प्रेषितांची कार्यं २७:१-४४

  • पौल जहाजाने रोमला जातो (१-१२)

  • जहाज वादळात सापडतं (१३-३८)

  • जहाज फुटतं (३९-४४)

२७  आम्ही जहाजातून इटलीला+ जावं असं ठरल्यामुळे त्यांनी पौलला आणि इतर काही कैद्यांना यूल्य नावाच्या सैन्यातल्या अधिकाऱ्‍याच्या हवाली केलं. तो औगुस्तच्या तुकडीत अधिकारी होता. २  आम्ही एका जहाजावर चढून आमच्या प्रवासाला सुरुवात केली. हे जहाज अद्रमुत्तीय इथून आशिया प्रांताच्या किनाऱ्‍यावर असलेल्या बंदरांकडे जायला निघालं होतं. मासेदोनियातल्या थेस्सलनीका इथला अरिस्तार्खसुद्धा+ आमच्यासोबत होता. ३  दुसऱ्‍या दिवशी आमचं जहाज सीदोनला पोहोचलं, तेव्हा यूल्य पौलसोबत दयाळूपणे* वागला. पौलच्या मित्रांना त्याची काळजी घेता यावी, म्हणून त्याने त्याला त्यांच्याकडे जायची परवानगी दिली. ४  मग तिथून आम्ही जहाजाने पुढे जायला निघालो. वारा उलट दिशेने वाहत असल्यामुळे आम्ही कुप्रच्या किनाऱ्‍या-किनाऱ्‍याने पुढे गेलो. ५  किलिकिया आणि पंफुल्या यांच्या समोरचा समुद्र पार करून आम्ही लुक्या इथल्या मुर्या बंदरावर आलो. ६  तिथे, इटलीला जाणार असलेलं आलेक्सांद्रियाचं एक जहाज असल्यामुळे सैन्याच्या अधिकाऱ्‍याने आम्हाला त्यावर चढवलं. ७  मग, बरेच दिवस संथ गतीने प्रवास करून आमचं जहाज मोठ्या मुश्‍किलीने कनिदा इथे पोहोचलं. वारा समोरचा असल्यामुळे आम्हाला पुढे जाता येईना. त्यामुळे आम्ही सलमोनच्या समोरून क्रेतच्या किनाऱ्‍या-किनाऱ्‍याने पुढे गेलो. ८  आमचं जहाज कसंबसं लसया शहराजवळच्या ‘सुरक्षित बंदर’ म्हटलेल्या ठिकाणी पोहोचलं. ९  आता बरेच दिवस झाले होते आणि प्रायश्‍चित्ताच्या दिवसाचा+ उपासही होऊन गेला होता. त्यामुळे समुद्रप्रवासाला निघणं धोक्याचं होतं. म्हणून पौलने त्यांना सुचवलं: १०  “माणसांनो, हा समुद्रप्रवास खूप धोकादायक आहे. यात आपल्या मालाची आणि जहाजाचीच नाही, तर आपल्या जिवांचीही हानी आणि मोठं नुकसान होईल, असं मला दिसतं.” ११  पण सैन्याच्या अधिकाऱ्‍याने पौलचं ऐकण्याऐवजी, जहाजाच्या कप्तानाचं आणि मालकाचं ऐकलं. १२  हे बंदर हिवाळ्यात राहण्यासाठी सोयीचं नव्हतं. त्यामुळे बहुतेक जणांनी असा सल्ला दिला, की कसंही करून फिनिक्स इथे पोहोचावं आणि तिथे हिवाळा घालवावा. हे क्रेतचं एक बंदर असून त्याच्या उत्तरपूर्व आणि दक्षिणपूर्व अशा दोन्ही दिशांना जहाजं येऊन थांबायची. १३  दक्षिणेकडून मंद वारा वाहू लागला, तेव्हा आपल्या मनासारखंच होईल असं खलाश्‍यांना वाटलं. म्हणून, नांगर उचलून ते क्रेतच्या किनाऱ्‍याच्या अगदी जवळून पुढे जाऊ लागले. १४  पण काही वेळातच युरकुलोन* नावाचा वादळी वारा बेटाला झोडपू लागला १५  आणि आमचं जहाज त्या वादळात सापडलं. वाऱ्‍याच्या जोरामुळे आम्हाला पुढे जाता येईना. त्यामुळे आम्ही प्रयत्न करायचं सोडून दिलं आणि वारा नेईल त्या दिशेने जहाज जाऊ दिलं. १६  मग आम्ही कौदा नावाच्या एका लहान बेटाच्या किनाऱ्‍या-किनाऱ्‍याने जाऊ लागलो. पण जहाजाच्या मागच्या बाजूला असलेली होडी* वाचवायला आम्हाला खूप त्रास झाला. १७  ती वर उचलून घेतल्यावर खलाश्‍यांनी जहाज खालून-वरून दोरखंडांनी बांधून घेतलं. जहाज सुर्ती* नावाच्या उथळ ठिकाणी वाळूवर आदळेल, या भीतीने त्यांनी शीड खाली उतरवलं आणि जहाज वाऱ्‍याने वाहवत जाऊ दिलं. १८  वादळामुळे आमचं जहाज जोरदार हेलकावे खात होतं. म्हणून दुसऱ्‍या दिवशी जहाज हलकं करण्यासाठी खलाशी त्यातला माल समुद्रात फेकू लागले. १९  मग तिसऱ्‍या दिवशी, त्यांनी जहाजाचं काही सामान आपल्या हातांनी समुद्रात टाकून दिलं. २०  बरेच दिवस सूर्य किंवा तारे दिसले नाहीत. शिवाय, जोरदार वादळी वारे आम्हाला झोडपून काढत होते. त्यामुळे जीव वाचण्याची आमची आशा मावळू लागली. २१  बऱ्‍याच दिवसांपासून जहाजावरच्या लोकांनी काहीच खाल्लं नव्हतं. त्यामुळे पौल त्यांच्या मधे उभा राहून म्हणाला: “माणसांनो, क्रेतहून न निघण्याचा माझा सल्ला तुम्ही ऐकला असता, तर हा सगळा त्रास आणि नुकसान टाळता आलं असतं.+ २२  पण आतासुद्धा मी तुम्हाला विनंती करतो, की हिंमत धरा. कारण तुमच्यापैकी एकाचाही जीव जाणार नाही. फक्‍त जहाज नष्ट होईल. २३  कारण मी ज्या देवाचा उपासक आहे आणि ज्याची पवित्र सेवा करतो त्याचा दूत+ काल रात्री माझ्याजवळ उभा राहून मला म्हणाला: २४  ‘पौल, घाबरू नकोस. तू कैसरापुढे नक्की उभा राहशील.+ आणि पाहा! देव तुझ्यासोबत प्रवास करणाऱ्‍या सगळ्यांचा जीव वाचवेल.’ २५  तेव्हा माणसांनो, हिंमत धरा. कारण स्वर्गदूताने मला जे सांगितलंय, ते देव नक्की करेल असा माझा विश्‍वास आहे. २६  पण आपलं जहाज कोणत्यातरी बेटावर जाऊन फुटेल.”+ २७  मग, १४ व्या रात्री आमचं जहाज अद्रिया समुद्रावरून हेलकावे खात चाललं होतं. तेव्हा मध्यरात्री, आपण कोणत्यातरी किनाऱ्‍याजवळ येत आहोत असं खलाश्‍यांना जाणवलं. २८  त्यांनी पाण्याची खोली मोजून पाहिली, तेव्हा पाणी सुमारे ३६ मीटर* खोल असल्याचं समजलं. त्यामुळे थोडं पुढे जाऊन त्यांनी पुन्हा पाण्याची खोली मोजली. तेव्हा ते सुमारे २७ मीटर* खोल असल्याचं त्यांना समजलं. २९  जहाज खडकांवर जाऊन आदळेल या भीतीने त्यांनी जहाजाच्या मागच्या बाजूने चार नांगर टाकले आणि दिवस उजाडायची वाट पाहू लागले. ३०  पण काही खलाशी जहाजातून पळून जायचा प्रयत्न करू लागले. ते जहाजाच्या पुढच्या बाजूने नांगर टाकत असल्याचं दाखवून पाण्यात होडी उतरवू लागले. ३१  तेव्हा पौल सैन्याच्या अधिकाऱ्‍याला म्हणाला: “ही माणसं जहाजात राहिली नाहीत, तर तुमचा बचाव होणं शक्य नाही.”+ ३२  त्यामुळे सैनिकांनी होडीचे दोरखंड कापून टाकले आणि ती पाण्यात पडू दिली. ३३  मग दिवस उजाडायच्या सुमारास पौलने त्या सगळ्यांना काहीतरी खायचा आग्रह केला. तो म्हणाला: “तुम्ही वाट पाहत-पाहत, आज १४ दिवस झाले आहेत आणि इतके दिवस तुम्ही काहीच खाल्लेलं नाही. ३४  म्हणून मी विनंती करतो, काहीतरी खाऊन घ्या. हे तुमच्याच भल्यासाठी आहे. कारण तुमच्यापैकी कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही.” ३५  असं बोलल्यानंतर पौलने भाकर घेऊन सगळ्यांच्या समोर देवाचे आभार मानले आणि भाकर मोडून तो खाऊ लागला. ३६  हे पाहून त्या सगळ्यांना धीर आला आणि तेही जेवू लागले. ३७  जहाजात आम्ही एकूण २७६ जण* होतो. ३८  पोटभर जेवल्यावर, जहाज हलकं करण्यासाठी ते गहू समुद्रात फेकू लागले.+ ३९  दिवस उजाडल्यावर, त्यांना ते ठिकाण ओळखू येईना.+ पण त्यांना एक खाडी आणि तिचा किनारा दिसला. त्यामुळे, शक्य असलं तर त्या किनाऱ्‍याला जहाज लावायचं असं त्यांनी ठरवलं. ४०  म्हणून त्यांनी नांगर कापले आणि ते समुद्रात पडू दिले. त्याच वेळी, त्यांनी सुकाणूंना बांधलेल्या दोऱ्‍या सोडल्या. त्यानंतर, जहाजाच्या पुढच्या भागाच्या शिडात वारा भरावा म्हणून त्यांनी ते उभं केलं आणि जहाज किनाऱ्‍याला आणलं. ४१  पण दोन समुद्र मिळतात अशा ठिकाणी तयार झालेल्या वाळूच्या बांधावर जहाज जोरात आदळलं आणि जहाजाचा पुढचा भाग वाळूत गच्च रुतून बसला आणि मागचा भाग लाटांच्या तडाख्यामुळे तुटू लागला.+ ४२  तेव्हा, कैद्यांनी पोहून पळून जाऊ नये म्हणून सैनिकांनी त्यांना ठार मारायचं ठरवलं. ४३  पण सैन्याच्या अधिकाऱ्‍याला कसंही करून पौलला वाचवायचं असल्यामुळे त्याने त्यांना तसं करू दिलं नाही. त्याने आज्ञा दिली, की ज्यांना पोहता येत असेल त्यांनी आधी समुद्रात उडी टाकून किनाऱ्‍यावर पोहत जावं. ४४  बाकीच्या लोकांनी मागून, कोणी फळ्यांच्या तर कोणी जहाजाच्या तुटलेल्या तुकड्यांच्या आधाराने यावं, असं त्याने सांगितलं. अशा रितीने सगळे जण सुखरूप किनाऱ्‍यावर पोहोचले.+

तळटीपा

किंवा “माणुसकीने.”
म्हणजे, उत्तरपूर्वेचा वारा.
बुडणाऱ्‍या जहाजातून लोकांना वाचवण्यासाठी वापरली जाणारी लहानशी नाव.
शब्दशः “२० वावं” (१२० फूट). अति. ख१४ पाहा.
शब्दशः “१५ वावं” (९० फूट). अति. ख१४ पाहा.
किंवा “जीव.”