उत्पत्ती २४:१-६७

  • इसहाकसाठी बायकोचा शोध (१-५८)

  • रिबका इसहाकला भेटायला जाते (५९-६७)

२४  आता अब्राहाम म्हातारा झाला होता, त्याचं बरंच वय झालं होतं आणि यहोवाने अब्राहामला सर्व बाबतींत आशीर्वाद दिला होता.+ २  अब्राहाम आपल्या घरातल्या सर्व गोष्टींवर देखरेख करणाऱ्‍या सगळ्यात जुन्या सेवकाला+ म्हणाला: “कृपा करून, तुझा हात माझ्या मांडीखाली ठेव ३  आणि आकाश व पृथ्वीचा देव यहोवा याची शपथ घे, की ज्या कनानी लोकांमध्ये मी राहत आहे, त्यांच्या मुलींमधून तू माझ्या मुलासाठी बायको शोधणार नाहीस.+ ४  त्याऐवजी तू माझ्या देशात, माझ्या नातेवाइकांकडे जा+ आणि माझा मुलगा इसहाक याच्यासाठी मुलगी शोधून आण.” ५  पण तो सेवक त्याला म्हणाला: “जर ती मुलगी माझ्यासोबत या देशात यायला तयार नसेल तर? मग मी तुमच्या मुलाला, तुम्ही जिथून आला आहात त्या देशात नेऊ का?”+ ६  यावर अब्राहाम त्याला म्हणाला: “माझ्या मुलाला तिथे मुळीच नेऊ नकोस.+ ७  स्वर्गाचा देव यहोवा, ज्याने मला माझ्या वडिलांच्या घरातून आणि माझ्या नातेवाइकांच्या देशातून बाहेर आणलं+ आणि ज्याने माझ्याशी बोलून मला असं वचन दिलं,+ की ‘मी तुझ्या संततीला*+ हा देश देईन,’+ तो तुझ्यापुढे एका दूताला पाठवेल+ आणि तू नक्कीच त्या देशातून माझ्या मुलासाठी एक मुलगी शोधून आणशील.+ ८  जर ती मुलगी या देशात यायला तयार झाली नाही, तर तू या शपथेतून मोकळा होशील. पण तू माझ्या मुलाला तिथे घेऊन जाऊ नकोस.” ९  तेव्हा त्या सेवकाने आपला मालक अब्राहाम याच्या मांडीखाली हात ठेवला आणि या गोष्टीबद्दल शपथ घेतली.+ १०  मग तो सेवक आपल्या मालकाचे दहा उंट घेऊन निघाला. त्याने आपल्या मालकाकडून बऱ्‍याच प्रकारच्या भेटवस्तूही सोबत घेतल्या. तिथून प्रवास करत तो मेसोपटेम्याला, नाहोरच्या नगराकडे जायला निघाला. ११  त्या नगराजवळ आल्यावर त्याने एका विहिरीजवळ आपल्या उंटांना बसवलं. तेव्हा संध्याकाळची वेळ होती आणि सहसा या वेळी बायका पाणी भरायला निघायच्या. १२  मग तो म्हणाला: “यहोवा, माझा मालक अब्राहाम याच्या देवा, कृपा करून आज मला यश दे आणि माझा मालक अब्राहाम याच्यावरचं तुझं एकनिष्ठ प्रेम दाखव. १३  मी या विहिरीजवळ उभा आहे आणि गावातल्या मुली पाणी भरायला येत आहेत. १४  असं होऊ दे, की ज्या मुलीला मी म्हणेन, ‘कृपा करून, मला तुझ्या घागरीतून थोडं पाणी प्यायला दे’ आणि जी मला म्हणेल, ‘हो घ्या ना आणि मी तुमच्या उंटांनाही पाणी पाजते,’ तीच मुलगी तू आपला सेवक इसहाक याच्यासाठी निवडलेली मुलगी असू दे; यावरून मला कळेल की माझ्या मालकावर तुझं एकनिष्ठ प्रेम आहे.” १५  त्याचं बोलणं संपण्याआधीच, रिबका आपल्या खांद्यावर पाण्याची घागर घेऊन तिथे आली. ती अब्राहामचा भाऊ नाहोर+ याला, त्याची बायको मिल्का+ हिच्यापासून झालेल्या बथुवेलची+ मुलगी होती. १६  ती खूप सुंदर होती. ती कुमारी होती, कोणत्याही पुरुषाने आजपर्यंत तिच्याशी संबंध ठेवले नव्हते. ती खाली विहिरीजवळ गेली आणि आपली घागर भरून पुन्हा वर आली. १७  तेव्हा अब्राहामचा सेवक धावत तिच्याजवळ गेला आणि म्हणाला: “कृपा करून तुझ्या घागरीतून मला घोटभर पाणी प्यायला दे.” १८  तेव्हा ती म्हणाली: “घ्या प्रभू, प्या.” असं म्हणून तिने लगेच आपली घागर खांद्यावरून उतरवली आणि त्याला पाणी दिलं. १९  त्याला पाणी दिल्यावर ती म्हणाली: “मी तुमच्या उंटांसाठीही हवं तितकं पाणी काढते.” २०  तेव्हा तिने लगेच आपली घागर हौदात रिकामी केली आणि मग ती पुन्हापुन्हा विहिरीकडे जाऊन त्याच्या सगळ्या उंटांसाठी पाणी काढत राहिली. २१  हे सर्व घडत असताना, तो सेवक तिच्याकडे आश्‍चर्याने पाहत होता आणि यहोवाने आपला प्रवास यशस्वी केला आहे की नाही, यावर मनातल्या मनात विचार करत होता. २२  उंटांचं पाणी पिऊन झाल्यावर, त्या माणसाने अर्धा शेकेल* वजनाची एक सोन्याची नथ आणि दहा शेकेल* वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या तिच्यासाठी काढल्या, २३  आणि तो तिला म्हणाला: “तू कोणाची मुलगी आहेस हे कृपा करून मला सांगशील का? तुझ्या वडिलांच्या घरी आम्हाला रात्री मुक्काम करण्यासाठी एखादी खोली आहे का?” २४  तेव्हा ती त्याला म्हणाली: “मी नाहोरला+ मिल्कापासून झालेल्या बथुवेलची मुलगी+ आहे.” २५  ती पुढे म्हणाली: “हो आमच्याकडे मुक्कामासाठी जागा आहे आणि उंटांसाठी भरपूर चारा आणि पेंढाही आहे.” २६  मग त्याने जमिनीवर डोकं टेकवून यहोवाचे आभार मानले, २७  आणि म्हणाला: “माझा मालक अब्राहाम याचा देव यहोवा याची स्तुती असो! कारण त्याने माझ्या मालकाबद्दल एकनिष्ठ प्रेम आणि विश्‍वासूपणा दाखवायचं सोडलं नाही. यहोवानेच मला माझ्या मालकाच्या भावांच्या घरापर्यंत आणलं आहे.” २८  तेव्हा ती मुलगी या सर्व गोष्टी आपल्या आईला आणि घरातल्या इतरांना सांगायला धावत गेली. २९  रिबकाला लाबान नावाचा एक भाऊ होता.+ तो त्या माणसाकडे विहिरीजवळ धावत गेला. ३०  जेव्हा लाबानने नथ आणि आपल्या बहिणीच्या हातातल्या बांगड्या पाहिल्या, आणि “तो माणूस मला असं-असं म्हणाला” हे रिबकाचे शब्द ऐकले, तेव्हा तो त्या माणसाला भेटायला गेला. तो माणूस अजूनही विहिरीजवळ उंटांसोबत उभा होता. ३१  तो त्याला म्हणाला: “चला ना, तुम्ही इथे का उभे आहात? यहोवाचा खरोखरच तुमच्यावर आशीर्वाद आहे. मी तुमच्या मुक्कामासाठी घरात सगळी व्यवस्था केली आहे. उंटांसाठीही जागा आहे.” ३२  तेव्हा तो माणूस घरात आला आणि त्याने* उंटांना मोकळं केलं आणि त्यांना चारा आणि पेंढा दिला. तसंच त्याने त्या माणसाला आणि त्याच्यासोबत असलेल्यांना पाय धुण्यासाठी पाणी दिलं. ३३  मग जेवण वाढण्यात आलं तेव्हा तो म्हणाला: “मी जोपर्यंत सगळी हकिगत तुम्हाला सांगत नाही, तोपर्यंत काहीही खाणार नाही.” तेव्हा लाबान म्हणाला: “बोला.” ३४  तो म्हणाला: “मी अब्राहामचा सेवक आहे.+ ३५  यहोवाने माझ्या मालकाला खूप आशीर्वाद दिला आहे आणि त्याला गुरंढोरं, सोनंचांदी, दासदासी आणि उंट व गाढवं देऊन खूप श्रीमंत केलं आहे.+ ३६  माझ्या मालकाची बायको सारा, हिने तिच्या म्हातारपणी त्याच्या मुलाला जन्म दिला.+ मालक आपल्याजवळ असलेलं सगळं त्यालाच देतील.+ ३७  माझ्या मालकाने मला अशी शपथ दिली: ‘ज्या कनानी लोकांमध्ये मी राहत आहे, त्यांच्या मुलींमधून तू माझ्या मुलासाठी बायको शोधू नकोस.+ ३८  तर तू माझ्या वडिलांच्या घरी, माझ्या नातेवाइकांकडे जा+ आणि माझ्या मुलासाठी मुलगी शोधून आण.’+ ३९  पण मी माझ्या मालकाला म्हणालो: ‘जर ती मुलगी माझ्यासोबत या देशात यायला तयार नसेल तर?’+ ४०  मालक मला म्हणाले: ‘ज्या यहोवा देवाच्या मार्गावर मी चाललो आहे,+ तो तुझ्यापुढे एका दूताला पाठवेल+ आणि तुझा प्रवास नक्कीच यशस्वी करेल आणि तू माझ्या नातेवाइकांतून आणि माझ्या वडिलांच्या घराण्यातून माझ्या मुलासाठी एक मुलगी शोधून आण.+ ४१  जर तू माझ्या नातेवाइकांकडे गेलास आणि त्यांनी त्यांच्या मुलीला तुझ्यासोबत पाठवायला नकार दिला, तर तू या शपथेतून मोकळा होशील.’+ ४२  आज जेव्हा मी विहिरीजवळ आलो तेव्हा मी म्हणालो: ‘यहोवा, माझा मालक अब्राहाम याच्या देवा, माझा प्रवास यशस्वी होऊ दे. ४३  मी या विहिरीजवळ उभा आहे. असं होऊ दे, की जी मुलगी+ पाणी भरायला येईल आणि मी तिला म्हणेन, “कृपा करून, मला तुझ्या घागरीतून थोडं पाणी प्यायला दे,” ४४  आणि जी मला म्हणेल, “हो घ्या ना आणि मी तुमच्या उंटांनाही पाणी पाजते,” तीच मुलगी यहोवाने माझ्या मालकाच्या मुलासाठी निवडलेली मुलगी असू दे.’+ ४५  मी मनातल्या मनात असं बोलत असतानाच, रिबका खांद्यावर आपली घागर घेऊन तिथे आली. ती खाली विहिरीजवळ जाऊन पाणी भरू लागली. तेव्हा मी तिला म्हणालो: ‘कृपा करून, मला प्यायला थोडं पाणी दे.’+ ४६  तेव्हा ती लगेच खांद्यावरून घागर उतरवून म्हणाली: ‘घ्या,+ आणि मी तुमच्या उंटांसाठीही पाणी काढते.’ मग मी पाणी प्यायलो आणि तिने उंटांनाही पाणी पाजलं. ४७  त्यानंतर मी तिला विचारलं, ‘तू कोणाची मुलगी आहेस?’ तेव्हा ती म्हणाली: ‘मी नाहोरला मिल्कापासून झालेल्या बथुवेलची मुलगी आहे.’ मग मी तिच्या नाकात नथ आणि हातांत बांगड्या घातल्या.+ ४८  तेव्हा मी जमिनीवर डोकं टेकवून यहोवाला नमन केलं आणि माझा मालक अब्राहाम याचा देव यहोवा याची स्तुती केली,+ कारण त्याने माझ्या मालकाच्या मुलासाठी, त्याच्या भावाच्या मुलीला घेऊन जाता यावं, म्हणून मला योग्य मार्ग दाखवला. ४९  तर आता मला सांगा, की तुम्ही माझ्या मालकाबद्दल एकनिष्ठ प्रेम आणि विश्‍वासूपणा दाखवायला तयार आहात का? तुमची इच्छा नसेल, तर मला तसं सांगा, म्हणजे पुढे काय करायचं* ते मला ठरवता येईल.”+ ५०  मग लाबान आणि बथुवेल त्याला म्हणाले: “हे सगळं यहोवाने घडवून आणलं आहे. हो किंवा नाही म्हणणारे आम्ही कोण?* ५१  रिबका तुमच्यासमोर आहे. तिला घेऊन जा आणि यहोवाने म्हटल्याप्रमाणे ती तुमच्या मालकाच्या मुलाची बायको होईल.” ५२  अब्राहामच्या सेवकाने त्यांचे हे शब्द ऐकले, तेव्हा त्याने लगेच जमिनीवर डोकं टेकवून यहोवाला नमन केलं. ५३  मग त्याने आपल्याजवळचे सोन्याचांदीचे दागिने आणि कपडे रिबकाला दिले. तसंच, त्याने तिच्या भावाला आणि आईलाही मौल्यवान भेटवस्तू दिल्या. ५४  यानंतर, त्याने आणि त्याच्याबरोबरच्या माणसांनी खाणंपिणं केलं आणि रात्री तिथेच मुक्काम केला. सकाळी उठल्यावर अब्राहामचा सेवक म्हणाला: “आता तुमची परवानगी असेल, तर मी माझ्या मालकाकडे परत जातो.” ५५  यावर रिबकाचा भाऊ आणि तिची आई म्हणाली: “आमच्या मुलीला दहा दिवस तरी आमच्याजवळ राहू द्या. मग तिला घेऊन जा.” ५६  पण तो त्यांना म्हणाला: “यहोवाने माझा प्रवास यशस्वी केला आहे. तेव्हा आता मला अडवू नका. मला निरोप द्या म्हणजे मी माझ्या मालकाकडे परत जाईन.” ५७  तेव्हा ते म्हणाले: “आपण मुलीला बोलावून तिलाच विचारू.” ५८  मग त्यांनी रिबकाला बोलावलं आणि तिला विचारलं: “तू यांच्यासोबत जायला तयार आहेस का?” ती म्हणाली: “हो, मी तयार आहे.” ५९  तेव्हा त्यांनी आपली बहीण रिबका+ आणि तिची दाई*+ यांना अब्राहामचा सेवक आणि त्याच्या माणसांसोबत पाठवून दिलं. ६०  आणि त्यांनी रिबकाला आशीर्वाद दिला आणि ते तिला म्हणाले: “हे रिबका, तू हजारो लाखो वंशजांची आई हो आणि तुझी संतती* त्यांच्या शत्रूंच्या फाटकांचा* ताबा घेवो.”+ ६१  मग रिबका आणि तिच्या दासी उठल्या आणि उंटांवर बसून त्या माणसाच्या मागोमाग निघाल्या. अशा रितीने, अब्राहामचा सेवक रिबकाला घेऊन परत जायला निघाला. ६२  इसहाक नेगेब+ देशात राहत होता. बैर-लहाय-रोईच्या+ रस्त्याकडून येऊन तो ६३  संध्याकाळच्या वेळी एका शेतात फेरफटका मारत, आपल्या मनाशीच विचार करत होता.+ त्याने समोर पाहिलं तेव्हा त्याला उंट येताना दिसले! ६४  रिबकाने समोर पाहिलं, तेव्हा तिला इसहाक दिसला आणि ती लगेच उंटावरून खाली उतरली. ६५  मग तिने सेवकाला विचारलं: “आपल्याला भेटायला येणारा तो माणूस कोण आहे?” सेवक म्हणाला: “तो माझा मालक आहे.” तेव्हा तिने डोक्यावर पदर घेतला. ६६  मग आपण केलेल्या सर्व गोष्टी सेवकाने इसहाकला सांगितल्या. ६७  त्यानंतर इसहाकने रिबकाला आपली आई सारा हिच्या तंबूमध्ये आणलं.+ त्याने रिबकाशी लग्न केलं; तो तिच्या प्रेमात पडला+ आणि आपल्या आईच्या मृत्यूमुळे झालेल्या दुःखातून तो सावरला.*+

तळटीपा

शब्दशः “बीज.”
एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.
एक शेकेल म्हणजे ११.४ ग्रॅम. अति. ख१४ पाहा.
कदाचित हे लाबानला सूचित करत असावं.
शब्दशः “उजव्या हाताला वळायचं की डाव्या.”
किंवा “आम्ही तुम्हाला चांगलंवाईट काय हे सांगू शकत नाही.”
म्हणजे, तिची लहानपणीची दाई, जी आता तिची दासी होती.
शब्दशः “बीज.”
किंवा “शहरांचा.”
किंवा “त्याला सांत्वन मिळालं.”