प्रेषितांची कार्यं १४:१-२८

  • इकुन्यात वाढ आणि विरोध (१-७)

  • लुस्त्र इथे लोक प्रेषितांना देव समजतात (८-१८)

  • दगडमार झाल्यावरही पौल वाचतो (१९, २०)

  • मंडळ्यांना धीर देणं (२१-२३)

  • सीरियातल्या अंत्युखियाला परत येणं (२४-२८)

१४  इकुन्याला आल्यावर पौल आणि बर्णबा यहुद्यांच्या सभास्थानात गेले. तिथे ते इतक्या प्रभावीपणे बोलले, की पुष्कळ यहुदी आणि ग्रीक लोकांनी विश्‍वास स्वीकारला. २  पण विश्‍वास न ठेवलेल्या यहुद्यांनी विदेशी लोकांना भडकवलं आणि बांधवांविरुद्ध त्यांची मनं दूषित केली.+ ३  म्हणून ते बराच काळ तिथे राहिले आणि यहोवाने* दिलेल्या अधिकारामुळे धैर्याने त्याच्या अपार कृपेचा संदेश सांगत राहिले. देवाने त्यांच्या हातून बरीच चिन्हं आणि चमत्कार घडवून आणले आणि त्यांद्वारे हा संदेश खरा असल्याची साक्ष दिली.+ ४  पण शहरातल्या लोकांमध्ये फूट पडली होती. काहींनी यहुद्यांची बाजू घेतली तर काहींनी प्रेषितांची. ५  विदेशी लोकांसोबत यहुदी लोकांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्‍यांनी मिळून पौल आणि बर्णबा यांचा छळ करायचं आणि त्यांना दगडमार करायचं ठरवलं.+ ६  पौल आणि बर्णबा यांना हे कळलं, तेव्हा त्यांनी तिथून पळ काढला. ते लुकवनियाच्या लुस्त्र आणि दर्बे शहरांकडे आणि त्यांच्या आसपासच्या गावांकडे निघून गेले.+ ७  तिथे गेल्यावर ते आनंदाचा संदेश सांगत राहिले. ८  लुस्त्र इथे त्यांना एक लंगडा माणूस बसलेला दिसला. तो जन्मापासूनच पांगळा होता आणि कधीच चालला-फिरला नव्हता. ९  पौल बोलत असताना हा माणूस ऐकत होता. तेव्हा पौलने त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं, की त्या माणसाला आपण बरं होऊ असा विश्‍वास आहे.+ १०  म्हणून तो त्याला मोठ्याने म्हणाला: “आपल्या पायांवर उभा राहा.” तेव्हा तो माणूस लगेच उठून उभा राहिला आणि चालू लागला.+ ११  पौलने केलेलं हे कार्य लोकांनी पाहिलं, तेव्हा ते लुकवनिया भाषेत ओरडून म्हणाले: “देव माणसांचं रूप घेऊन खाली आपल्याकडे आले आहेत!”+ १२  ते बर्णबाला झ्यूस,* तर पौलला हर्मेस* म्हणू लागले. कारण लोकांशी बोलण्यात पौलच पुढाकार घेत होता. १३  शहराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या झ्यूस देवाच्या मंदिरातला पुजारी, लोकांसोबत मिळून बलिदानं देण्याच्या इच्छेने, बैल आणि फुलांचे हार* घेऊन फाटकांजवळ आला. १४  पण प्रेषितांनी म्हणजे बर्णबा आणि पौल यांनी हे ऐकलं, तेव्हा त्यांनी आपले कपडे फाडले आणि गर्दीत धावत जाऊन ते मोठ्याने ओरडून म्हणाले: १५  “लोकांनो, तुम्ही हे सगळं का करताय? आम्हीही तुमच्यासारखीच साधीसुधी माणसं आहोत.+ आणि तुम्ही या निरर्थक गोष्टी सोडून जिवंत देवाकडे वळावं, म्हणून आम्ही तुम्हाला एक आनंदाचा संदेश सांगतोय. कारण त्याच देवाने आकाश, पृथ्वी, समुद्र आणि त्यांतल्या सगळ्या गोष्टी बनवल्या.+ १६  पूर्वीच्या काळात देवाने सगळ्या राष्ट्रांना आपापल्या मार्गांनी चालत राहायची परवानगी दिली होती.+ १७  पण त्याने स्वतःबद्दल साक्ष द्यायचं सोडलं नाही.+ उलट, आकाशातून पाऊस आणि फलदायी ऋतू देऊन,+ अन्‍नधान्याने तुम्हाला तृप्त करून आणि तुमची मनं आनंदाने भरून तो तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी करत राहिला.”+ १८  पण इतकं सांगूनसुद्धा लोक ऐकायला तयार नव्हते. शेवटी, मोठ्या मुश्‍किलीने त्यांनी बलिदानं अर्पण करण्यापासून लोकांना थांबवलं. १९  मग अंत्युखिया आणि इकुन्या इथून यहुदी आले आणि त्यांनी लोकांना भडकवलं.+ त्यामुळे लोकांनी पौलला दगडमार केला आणि तो मेला आहे, असं समजून त्याला फरफटत शहराबाहेर नेलं.+ २०  पण शिष्य येऊन त्याच्याभोवती जमले, तेव्हा तो उठला आणि शहरात गेला. दुसऱ्‍या दिवशी तो बर्णबासोबत दर्बेला गेला.+ २१  त्या शहरात आनंदाचा संदेश घोषित केल्यावर आणि पुष्कळ जणांना शिष्य बनवल्यावर ते लुस्त्र, इकुन्या आणि अंत्युखियाला परत आले. २२  तिथे त्यांनी शिष्यांना धीर दिला+ आणि त्यांना विश्‍वासात टिकून राहायचं प्रोत्साहन दिलं. ते त्यांना म्हणाले: “आपल्याला बऱ्‍याच संकटांना तोंड देऊन देवाच्या राज्यात जावं लागेल.”+ २३  शिवाय, त्यांनी प्रत्येक मंडळीत वडिलांना नियुक्‍त केलं.+ मग त्यांनी उपवास आणि प्रार्थना करून+ या वडिलांना यहोवाच्या* हाती सोपवून दिलं. कारण त्यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला होता. २४  मग ते पिसिदियातून पंफुल्याला आले.+ २५  पिर्गा इथे वचन घोषित केल्यानंतर ते खाली अत्तलियाला गेले. २६  तिथून ते जहाजाने अंत्युखियाला निघून गेले. याच शहरात देवाने त्याच्या अपार कृपेने त्यांच्यावर आपलं कार्य सोपवलं होतं. ते कार्य आता त्यांनी पूर्ण केलं होतं.+ २७  तिथे येऊन त्यांनी मंडळीला एकत्र केलं आणि देवाने आपल्याद्वारे केलेल्या बऱ्‍याच गोष्टींबद्दल त्यांना सांगितलं. तसंच, देवाने कशा प्रकारे विदेश्‍यांसाठीही विश्‍वासाचं दार उघडलं होतं,+ याबद्दलही त्यांनी त्यांना सांगितलं. २८  मग ते बराच काळ शिष्यांबरोबर राहिले.

तळटीपा

अति. क५ पाहा.
हे एका ग्रीक देवाचं नाव आहे.
हे एका ग्रीक देवाचं नाव आहे.
किंवा “मुकुट.”
अति. क५ पाहा.