उत्पत्ती ६:१-२२
६ पृथ्वीवर मानवांची संख्या वाढू लागली आणि त्यांना मुली झाल्या,
२ तेव्हा खऱ्या देवाच्या मुलांनी*+ पाहिलं, की मानवांच्या मुली दिसायला सुंदर आहेत. म्हणून त्यांपैकी त्यांना ज्या आवडल्या त्या त्यांनी बायका करून घेतल्या.
३ मग यहोवा म्हणाला: “मनुष्य पापी असल्यामुळे* मी त्याला नेहमीसाठी सहन करणार नाही.+ म्हणून त्याचे दिवस १२० वर्षं असतील.”+
४ त्या काळात आणि नंतरही पृथ्वीवर नेफिलीम* होते. तेव्हा खऱ्या देवाच्या मुलांनी मानवांच्या मुलींशी संबंध ठेवले आणि त्यांच्यापासून त्यांना मुलं झाली. ही जुन्या काळातली शक्तिशाली आणि नावाजलेली माणसं होती.
५ यहोवा देवाने पाहिलं, की पृथ्वीवर माणसांचा दुष्टपणा फार वाढला आहे आणि त्यांच्या मनातला प्रत्येक विचार आणि इच्छा ही नेहमी वाईटच असते.+
६ पृथ्वीवर मानवाला निर्माण केल्याचा यहोवाला पस्तावा झाला* आणि त्याला मनापासून वाईट वाटलं.*+
७ म्हणून यहोवा म्हणाला: “मी निर्माण केलेल्या मानवांचा मी या पृथ्वीवरून नाश करीन. मानवांसोबत पाळीव प्राणी, रांगणारे प्राणी आणि आकाशात उडणारे पक्षी व जीवजंतू यांचाही मी नाश करीन. कारण त्यांना बनवल्याचा मला पस्तावा होत आहे.”
८ पण यहोवाच्या नजरेत नोहा चांगला माणूस होता.
९ हा नोहाचा वृत्तान्त आहे.
नोहा एक नीतिमान माणूस होता.+ त्याच्या काळातल्या लोकांमध्ये* तो निर्दोष होता. नोहा खऱ्या देवासोबत चालला.+
१० पुढे नोहाला तीन मुलं झाली, शेम, हाम आणि याफेथ.+
११ खऱ्या देवाच्या नजरेत पृथ्वी भ्रष्ट झाली होती आणि सगळीकडे हिंसाचार चालला होता.
१२ देवाने पृथ्वीकडे पाहिलं, तेव्हा ती खरोखर भ्रष्ट झाली होती.+ पृथ्वीवरचे सर्व लोक वाईट मार्गाला लागले होते.+
१३ यानंतर देव नोहाला म्हणाला: “मी सगळ्या मानवांचा नाश करायचं ठरवलं आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर हिंसाचार खूप वाढला आहे. म्हणून मी त्यांचा आणि पृथ्वीचा नाश करीन.+
१४ तू आपल्यासाठी चांगल्या लाकडापासून* एक जहाज* बनव.+ त्यामध्ये खोल्या बनव आणि त्याला आतून बाहेरून डांबर+ लाव.
१५ जहाज अशा प्रकारे बनव: जहाजाची लांबी ३०० हात,* रुंदी ५० हात आणि उंची ३० हात असावी.
१६ उजेड येण्यासाठी जहाजाच्या छतापासून एक हात लांबीची खिडकी* बनव. जहाजाच्या एका बाजूला त्याचा दरवाजा बनव.+ आणि जहाजात खालचा, दुसरा आणि तिसरा मजला बनव.
१७ मी पृथ्वीवर जलप्रलय* आणणार आहे+ आणि ज्यांच्यात जीवनाचा श्वास* आहे अशा आकाशाखालच्या सगळ्या प्राण्यांचा नाश करणार आहे. पृथ्वीवर असलेल्या सर्व गोष्टींचा नाश होईल.+
१८ पण मी तुझ्यासोबत एक करार करतो. तू जहाजात जा आणि आपल्यासोबत आपली मुलं, बायको आणि आपल्या सुनांनाही घेऊन जा.+
१९ आणि तुझ्यासोबत सर्व प्रकारच्या प्राण्यांचा+ जीव वाचावा म्हणून, त्यांच्यातल्या नर आणि मादी+ अशा दोन-दोन प्राण्यांना जहाजात घेऊन जा;
२० आकाशात उडणारे पक्षी आणि जीवजंतू त्यांच्या जातींप्रमाणे, पाळीव प्राणी त्यांच्या जातींप्रमाणे, तसंच, जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी त्यांच्या जातींप्रमाणे तुझ्याकडे येतील. तू त्यांना जिवंत वाचवावं म्हणून प्रत्येक जातीतून दोन-दोन प्राणी तुझ्याकडे येतील.+
२१ तू आपल्यासाठी आणि प्राण्यांसाठी लागणारं सर्व प्रकारचं अन्न गोळा करून आपल्यासोबत जहाजात ने.”+
२२ देवाने जे काही करण्याची आज्ञा दिली होती त्याप्रमाणे नोहाने केलं. त्याने अगदी तसंच केलं.+
तळटीपा
^ स्वर्गदूतांना सूचित करणारा हिब्रू भाषेतला एक वाक्प्रचार.
^ किंवा “मनुष्य आपल्या शरीराच्या इच्छांप्रमाणे वागत असल्यामुळे.”
^ म्हणजे कदाचित, “पाडणारे,” म्हणजे जे इतरांना खाली पाडतात. शब्दार्थसूची पाहा.
^ किंवा “दुःख झालं.”
^ किंवा “त्याचं मन दुःखी झालं.”
^ शब्दशः “त्याच्या पिढ्यांमध्ये.”
^ शब्दशः “गोफेरची झाडं,” रेझीनयुक्त लाकूड कदाचित सायप्रस झाडाचं लाकूड.
^ शब्दशः “पेटी.” हे चौकोनी कोपरे आणि खालचा भाग सपाट असलेल्या पेटीच्या आकाराच्या एका लांबुळक्या जहाजाला सूचित करतं.
^ हिब्रू भाषेत सोहर. काहींचं म्हणणं आहे, की सोहर हा शब्द उजेडासाठी असलेल्या झरोक्याला किंवा खिडकीला सूचित करत नाही, तर, एक हात लांबीचा उतार असलेल्या छताला सूचित करतो.
^ किंवा “जीवन शक्ती.”
^ किंवा “पूर.”