नहेम्या ८:१-१८
८ मग सर्व लोक पाणी फाटकाच्या+ समोर असलेल्या चौकात एकमताने जमले. त्यांनी शास्त्री* एज्रा+ याला, यहोवाने इस्राएली लोकांना मोशेद्वारे दिलेलं नियमशास्त्राचं पुस्तक+ आणायला सांगितलं.
२ तेव्हा सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी+ एज्रा याजकाने मंडळीसमोर, म्हणजे सर्व पुरुष, स्त्रिया आणि जे कोणी ऐकून समजू शकतील अशा सर्वांसमोर नियमशास्त्र आणलं.+
३ मग त्याने पाणी फाटकाच्या समोर असलेल्या चौकात, पहाटेपासून दुपारपर्यंत सर्व पुरुष, स्त्रिया आणि जे कोणी ऐकून समजू शकतील अशा सर्वांच्या समोर नियमशास्त्र मोठ्याने वाचलं.+ तेव्हा लोक ते लक्ष देऊन ऐकत होते.+
४ शास्त्री* एज्रा या प्रसंगासाठी खास तयार केलेल्या लाकडी मंचावर उभा होता. त्याच्यासोबत त्याच्या उजवीकडे मतिथ्य, शेमा, अनाया, उरीया, हिल्कीया आणि मासेया हे उभे होते. आणि त्याच्या डावीकडे पदायाह, मीशाएल, मल्कीया,+ हाशूम, हश्बद्दाना, जखऱ्या आणि मशुल्लाम हे उभे होते.
५ एज्रा लोकांपेक्षा उंच ठिकाणी उभा असल्यामुळे सर्व लोक त्याला पाहू शकत होते. त्याने पुस्तक उघडलं, तेव्हा सर्व लोक उठून उभे राहिले.
६ मग एज्राने महान आणि खऱ्या देवाची, म्हणजे यहोवाची स्तुती केली. तेव्हा सगळ्या लोकांनी आपले हात वर करून “आमेन!* आमेन!”+ असं म्हटलं. मग त्यांनी खाली वाकून, जमिनीवर डोकं टेकवून यहोवाला नमन केलं.
७ त्यानंतर येशूवा, बानी, शेरेब्याह,+ यामीन, अकूब, शब्बथई, होदीया, मासेया, कलीता, अजऱ्या, योजाबाद,+ हानान आणि पलायाह या लेव्यांनी लोकांना नियमशास्त्र समजावून सांगितलं.+ आणि लोक उभे राहून ऐकत होते.
८ ते पुस्तकातून, म्हणजेच खऱ्या देवाच्या नियमशास्त्रातून वाचत राहिले. त्यांनी ते लोकांना चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं आणि वाचलेल्या गोष्टींचा अर्थ स्पष्ट केला. अशा रितीने, जे वाचलं जात होतं, ते समजून घेण्यासाठी त्यांनी लोकांना मदत केली.+
९ मग, त्या वेळी राज्यपाल* असलेला नहेम्या, तसंच, याजक व शास्त्री* असलेला एज्रा+ आणि लोकांना शिकवत असलेले लेवी सर्वांना म्हणाले: “तुमचा देव यहोवा याच्यासाठी आजचा दिवस पवित्र आहे.+ म्हणून शोक करू नका किंवा रडू नका.” कारण नियमशास्त्रातले शब्द ऐकून सर्व लोक रडत होते.
१० तो त्यांना म्हणाला: “जा, चांगले चांगले पदार्थ* खा आणि गोड पेयं प्या. ज्यांच्याकडे काही शिजवलेलं नसेल, त्यांच्याकडेही काही पाठवा.+ कारण आजचा दिवस आपल्या प्रभूसाठी पवित्र आहे. म्हणून दुःखी राहू नका, कारण यहोवाकडून मिळणारा आनंद तुम्हाला सामर्थ्य देतो.”*
११ मग लेवी सर्व लोकांना शांत करण्यासाठी म्हणाले: “रडू नका आणि दुःखी राहू नका! कारण आजचा दिवस पवित्र आहे.”
१२ तेव्हा सर्व लोक गेले आणि त्यांनी खाणंपिणं केलं. तसंच, त्यांनी इतरांकडेही चांगले चांगले पदार्थ पाठवले. त्यांनी मोठा आनंद साजरा केला,+ कारण ज्या गोष्टी त्यांनी ऐकल्या होत्या, त्यांचा अर्थ त्यांना समजला होता.+
१३ मग दुसऱ्या दिवशी सर्व इस्राएली लोकांच्या कुळांचे प्रमुख, याजक आणि लेवी नियमशास्त्रातल्या वचनांचा अर्थ आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी शास्त्री* एज्रा याच्याभोवती जमले.
१४ मग, यहोवाने मोशेद्वारे दिलेल्या नियमशास्त्रात त्यांना असं लिहिलेलं सापडलं, की सातव्या महिन्यातल्या सणाच्या दिवसांत, इस्राएली लोकांनी मंडपांमध्ये* राहावं,+
१५ आणि याविषयी घोषणा करावी.+ तसंच, त्यांनी आपल्या सर्व शहरांत आणि यरुशलेमच्या कानाकोपऱ्यांत अशीही घोषणा करावी: “डोंगरांवर जा आणि नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे मंडप तयार करण्यासाठी जैतून, पाईन, हदास,* खजूर आणि इतर झाडांच्या, भरपूर पानं असलेल्या फांद्या आणा.”
१६ तेव्हा लोकांनी जाऊन फांद्या आणल्या आणि प्रत्येकाने आपापल्या घराच्या छतावर आणि अंगणात मंडप तयार केले. तसंच, लोकांनी खऱ्या देवाच्या मंदिराच्या अंगणांत,+ पाणी फाटकाच्या चौकात+ आणि एफ्राईमच्या फाटकाच्या चौकातही+ मंडप तयार केले.
१७ अशा प्रकारे, बंदिवासातून परत आलेल्या सर्व इस्राएली लोकांच्या मंडळीने मंडप तयार केले आणि ते त्यांत राहू लागले. नूनचा मुलगा यहोशवा याच्या काळापासून,+ त्या दिवसापर्यंत इस्राएली लोकांमध्ये अशा रितीने हा सण साजरा करण्यात आला नव्हता. म्हणून लोकांनी खूप आनंदाने हा सण साजरा केला.+
१८ आणि सणाच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत, खऱ्या देवाच्या नियमशास्त्राच्या पुस्तकाचं दररोज वाचन करण्यात आलं.+ लोकांनी सात दिवस हा सण साजरा केला. आठव्या दिवशी, नियमाशास्त्रात सांगितल्याप्रमाणे एक पवित्र सभा ठेवण्यात आली.+
तळटीपा
^ किंवा “प्रती तयार करणारा.”
^ किंवा “प्रती तयार करणारा.”
^ किंवा “असंच घडो!”
^ किंवा “प्रती तयार करणारा.”
^ किंवा “तिर्शाथा,” ही पर्शियात, प्रांताच्या राज्यपालासाठी वापरली जाणारी पदवी होती.
^ शब्दशः “तेलकट पदार्थ.”
^ शब्दशः “यहोवाचा आनंद तुमचा आश्रयदुर्ग आहे.”
^ किंवा “प्रती तयार करणारा.”
^ किंवा “तात्पुरत्या आश्रयांमध्ये.”
^ चमकणारी पानं आणि पांढरी सुगंधी फुलं असणारं एक झुडूप.