निर्गम ३१:१-१८
३१ यहोवा मोशेला पुढे म्हणाला:
२ “मी यहूदा वंशातल्या उरीचा मुलगा, म्हणजे हूरचा नातू बसालेल+ याला निवडलं आहे.*+
३ मी त्याला भरपूर प्रमाणात माझी पवित्र शक्ती* देईन आणि सर्व प्रकारची कौशल्याची कामं करण्यासाठी त्याला बुद्धी, समजशक्ती आणि ज्ञान देईन.
४ त्यामुळे, त्याला कलाकौशल्याची कामं करता येतील; सोनं, चांदी आणि तांबं यांच्या वस्तू बनवता येतील;
५ तसंच, रत्नांना आकार देऊन ती कोंदणात बसवता येतील+ आणि लाकडाच्या सर्व प्रकारच्या वस्तू बनवता येतील.+
६ शिवाय त्याला मदत करण्यासाठी मी दानच्या वंशातल्या अहिसामाकचा मुलगा अहलियाब+ याला नियुक्त केलं आहे. तसंच सर्व कारागिरांचं* हृदय मी बुद्धीने भरलं आहे, त्यामुळे मी आज्ञा दिलेल्या या सर्व गोष्टी त्यांना बनवता येतील:+
७ भेटमंडप,+ साक्षपेटी+ आणि त्यावरचं झाकण,+ मंडपातलं सर्व सामान,
८ मेज+ व त्याची भांडी, शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष व त्याची सर्व भांडी,+ धूपवेदी,+
९ होमार्पणाची वेदी+ व तिची सर्व भांडी, तांब्याचं मोठं भांडं* व त्याची बैठक,+
१० कुशलतेने विणलेली चांगल्या प्रतीची वस्त्रं, याजकासाठी म्हणजे अहरोनसाठी पवित्र वस्त्रं, याजक म्हणून सेवा करणाऱ्या त्याच्या मुलांची वस्त्रं,+
११ अभिषेकाचं तेल आणि उपासनेच्या ठिकाणासाठी सुगंधित धूप.+ मी तुला आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टी ते बनवतील.”
१२ यहोवा मोशेला पुढे म्हणाला:
१३ “इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग, ‘तुम्ही माझे शब्बाथ* न चुकता पाळले पाहिजेत,+ कारण हे पिढ्या न् पिढ्या तुमच्यात आणि माझ्यात असलेलं चिन्ह आहे. यामुळे तुम्हाला कळेल, की तुम्हाला पवित्र करणारा मी यहोवा आहे.
१४ तुम्ही शब्बाथ पाळला पाहिजे कारण तो तुमच्यासाठी पवित्र आहे.+ जो कोणी त्याचा अनादर करेल त्याला ठार मारलं जावं. शब्बाथाच्या दिवशी जर कोणीही काही काम केलं, तर त्याला ठार मारलं जाईल.+
१५ सहा दिवस तुम्ही काम करू शकता, पण सातवा दिवस पूर्ण विश्रांतीचा शब्बाथ आहे.+ तो यहोवासाठी पवित्र आहे. शब्बाथाच्या दिवशी जर कोणीही काम केलं, तर त्याला ठार मारलं जावं.
१६ इस्राएली लोकांनी शब्बाथ पाळलाच पाहिजे; त्यांनी पिढ्या न् पिढ्या तो पाळला पाहिजे. हा एक कायमचा करार आहे.
१७ हे माझ्यामध्ये आणि इस्राएली लोकांमध्ये सर्वकाळाचं चिन्ह आहे;+ कारण यहोवाने सहा दिवसांत आकाश आणि पृथ्वी बनवली आणि सातव्या दिवशी त्याने काम थांबवून विश्रांती घेतली.’”+
१८ सीनाय पर्वतावर मोशेशी बोलून झाल्यावर, देवाने त्याला साक्षलेखाच्या दोन पाट्या दिल्या.+ या दगडी पाट्या देवाने आपल्या बोटाने लिहिल्या होत्या.+
तळटीपा
^ शब्दशः “नावाने हाक मारली.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “बुद्धिमान हृदयाचे.”
^ किंवा “गंगाळ.”
^ शब्दार्थसूची पाहा.