प्रेषितांची कार्यं २६:१-३२

  • पौल अग्रिप्पासमोर आपली बाजू मांडतो (१-११)

  • पौल आपल्या परिवर्तनाचं वर्णन करतो (१२-२३)

  • फेस्त आणि अग्रिप्पा यांची उत्तरं (२४-३२)

२६  मग, अग्रिप्पा+ पौलला म्हणाला: “तुला तुझी बाजू मांडायची परवानगी आहे.” तेव्हा पौलने हात पुढे करून आपल्या बचावात बोलायला सुरुवात केली: २  “हे राजा अग्रिप्पा, यहुद्यांनी माझ्यावर लावलेल्या सगळ्या आरोपांबद्दल+ आज मला तुमच्यासमोर आपल्या बचावात बोलायची संधी मिळाली, याचा मला आनंद होतो. ३  कारण यहुद्यांच्या रितीरिवाजांचे आणि त्यांच्यातल्या वादविषयांचे तुम्ही जाणकार आहात. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, की माझं धीराने ऐकून घ्या. ४  माझ्या तरुणपणापासून ते मी यरुशलेममध्ये होतो तोपर्यंत, बरेच यहुदी मला ओळखतात.+ ५  त्यांची इच्छा असेल तर ते तुम्हाला सांगतील, की मी एक परूशी होतो.+ आणि परूश्‍यांच्या उपासनेची पद्धत ही इतर यहुद्यांपेक्षा जास्त कडक असते.+ ६  पण देवाने आमच्या पूर्वजांना दिलेल्या वचनाच्या आशेमुळे+ आज माझी न्यायचौकशी होत आहे. ७  याच वचनाची पूर्णता पाहण्याची आशा बाळगून आमचे १२ वंश रात्रंदिवस देवाची खूप आवेशाने पवित्र सेवा करत आहेत. आणि हे राजा, याच आशेमुळे यहुद्यांनी माझ्यावर आरोप लावलाय.+ ८  देव मेलेल्यांना उठवतो, या गोष्टीवर तुम्ही लोक विश्‍वास का ठेवत नाही? ९  एकेकाळी मलाही असं वाटत होतं, की नासरेथकर येशूच्या नावाचा शक्य त्या मार्गाने विरोध करणं हे माझं कर्तव्यच आहे. १०  आणि यरुशलेममध्ये मी अगदी हेच केलं. मुख्य याजकांनी मला अधिकार दिल्यामुळे,+ मी पवित्र जनांपैकी कित्येकांना तुरुंगात डांबलं.+ त्यांना मृत्युदंड दिला जात असताना मी त्याचं समर्थन केलं. ११  त्यांच्या सगळ्या सभास्थानांमध्ये मी बऱ्‍याचदा त्यांचा छळ केला. मी त्यांना त्यांचा विश्‍वास नाकारायला भाग पाडायचा प्रयत्न केला. इतकंच काय, तर त्यांच्याविरुद्ध रागाने वेडापिसा होऊन मी इतर शहरांमध्येही जाऊन त्यांचा छळ केला. १२  एकदा याच उद्देशाने, मी मुख्य याजकांनी दिलेल्या अधिकाराने आणि परवानगीने दिमिष्कला चाललो होतो. १३  हे राजा, रस्त्याने जात असताना आकाशातून सूर्याच्या प्रकाशापेक्षा तेजस्वी असा प्रकाश, भर दुपारी माझ्या आणि माझ्यासोबत प्रवास करणाऱ्‍यांभोवती चमकला.+ १४  तेव्हा आम्ही सगळे जमिनीवर पडलो आणि मला एक आवाज ऐकू आला. तो इब्री भाषेत मला म्हणत होता: ‘शौल, शौल, तू मला का छळत आहेस? पराणीवर* लाथा मारून* तू स्वतःला त्रास करून घेत आहेस.’ १५  पण मी म्हणालो: ‘प्रभू, तू कोण आहेस?’ तेव्हा प्रभू म्हणाला: ‘मी येशू आहे, ज्याला तू छळत आहेस. १६  तर आता उठून उभा राहा. कारण तुला आपला सेवक आणि साक्षी म्हणून निवडण्यासाठी मी तुझ्यासमोर प्रकट झालोय. माझ्याबद्दल ज्या गोष्टी तू पाहिल्या आहेत आणि ज्या मी तुला दाखवीन, त्यांबद्दल तू साक्ष देशील.+ १७  मी या लोकांकडे आणि इतर राष्ट्रांकडे तुला पाठवतोय; मी त्यांच्यापासून तुझं रक्षण करीन.+ १८  तू त्यांचे डोळे उघडावेत,+ त्यांना अंधारापासून+ प्रकाशाकडे+ आणि सैतानाच्या अधिकारापासून+ देवाकडे वळायला लावावं, म्हणून मी तुला त्यांच्याकडे पाठवतोय. यामुळे त्यांना पापांची क्षमा मिळेल+ आणि माझ्यावरच्या विश्‍वासाने पवित्र झालेल्यांमध्ये वारसाही मिळेल.’ १९  म्हणून, हे राजा अग्रिप्पा, मी या स्वर्गीय दृष्टान्ताच्या विरोधात गेलो नाही. २०  तर मी आधी दिमिष्कमध्ये+ आणि मग यरुशलेममध्ये,+ तसंच, संपूर्ण यहूदीयाच्या प्रदेशात आणि इतर राष्ट्रांतही लोकांना हा संदेश घोषित करू लागलो, की त्यांनी पश्‍चात्ताप करावा आणि पश्‍चात्तापाला शोभतील अशी कामं करून देवाकडे वळावं.+ २१  आणि याच कारणामुळे यहुद्यांनी मंदिरात मला पकडून ठार मारायचा प्रयत्न केला.+ २२  पण देवाच्या मदतीमुळेच मी आजपर्यंत लहानमोठ्या सगळ्यांना साक्ष देतोय. आणि संदेष्ट्यांनी तसंच मोशेने जे घडेल असं सांगितलं होतं, त्यापेक्षा वेगळं काही मी बोललो नाही.+ २३  ते हेच, की ख्रिस्ताला दुःख सोसावं लागेल.+ तसंच, मेलेल्यांतून पुनरुत्थान होणारा पहिला+ या नात्याने तो फक्‍त या लोकांतच नाही, तर इतर राष्ट्रांतही प्रचार करून त्यांना प्रकाश देईल.”+ २४  पौल या गोष्टी आपल्या बचावात बोलत असताना फेस्त मोठ्याने म्हणाला: “पौल तू वेडा झाला आहेस! जास्त ज्ञानाने तुला वेडं केलंय!” २५  पण पौल म्हणाला: “महाराज फेस्त, मी वेडा नाही, तर मी खऱ्‍या आणि योग्य अशाच गोष्टी बोलतोय. २६  खरंतर, ज्या राजासमोर मी इतक्या मोकळेपणाने बोलतोय, त्याला स्वतःला या गोष्टींबद्दल चांगल्या प्रकारे माहीत आहे. यांपैकी एकही गोष्ट त्याच्या नजरेतून सुटलेली नाही याची मला खातरी आहे. कारण यांतली कोणतीच गोष्ट एखाद्या कोपऱ्‍यात घडलेली नाही.+ २७  हे राजा अग्रिप्पा, संदेष्ट्यांच्या लिखाणांवर तुमचा विश्‍वास आहे का? मला माहीत आहे, की तुमचा विश्‍वास आहे.” २८  पण अग्रिप्पा पौलला म्हणाला: “थोड्याच वेळात, तू ख्रिस्ती बनण्यासाठी माझं मन वळवशील.” २९  तेव्हा पौल म्हणाला: “थोड्या वेळात असो की जास्त वेळात, माझी तर देवाकडे हीच विनंती आहे, की फक्‍त तुम्हीच नाही, तर आज माझं बोलणं ऐकणाऱ्‍या सगळ्यांनीच माझ्यासारखं व्हावं. पण इतकंच की, अशा बेड्यांमध्ये तुम्ही असू नये.” ३०  मग राजा उठला आणि त्याच्यासोबत राज्यपाल, बर्णीका आणि त्यांच्यासोबत बसलेली माणसंही उठली. ३१  पण तिथून निघताना ते एकमेकांना म्हणू लागले: “मृत्युदंड देण्यासारखं किंवा तुरुंगात टाकण्यासारखं या माणसाने काहीच केलेलं नाही.”+ ३२  मग अग्रिप्पा फेस्तला म्हणाला: “या माणसाने कैसराकडे न्याय मागितला नसता, तर याची सुटका करता आली असती.”+

तळटीपा

गुरांना हाकून नेण्यासाठी वापरली जाणारी टोकदार काठी.
किंवा “अशा प्रकारे प्रतिकार करून.”