निर्गम ७:१-२५
७ मग यहोवा मोशेला म्हणाला: “बघ, मी तुला फारोसाठी देवासारखं केलं आहे* आणि तुझा भाऊ अहरोन तुझा संदेष्टा होईल.+
२ मी तुला आज्ञा दिलेल्या सगळ्या गोष्टी तुझा भाऊ अहरोन याला सांग आणि तो फारोशी बोलेल, म्हणजे फारो इस्राएली लोकांना आपल्या देशातून जाऊ देईल.
३ मी फारोचं मन कठोर होऊ देईन+ आणि इजिप्त देशात बरीच चिन्हं आणि चमत्कार करीन.+
४ पण तरीही फारो तुमचं ऐकणार नाही. मग मी इजिप्तविरुद्ध माझी ताकद दाखवीन आणि इजिप्तला कठोर शिक्षा देऊन, माझ्या लोकांच्या मोठ्या समूहाला,* म्हणजेच इस्राएली लोकांना तिथून बाहेर काढीन.+
५ मी इजिप्तविरुद्ध माझा हात उगारून इस्राएली लोकांना त्यांच्यामधून बाहेर आणीन. तेव्हा इजिप्तच्या लोकांना कळेल, की मी यहोवा आहे.”+
६ यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशे आणि अहरोन यांनी केलं. त्यांनी अगदी तसंच केलं.
७ मोशे आणि अहरोन फारोशी बोलले, तेव्हा मोशे ८० वर्षांचा आणि अहरोन ८३ वर्षांचा होता.+
८ यहोवा मोशे आणि अहरोन यांना म्हणाला:
९ “जर फारो तुम्हाला ‘चमत्कार करून दाखवा,’ असं म्हणाला, तर अहरोनला सांग, ‘तुझी काठी फारोसमोर जमिनीवर टाक.’ मग त्या काठीचा एक मोठा साप होईल.”+
१० तेव्हा मोशे आणि अहरोन फारोकडे गेले आणि यहोवाने आज्ञा दिल्याप्रमाणेच त्यांनी केलं. अहरोनने फारो आणि त्याचे सेवक यांच्यासमोर काठी जमिनीवर टाकली, तेव्हा तिचा एक मोठा साप झाला.
११ पण फारोने आपल्या विद्वानांना आणि जादूगारांना बोलावून घेतलं आणि इजिप्तमधल्या मंत्रतंत्र करणाऱ्या पुजाऱ्यांनीही+ आपल्या जादूने* तसाच चमत्कार केला.+
१२ त्यांच्यापैकी प्रत्येकाने आपापली काठी जमिनीवर टाकली आणि त्या काठ्यांचे मोठे साप झाले. पण अहरोनच्या सापाने* त्यांच्या सापांना गिळून टाकलं.
१३ तरीसुद्धा फारोचं मन कठोर झालं+ आणि यहोवाने सांगितलं होतं, त्याप्रमाणे त्याने मोशे आणि अहरोन यांचं ऐकलं नाही.
१४ मग यहोवा मोशेला म्हणाला: “फारोचं मन हट्टी आहे.+ त्याने लोकांना जाऊ द्यायला नकार दिला आहे.
१५ सकाळी फारोला जाऊन भेट. पाहा, तो नदीकडे जाईल, तेव्हा त्याला भेटायला तू नाईल नदीच्या काठावर उभा राहा. आणि जिचा साप झाला होता, ती तुझी काठीही सोबत घेऊन जा.+
१६ तू त्याला असं म्हण: ‘इब्री लोकांचा देव यहोवा, याने मला तुझ्याकडे पाठवलंय+ आणि तो म्हणतो: “माझ्या लोकांना ओसाड रानात माझी उपासना करायला जाऊ दे,” पण तू अजूनही त्याचं ऐकलेलं नाहीस.
१७ म्हणून यहोवा असं म्हणतो: “आता मी जे करीन, त्यावरून तुला कळेल की मी यहोवा आहे.+ मी नाईल नदीच्या पाण्याला माझ्या हातातल्या काठीने मारीन आणि पाण्याचं रक्त होईल.
१८ नाईल नदीतले मासे मरून जातील आणि पाण्याला वास सुटेल. इजिप्तचे लोक नाईलचं पाणी पिऊच शकणार नाहीत.”’”
१९ मग यहोवा मोशेला म्हणाला: “अहरोनला सांग: ‘तुझी काठी घेऊन इजिप्तच्या पाण्यावर; इथल्या नद्या, नाले,* तलाव+ आणि हौद यांवर तुझा हात उगार,+ म्हणजे त्यांतल्या पाण्याचं रक्त होईल.’ इजिप्तच्या संपूर्ण देशात, अगदी लाकडाच्या आणि दगडाच्या भांड्यांतही रक्त असेल.”
२० मोशे आणि अहरोन यांनी लगेच यहोवाने सांगितल्याप्रमाणे केलं. अहरोनने आपली काठी उचलून ती फारो आणि त्याचे सेवक यांच्यादेखत नाईल नदीच्या पाण्यावर मारली आणि नदीतल्या सगळ्या पाण्याचं रक्त झालं.+
२१ नदीतले मासे मेले+ आणि पाण्याला वास येऊ लागला. इजिप्तच्या लोकांना नदीचं पाणी पिणं अशक्य झालं+ आणि संपूर्ण इजिप्त देशात रक्तच रक्त झालं.
२२ पण इजिप्तच्या मंत्रतंत्र करणाऱ्या पुजाऱ्यांनीही आपल्या गुप्त विद्येने तसंच केलं.+ त्यामुळे फारोचं मन कठोरच राहिलं आणि यहोवाने सांगितलं होतं त्याप्रमाणे, त्याने मोशे आणि अहरोन यांचं ऐकलं नाही.+
२३ मग फारो आपल्या घरी परत गेला आणि या गोष्टीचाही त्याच्या मनावर काहीच परिणाम झाला नाही.
२४ इजिप्तचे सर्व लोक नाईलच्या आसपास सगळीकडे खोदू लागले, कारण ते नाईलचं पाणी पिऊ शकत नव्हते.
२५ यहोवाने नाईलच्या पाण्याचं रक्त केलं, त्याला आता सात दिवस पूर्ण झाले होते.
तळटीपा
^ शब्दशः “देव केलं आहे.”
^ शब्दशः “माझ्या सैन्यांना.”
^ किंवा “जादूच्या विद्येने.”
^ शब्दशः “काठीने.”
^ म्हणजे, नाईलचे नाले.