नहेम्या १३:१-३१
१३ त्या दिवशी, मोशेचं पुस्तक सर्व लोकांसमोर वाचण्यात आलं+ आणि त्यात असं लिहिलेलं सापडलं, की कोणत्याही अम्मोनी किंवा मवाबी+ माणसाने खऱ्या देवाच्या मंडळीत कधीही येऊ नये,+
२ कारण त्यांनी इस्राएली लोकांसाठी अन्न आणि पाणी आणलं नव्हतं. उलट, इस्राएली लोकांना शाप देण्यासाठी त्यांनी बलामला पैसे दिले.+ पण आमच्या देवाने तो शाप आशीर्वादात बदलला.+
३ नियमशास्त्रातले हे शब्द ऐकताच, लोकांनी आपल्यामधून विदेशी वंशाच्या* लोकांना वेगळं करायला सुरुवात केली.+
४ याआधी, आमच्या देवाच्या मंदिराच्या कोठारांचा* अधिकार,+ तोबीयाचा नातेवाईक+ असलेल्या एल्याशीब+ याजकाकडे होता.
५ त्याने तोबीयाला एक मोठं कोठार* दिलं होतं. पूर्वी त्या कोठारात अन्नार्पणाचं सामान, ऊद* आणि भांडी ठेवली जायची. तसंच लेवी,+ गायक आणि द्वारपाल यांच्यासाठी दिलं जाणारं धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल+ यांचा दहावा भाग* आणि याजकांसाठी असलेली दानंही त्या कोठारात ठेवली जायची.+
६ या सर्व काळात मी यरुशलेममध्ये नव्हतो, कारण बाबेलचा राजा अर्तहशश्त+ याच्या शासनकाळाच्या ३२ व्या वर्षी+ मी त्याच्याकडे गेलो होतो. मग, काही काळाने मी राजाकडे रजा मागितली.
७ मी यरुशलेमला आलो, तेव्हा एल्याशीबने+ केलेल्या एका वाईट गोष्टीबद्दल मला कळलं. त्याने तोबीयाला+ खऱ्या देवाच्या मंदिरातल्या अंगणात एक कोठार दिलं होतं.
८ ही गोष्ट मला अजिबात आवडली नाही, म्हणून मी त्या कोठारातून* तोबीयाच्या घरचं सगळं सामान बाहेर फेकून दिलं.
९ त्यानंतर मी कोठारं* स्वच्छ करण्याची आज्ञा दिली आणि मग खऱ्या देवाच्या मंदिरातली भांडी,+ तसंच अन्नार्पणाचं सामान आणि ऊद+ तिथे परत ठेवला.
१० मला असंही कळलं, की लेव्यांसाठी असलेले भाग+ त्यांना देण्यात आले नव्हते.+ त्यामुळे, मंदिरात सेवा करणारे लेवी आणि गायक आपापल्या शेताकडे+ परत गेले होते.
११ म्हणून मी उपअधिकाऱ्यांना खडसावून विचारलं:+ “खऱ्या देवाच्या मंदिराकडे असं दुर्लक्ष का करण्यात आलं?”+ मग मी त्यांना* एकत्र जमवलं आणि त्यांना आपापल्या कामावर पुन्हा नेमलं.
१२ मग यहूदातल्या सर्व लोकांनी धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल यांचा दहावा भाग+ कोठारांमध्ये आणला.+
१३ त्यानंतर मी याजक असलेला शलेम्याह, शास्त्री* सादोक, आणि लेव्यांमधला पदायाह यांना कोठारांवर अधिकारी नेमलं. जक्कूरचा मुलगा, म्हणजे मत्तन्याहचा नातू हानान हा त्यांचा सहायक होता. ही सर्व माणसं भरवशालायक होती आणि आपल्या भावांना त्यांचे भाग वाटून देण्याची जबाबदारी त्यांची होती.
१४ हे माझ्या देवा, मी केलेल्या या गोष्टींची आठवण ठेव+ आणि तुझ्या मंदिरासाठी आणि त्यात सेवा करणाऱ्यांसाठी* मी जे एकनिष्ठ प्रेम दाखवलं, ते विसरू नकोस.+
१५ त्या दिवसांत मी असं पाहिलं, की यहूदातले लोक शब्बाथाच्या दिवशीही द्राक्षकुंडांत द्राक्षं तुडवायचे.+ ते धान्याच्या पेंढ्या आणून गाढवांवर लादायचे, तसंच द्राक्षारस, द्राक्षं, अंजिरं आणि सर्व प्रकारचा माल शब्बाथाच्या दिवशी यरुशलेमला आणायचे.+ म्हणून मी त्यांना ताकीद दिली, की त्यांनी त्या दिवशी कोणतंही सामान विकू नये.*
१६ शिवाय, शहरात राहणारे सोरचे लोकही मासे आणि सर्व प्रकारच्या वस्तू आणून, यहूदाच्या लोकांना यरुशलेममध्ये शब्बाथाच्या दिवशी विकायचे.+
१७ त्यामुळे, मी यहूदाच्या उच्च घराण्यांतल्या लोकांवर रागावलो आणि त्यांना विचारलं: “तुम्ही हे दुष्ट काम करून शब्बाथाच्या दिवसाला अपवित्र का करताय?
१८ तुमच्या वाडवडिलांनीही हेच केलं नव्हतं का? आणि यामुळेच ही सगळी संकटं आपल्या देवाने आपल्यावर आणि या शहरावर आणली नव्हती का? आता शब्बाथाचा दिवस अपवित्र करून,+ तुम्हीही देवाला इस्राएलचा आणखीन राग येईल असं वागताय.”
१९ म्हणून शब्बाथ सुरू होण्याआधी यरुशलेमच्या फाटकांवर अंधार पडू लागताच, दरवाजे बंद केले जावेत अशी मी आज्ञा दिली. तसंच, शब्बाथ संपेपर्यंत दरवाजे उघडले जाऊ नयेत, असंही मी त्यांना बजावलं. शिवाय, शब्बाथाच्या दिवशी कोणतंही सामान आत आणलं जाऊ नये, म्हणून मी स्वतःच्या काही सेवकांना फाटकांजवळ उभं केलं.
२० त्यामुळे, एकदोनदा व्यापाऱ्यांना आणि सर्व प्रकारचा माल विकणाऱ्यांना यरुशलेमच्या बाहेरच रात्र घालवावी लागली.
२१ तेव्हा, मी त्यांना म्हणालो, “तुम्ही रात्रीचे असे भिंतीबाहेर का थांबून राहता?” मग मी त्यांना ताकीद दिली, “परत कधी असं केलंत, तर मला जबरदस्तीने तुम्हाला हाकलून द्यावं लागेल.” त्या वेळेपासून ते पुन्हा कधीही शब्बाथाच्या दिवशी आले नाहीत.
२२ मग मी लेव्यांना सांगितलं, की त्यांनी नियमितपणे स्वतःला शुद्ध करावं आणि शब्बाथाचा दिवस पवित्र ठेवण्यासाठी+ फाटकांवर पहारा द्यावा. हे माझ्या देवा, मी केलेल्या या गोष्टीचीही तू आठवण ठेव आणि तुझ्या अपार एकनिष्ठ प्रेमामुळे मला दया दाखव.+
२३ त्या दिवसांत मी असंही पाहिलं, की यहुद्यांनी अश्दोदी,+ अम्मोनी आणि मवाबी+ स्त्रियांशी लग्न केलं होतं.*+
२४ त्यांची अर्धी मुलं अश्दोदी आणि बाकीची मुलं इतर विदेशी भाषा बोलत होती, पण त्यांच्यापैकी कोणालाही यहुद्यांची भाषा येत नव्हती.
२५ म्हणून मी त्यांना खडसावलं आणि सक्त ताकीद दिली. मी त्यांच्यापैकी काही माणसांना मार दिला+ आणि त्यांचे केस उपटले. मी त्यांना देवाच्या नावाने अशी शपथ घ्यायला लावली, की आम्ही आपल्या मुली त्यांच्या मुलांना देणार नाही आणि त्यांच्या मुली आमच्यासाठी किंवा आमच्या मुलांसाठी करणार नाही.+
२६ मग मी त्यांना म्हणालो, “इस्राएलच्या शलमोन राजाला अशा स्त्रियांनीच पाप करायला लावलं नव्हतं का? सगळ्या राष्ट्रांमध्ये त्याच्यासारखा राजा शोधून सापडला नसता.+ देवाचंही त्याच्यावर खूप प्रेम होतं,+ त्यामुळे त्याने संपूर्ण इस्राएलचं राज्य त्याच्या हाती दिलं होतं. पण, त्याच्या विदेशी बायकांनी त्यालाही पाप करायला लावलं.+
२७ आता तुम्हीही विदेशी बायकांशी लग्न करण्याचं हे भयंकर पाप करून, आपल्या देवाशी अविश्वासूपणे वागताय. खरंच, माझा यावर विश्वासच बसत नाही!”+
२८ महायाजक एल्याशीब+ याचा मुलगा योयादा+ याच्या मुलांपैकी एकाने, होरोनी सनबल्लटच्या+ मुलीशी लग्न केलं होतं. म्हणून मी त्याला हाकलून लावलं.
२९ हे माझ्या देवा, त्यांना लक्षात ठेव, कारण त्यांनी याजकपद दूषित केलं आहे आणि याजकपदाचा व लेव्यांसोबतचा करार+ अपवित्र केला आहे.
३० अशा प्रकारे, मी त्यांना विदेश्यांच्या प्रभावापासून पूर्णपणे शुद्ध केलं आणि याजकांना आणि लेव्यांना आपापल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी नेमलं.+
३१ तसंच, मी वेळच्या वेळी लाकडं आणि पहिलं पीक मंदिरात आणलं जाण्याची व्यवस्था केली.+
म्हणून हे माझ्या देवा, माझी आठवण ठेव आणि मला आशीर्वाद दे.+
तळटीपा
^ किंवा “मिश्र वंशाच्या.”
^ किंवा “जेवणाच्या खोल्यांचा.”
^ शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “दशांश.”
^ किंवा “जेवणाची खोली.”
^ किंवा “जेवणाच्या खोलीतून.”
^ किंवा “जेवणाच्या खोल्या.”
^ म्हणजे, लेवी आणि गायक यांना.
^ किंवा “प्रती तयार करणारा.”
^ किंवा “त्याचं रक्षण करणाऱ्यांसाठी.”
^ किंवा कदाचित, “त्यांना त्या दिवशी ताकीद दिली, की त्यांनी कोणतंही सामान विकू नये.”
^ किंवा “स्त्रियांना आपल्या घरी आणलं होतं.”