उत्पत्ती ४०:१-२३
४० नंतर, इजिप्तच्या राजाचा मुख्य प्यालेबरदार*+ आणि मुख्य आचारी यांनी आपल्या प्रभूविरुद्ध, म्हणजेच इजिप्तच्या राजाविरुद्ध अपराध केला.
२ तेव्हा फारो त्याच्या या दोन अधिकाऱ्यांवर, म्हणजे त्याचा मुख्य प्यालेबरदार आणि मुख्य आचारी+ यांच्यावर संतापला.
३ म्हणून, त्याने त्यांना पहारेकऱ्यांच्या प्रमुखाच्या+ घरात असलेल्या तुरुंगात टाकलं. योसेफही त्याच तुरुंगात कैद होता.+
४ मग पहारेकऱ्यांच्या प्रमुखाने योसेफला त्यांच्यासोबत राहून त्यांची सेवा करायला नेमलं.+ ते काही काळ* तिथे कैदेत होते.
५ तुरुंगात असताना एका रात्री इजिप्तच्या राजाचा प्यालेबरदार आणि आचारी या दोघांनाही स्वप्न पडलं आणि प्रत्येकाच्या स्वप्नाचा अर्थ वेगवेगळा होता.
६ दुसऱ्या दिवशी सकाळी योसेफ त्यांना भेटायला गेला, तेव्हा ते दोघंही उदास दिसत होते.
७ तेव्हा योसेफने त्याच्या मालकाच्या घरात आपल्यासोबत कैदेत असलेल्या फारोच्या अधिकाऱ्यांना विचारलं: “आज तुमचे चेहरे असे उतरलेले का दिसतात?”
८ यावर ते त्याला म्हणाले: “आम्हा दोघांनाही स्वप्नं पडली, पण त्यांचा अर्थ सांगणारा कोणीही नाही.” तेव्हा योसेफ त्यांना म्हणाला: “अर्थ सांगणारा देवच नाही का?+ कृपा करून तुमची स्वप्नं मला सांगा.”
९ मग मुख्य प्यालेबरदाराने आपलं स्वप्न योसेफला सांगितलं. तो म्हणाला: “स्वप्नात मी एक द्राक्षाचा वेल पाहिला.
१० त्या वेलाला तीन फांद्या होत्या आणि त्यांना कोंब फुटले होते. त्यांना फुलं येऊन नंतर द्राक्षांचे गुच्छ बनले.
११ आणि माझ्या हातात फारोचा प्याला होता. मी ती द्राक्षं घेऊन फारोच्या प्याल्यात पिळली आणि मग तो प्याला फारोच्या हातात दिला.”
१२ तेव्हा योसेफ त्याला म्हणाला: “त्याचा अर्थ असा आहे: त्या तीन फांद्या म्हणजे तीन दिवस.
१३ आजपासून तीन दिवसांनी फारो तुला इथून बाहेर काढेल* आणि तुला तुझं पद परत देईल.+ तू आधी प्यालेबरदार असताना जसा फारोच्या हातात प्याला द्यायचास, तसाच पुन्हा देशील.+
१४ पण जेव्हा तुझं भलं होईल, तेव्हा माझी आठवण ठेव. कृपा करून माझ्याबद्दल एकनिष्ठ प्रेम दाखव आणि माझी इथून सुटका करण्यासाठी फारोला माझ्याबद्दल सांग.
१५ खरंतर, मला इब्री लोकांच्या देशातून+ पळवून आणलं आहे आणि मला तुरुंगात* टाकलं जावं, असं कोणतंही काम मी इथे केलेलं नाही.”+
१६ योसेफने सांगितलेला अर्थ चांगला आहे, हे पाहिल्यावर मुख्य आचारी त्याला म्हणाला: “मला स्वप्नात माझ्या डोक्यावर पांढऱ्या भाकरींच्या तीन टोपल्या दिसल्या.
१७ सर्वात वरच्या टोपलीत फारोसाठी सगळ्या प्रकारचे भाजलेले पदार्थ होते आणि माझ्या डोक्यावरच्या टोपलीतून पक्षी ते पदार्थ खात होते.”
१८ तेव्हा योसेफ म्हणाला: “त्याचा अर्थ असा आहे: तीन टोपल्या म्हणजे तीन दिवस.
१९ आजपासून तीन दिवसांनी फारो तुझं डोकं उडवेल* आणि तुला वधस्तंभावर लटकवेल आणि पक्षी तुझं मांस खातील.”+
२० तीन दिवसांनी फारोचा वाढदिवस होता+ आणि त्याने आपल्या सर्व सेवकांना मेजवानी दिली. मग त्याने आपल्या मुख्य प्यालेबरदाराला आणि मुख्य आचाऱ्याला, आपल्या सर्व सेवकांसमोर बाहेर आणण्याची* आज्ञा दिली.
२१ त्याने आपल्या मुख्य प्यालेबरदाराला त्याचं पद पुन्हा दिलं आणि तो आधीसारखाच फारोला प्याला देण्याचं काम करू लागला.
२२ पण योसेफने स्वप्नांचा अर्थ सांगितल्याप्रमाणे, फारोने मुख्य आचाऱ्याला वधस्तंभावर लटकवलं.+
२३ मुख्य प्यालेबरदाराने मात्र योसेफची आठवण ठेवली नाही, तो त्याला विसरून गेला.+
तळटीपा
^ राजाला द्राक्षारस किंवा इतर पेयं देणारा दरबारातला अधिकारी.
^ शब्दशः “दिवस.”
^ शब्दशः “तुझं डोकं वर करेल.”
^ शब्दशः “कुंड; खड्डा.”
^ शब्दशः “तुझ्यापासून तुझं डोकं वर करेल.”
^ शब्दशः “त्याने डोकं वर केलं.”