ईयोब २४:१-२५
२४ सर्वशक्तिमान देव एक वेळ का ठरवत नाही?+
त्याला जाणणारे त्याचा दिवस* का पाहू शकत नाहीत?
२ लोक सीमेचे दगड हलवतात;+आपल्या कुरणासाठी ते दुसऱ्यांची मेंढरं चोरतात.
३ ते अनाथ मुलांचं* गाढव पळवून नेतात;ते विधवेचा बैल तारण म्हणून जप्त करतात.*+
४ ते गरिबांना मार्गावरून बाजूला करतात;दीनदुबळ्यांना त्यांच्यापासून लपावं लागतं.+
५ गोरगरीब जंगलातल्या रानगाढवांसारखे+ अन्न शोधत फिरतात;मुलाबाळांसाठी अन्न शोधत ते वाळवंटात भटकतात.
६ त्यांना दुसऱ्यांच्या शेतात कापणी करावी लागते*आणि ते दुष्टांच्या मळ्यात उरलेली द्राक्षं गोळा करतात.
७ ते कपड्यांशिवाय, उघडेच रात्र घालवतात.+
त्यांच्याजवळ थंडीत पांघरायला काहीच नसतं.
८ पर्वतावरून येणाऱ्या पावसाने ते ओलेचिंब होतात;आसरा नसल्यामुळे ते खडकांना बिलगून बसतात.
९ दुष्ट लोक वडील नसलेल्या मुलाला* आईच्या छातीपासून ओढून नेतात;+गोरगरिबांचे कपडे ते कर्जासाठी तारण म्हणून घेतात.+
१० त्यामुळे गोरगरिबांना उघडंच फिरावं लागतं;ते धान्याच्या पेंढ्या वाहून नेतात, पण स्वतः उपाशीच राहतात.
११ द्राक्षमळ्याच्या भिंतींमागे ते भर दुपारी राबतात;*
द्राक्षकुंडांमध्ये ते द्राक्ष तुडवतात, पण स्वतः तहानलेलेच राहतात.+
१२ शहरातून मरायला टेकलेल्यांचं कण्हणं ऐकू येतं;जखमी झालेले मदतीसाठी आक्रोश करतात,+पण देवाला याची काहीच पर्वा नाही.*
१३ दुष्ट प्रकाशाविरुद्ध बंड करतात;+त्यांना त्याचे मार्ग माहीत नाहीत,आणि ते त्याच्या मार्गांवर चालत नाहीत.
१४ खुनी पहाटेच उठतो;तो दीनदुबळ्यांची, गरिबांची कत्तल करतो,+आणि रात्री चोरी करतो.
१५ व्यभिचारी माणूस संध्याकाळची वाट पाहतो,+‘मला कोणी पाहणार नाही,’ असं म्हणून,+तो आपलं तोंड झाकून घेतो.
१६ दुष्ट रात्री घरं फोडतात;*
दिवसा ते आपल्या घरांमध्ये लपतात.
त्यांना प्रकाश माहीतच नसतो.+
१७ सकाळ त्यांना गडद अंधारासारखी वाटते;भयाण काळोख त्यांना ओळखीचा वाटतो.
१८ पण ते पाण्यासोबत वेगाने वाहून जातील.*
त्यांचा जमिनीचा वाटा शापित होईल.+
आपल्या द्राक्षमळ्यांकडे ते परत येणार नाहीत.
१९ उष्णतेमुळे आणि दुष्काळामुळे जसं बर्फाचं पाणी नाहीसं होतं,तसे पाप करणारे कबरेत* नाहीसे होतात.+
२० दुष्टाची आई* त्याला विसरेल; किडे त्याला फस्त करतील.
कोणालाही त्याची आठवण राहणार नाही.+
त्याला झाडाप्रमाणे तोडून टाकलं जाईल.
२१ तो वांझ स्त्रीवर अन्याय करतो,आणि विधवेवर अत्याचार करतो.
२२ देव* आपल्या ताकदीने शक्तिशाली लोकांचा नाश करेल;त्यांची भरभराट झाली, तरी त्यांना आपल्या जीवाचा भरवसा नसेल.
२३ देव* त्यांना निश्चिंत आणि निर्धास्त राहू देतो,+पण त्यांच्या सगळ्या कृत्यांवर* त्याची नजर असते.+
२४ ते थोड्या काळासाठी समृद्ध होतात, मग ते नाहीसे होतात.+
त्यांना खाली ओढलं जातं;+आणि कणसांप्रमाणे कापून, इतरांप्रमाणेच गोळा केलं जातं.
२५ आता सांगा, मला कोण खोटं ठरवू शकतं?
माझे शब्द चुकीचे आहेत, असं कोण म्हणू शकतं?”
तळटीपा
^ म्हणजे, त्याचा न्यायाचा दिवस.
^ किंवा “वडील नसलेल्या मुलांचं.”
^ किंवा “गहाण ठेवून घेतात.”
^ किंवा कदाचित, “शेतामध्ये चारा गोळा करावा लागतो.”
^ किंवा “अनाथाला.”
^ किंवा कदाचित, “टेकड्यांमधल्या भिंतींमागे तेल काढतात.”
^ किंवा कदाचित, “देव कोणालाच दोषी ठरवत नाही.”
^ शब्दशः “खणतात.”
^ शब्दशः “तो पाण्याच्या पृष्ठभागावर वेगवान असतो.”
^ हिब्रू भाषेत “शिओल.” शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “गर्भाशय.”
^ शब्दशः “तो.”
^ शब्दशः “तो.”
^ शब्दशः “त्यांच्या मार्गांवर.”