उपदेशक ११:१-१०

  • संधीचं सोनं करा (१-८)

    • “आपलं अन्‍न पाण्यावर सोड” ()

    • सकाळपासून संध्याकाळपर्यंत बी पेर ()

  • तारुण्याचा विचारपूर्वक आनंद घे (९, १०)

११  आपलं अन्‍न* पाण्यावर सोड.+ बऱ्‍याच दिवसांनी तुला ते परत मिळेल.+ २  तुझ्याजवळ असलेल्या वस्तू सात किंवा आठ जणांना वाट,+ कारण पृथ्वीवर कोणती विपत्ती* येईल हे तुला माहीत नाही. ३  ढग पाण्याने भरले, की पृथ्वीवर पाऊस पडतोच. झाड दक्षिणेकडे पडो किंवा उत्तरेकडे, ते जिथे पडतं तिथेच राहतं. ४  जो वाऱ्‍याकडे पाहत राहतो, तो पेरणी करणार नाही आणि जो ढगांकडे पाहत राहतो, तो कापणी करणार नाही.+ ५  गरोदर स्त्रीच्या पोटात वाढणाऱ्‍या बाळाच्या हाडांमध्ये* जीवन-शक्‍ती* कशी कार्य करते, हे तुला माहीत नाही.+ त्याच प्रकारे, सर्व गोष्टी करणाऱ्‍या खऱ्‍या देवाचं कार्य तू समजू शकत नाहीस.+ ६  सकाळीच बी पेर आणि संध्याकाळपर्यंत आपल्या हाताला विश्रांती देऊ नकोस.+ कारण कोणतं बी फळ देईल, हे की ते, किंवा दोन्ही चांगली निघतील हे तुला माहीत नाही. ७  उजेड सुखावणारा असतो आणि सूर्याकडे पाहणं डोळ्यांसाठी चांगलं असतं. ८  माणूस बरीच वर्षं जगला, तर त्याने ती सर्व आनंदात घालवावीत.+ पण अंधाराचा काळही मोठा असू शकतो, हे त्याने आठवणीत ठेवावं; पुढे येणारं सर्वकाही व्यर्थ आहे.+ ९  तुझ्या तरुणपणाच्या दिवसांत आनंदी राहा आणि तुझ्या तारुण्याच्या काळात तुझं मन सुखी असो. मनाला वाटेल त्या मार्गाने चाल आणि तुझे डोळे दाखवतील त्या वाटेने जा. पण या सर्व गोष्टींबद्दल खरा देव तुझ्याकडून हिशोब घेईल,* हे लक्षात ठेव.+ १०  म्हणून, दुःख देणाऱ्‍या गोष्टी आपल्या मनातून काढून टाक आणि नुकसान करणाऱ्‍या गोष्टी आपल्या शरीरापासून दूर ठेव, कारण तारुण्य आणि तारुण्यातला जोमही व्यर्थच आहे.+

तळटीपा

किंवा “भाकर.”
किंवा “संकट.”
हे देवाच्या पवित्र शक्‍तीलाही सूचित करतं.
शब्दशः “गर्भातल्या हाडांत.”
किंवा “तुझा न्याय करेल.”