणि म्हणायचे: “हा माणूस म्हणजे देवाची महाशक्‍ती आहे.” ११  त्याने बऱ्‍याच काळापासून त्यांना आपल्या जादूटोण्याने चकित केलं असल्यामुळे ते त्याचं लक्षपूर्वक ऐकायचे. १२  पण देवाच्या राज्याबद्दलचा आणि येशू ख्रिस्ताच्या नावाबद्दलचा आनंदाचा संदेश घोषित करणाऱ्‍या फिलिप्पवर+ त्या लोकांचा विश्‍वास बसला. तेव्हा बऱ्‍याच स्त्रीपुरुषांनी बाप्तिस्मा घेतला.+ १३  खुद्द शिमोननेही विश्‍वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर तो नेहमी फिलिप्पसोबत राहू लागला.+ फिलिप्पच्या हातून घडणारे चमत्कार आणि अद्‌भुत कार्यं पाहून त्याला फार आश्‍चर्य वाटायचं. १४  शोमरोनच्या लोकांनी देवाचं वचन स्वीकारल्याचं यरुशलेममध्ये असलेल्या प्रेषितांनी ऐकलं,+ तेव्हा त्यांनी पेत्र आणि योहान यांना त्यांच्याकडे पाठवलं. १५  आणि त्यांनी तिथे जाऊन त्यांना पवित्र शक्‍ती* मिळावी म्हणून प्रार्थना केली.+ १६  कारण फक्‍त प्रभू येशूच्या नावाने त्यांचा बाप्तिस्मा झाला होता, पण अजून त्यांच्यापैकी कोणावरही पवित्र शक्‍ती आली नव्हती.+ १७  मग पेत्र आणि योहानने त्यांच्यावर हात ठेवले+ आणि त्यांना पवित्र शक्‍ती मिळाली. १८  प्रेषितांनी हात ठेवल्यावर लोकांना पवित्र शक्‍ती मिळत असल्याचं शिमोनने पाहिलं, तेव्हा तो त्यांना पैसे देऊन म्हणाला: १९  “मलाही हा अधिकार द्या, म्हणजे ज्या कोणावर मी हात ठेवीन त्याला पवित्र शक्‍ती मिळेल.” २०  पण पेत्र त्याला म्हणाला: “तुझ्या चांदीचा तुझ्यासोबत नाश होवो, कारण देवाचं हे मोफत दान पैशांनी विकत घ्यायचा तू विचार केलास.+ २१  या गोष्टीत तुझा कोणताही सहभाग किंवा वाटा नाही, कारण तुझं मन देवाच्या दृष्टीत सरळ नाही. २२  म्हणून या दुष्टपणाबद्दल पश्‍चात्ताप कर आणि यहोवाकडे* याचना कर, म्हणजे तू आपल्या मनात ही दुष्ट कल्पना आणल्याबद्दल कदाचित तुला क्षमा मिळेल. २३  कारण तू एक विष* आहेस आणि अनीतीचा गुलाम आहेस असं मला दिसतं.” २४  तेव्हा शिमोन त्यांना म्हणाला: “तुम्ही सांगितलेल्या या कोणत्याही गोष्टी माझ्यावर येऊ नयेत, म्हणून माझ्यासाठी यहोवाकडे* याचना करा.” २५  मग, त्या ठिकाणी पूर्णपणे साक्ष दिल्यावर आणि यहोवाचं* वचन लोकांना सांगितल्यावर, ते यरुशलेमला जायला निघाले. आणि जाताना त्यांनी शोमरोनच्या बऱ्‍याच गावांत आनंदाच्या संदेशाची घोषणा केली.+ २६  पण यहोवाचा* दूत+ फिलिप्पला म्हणाला: “ऊठ आणि दक्षिणेकडे, यरुशलेमपासून गज्जाला जाणाऱ्‍या रस्त्यावर जा.” (हा वाळवंटातून जाणारा रस्ता आहे.) २७  म्हणून फिलिप्प उठला आणि तिथे गेला. त्या वेळी एक कूशी षंढ,* यरुशलेमला उपासना करायला गेला होता.+ तो कूशी लोकांची राणी कांदके हिच्या दरबारातला एक अधिकारी होता आणि तिच्या खजिन्यावर देखरेख करायचा. २८  आणि आता तो यरुशलेमहून परत जात होता. तो आपल्या रथात बसून यशया संदेष्ट्याचं पुस्तक मोठ्याने वाचत होता. २९  तेव्हा पवित्र शक्‍तीने फिलिप्पला म्हटलं: “त्या रथाजवळ जा.” ३०  म्हणून फिलिप्प जाऊन त्या रथासोबत धावू लागला. तेव्हा तो माणूस यशया संदेष्ट्याच्या पुस्तकातून वाचत असल्याचं त्याने ऐकलं. तो त्याला म्हणाला: “तुम्ही जे वाचताय ते तुम्हाला खरंच कळतंय का?” ३१  तो म्हणाला: “कोणी समजावून सांगितल्याशिवाय ते मला कसं कळेल?” म्हणून त्याने फिलिप्पला रथात चढून आपल्यासोबत बसायचा आग्रह केला. ३२  तो शास्त्रातून हा भाग वाचत होता: “त्याला एखाद्या मेंढरासारखं कत्तल करण्यासाठी नेण्यात आलं आणि लोकर कातरणाऱ्‍यापुढे गप्प राहणाऱ्‍या कोकऱ्‍यासारखं त्याने आपलं तोंड उघडलं नाही.+ ३३  त्याचा अपमान होत असताना, न्याय त्याच्यापासून काढून घेण्यात आला.+ त्याच्या पिढीबद्दलची माहिती कोण सांगेल? कारण पृथ्वीवरून त्याचं जीवन काढून घेण्यात आलं.”+ ३४  तेव्हा तो षंढ फिलिप्पला म्हणाला: “संदेष्टा कोणाबद्दल बोलतोय, हे कृपा करून मला सांगा. तो स्वतःबद्दल बोलतोय की दुसऱ्‍या एखाद्या माणसाबद्दल?” ३५  मग फिलिप्प बोलू लागला आणि या वचनापासून सुरुवात करून त्याने त्याला येशूविषयीचा आनंदाचा संदेश सांगितला. ३६  मग ते रस्त्याने जात असताना एका तळ्याजवळ आले. तेव्हा षंढ म्हणाला: “पाहा! इथे पाणी आहे; मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे?” ३७  *​—— ३८  त्याने रथ थांबवण्याची आज्ञा दिली. मग फिलिप्प आणि षंढ दोघंही पाण्यात उतरले आणि फिलिप्पने त्याला बाप्तिस्मा दिला. ३९  ते पाण्यातून बाहेर आले तेव्हा यहोवाच्या* पवित्र शक्‍तीने लगेच फिलिप्पला दुसरीकडे नेलं आणि षंढाला तो पुन्हा दिसला नाही. मग तो आनंदाने आपल्या मार्गाने निघून गेला. ४०  इकडे फिलिप्प अश्‍दोद नगरात पोहोचला आणि कैसरीया इथे पोहोचेपर्यंत+ तो त्या संपूर्ण क्षेत्रातल्या शहरांत आनंदाचा संदेश घोषित करत राहिला.

तळटीपा

किंवा कदाचित, “एका शहरात.”
शब्दशः “चिन्हं.”
अति. क५ पाहा.
शब्दशः “कडू पित्त.”
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
अति. क५ पाहा.
किंवा “दरबारातला अधिकारी.” शब्दार्थसूची पाहा.
अति. क३ पाहा.
अति. क५ पाहा.