ईयोब १३:१-२८

  • ईयोबचं उत्तर पुढे सुरू (१-२८)

    • मी देवाशी बोलीन ()

    • तुम्ही बिनकामाचे वैद्य आहात ()

    • “मी निर्दोष आहे, हे मला माहीत आहे” (१८)

    • देव आपल्याला वैरी का समजतो, असं विचारतो (२४)

१३  खरंच, मी आपल्या डोळ्यांनी हे सर्व पाहिलं आहे,आणि कानांनी ते ऐकून, समजून घेतलं आहे.  २  तुम्हाला जे कळतं, ते मलाही कळतं;मी काही तुमच्यापेक्षा कमी नाही.  ३  त्यापेक्षा मी सर्वशक्‍तिमान देवाशी बोलीन;मी माझा वाद देवासमोर मांडीन.+  ४  तुम्ही खोटं बोलून माझ्या नावाला कलंक लावत आहात;तुम्ही सगळे बिनकामाचे वैद्य आहात.+  ५  तुम्ही जर अगदी गप्प बसलात,तरच तुमचं शहाणपण दिसून येईल.+  ६  कृपा करून मी मांडलेला वाद ऐकून घ्या,माझ्या याचनांकडे लक्ष द्या.  ७  देवाच्या वतीने तुम्ही अन्यायीपणे बोलाल का? त्याच्या वतीने तुम्ही कपटीपणे बोलाल का?  ८  तुम्ही त्याची बाजू घ्याल का? तुम्ही खऱ्‍या देवाची वकिली कराल का?  ९  देवाने पारखलं, तर तुम्ही निर्दोष ठराल का?+ माणसाला फसवता, तसं तुम्ही देवाला फसवाल का? १०  जर तुम्ही गुप्तपणे पक्षपात करण्याचा प्रयत्न केला,तर तो तुम्हाला नक्की ताडन करेल.+ ११  त्याच्या गौरवाचं तुम्हाला भय वाटणार नाही का? तुम्हाला त्याची धास्ती वाटणार नाही का? १२  तुमची बुद्धीची वचनं मातीमोल आहेत;* तुमचे वाद* मातीच्या ढालींसारखे कमजोर आहेत. १३  आता शांत राहा आणि मला बोलू द्या. पुढे माझं काय व्हायचं ते होईल! १४  मी आपणहून मरण का ओढवून घ्यावं?* मी आपला जीव धोक्यात का घालावा? १५  जरी त्याने मला ठार मारलं, तरी मी शेवटपर्यंत वाट पाहीन;+मी त्याच्यासमोर आपला वाद मांडीन.* १६  तेव्हा तो माझ्यासाठी तारण ठरेल,+कारण कोणीही दुष्ट माणूस* देवासमोर जाऊ शकत नाही.+ १७  माझे शब्द कान देऊन ऐका;माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. १८  पाहा, मी माझ्या दाव्याची तयारी केली आहे;मी निर्दोष आहे, हे मला माहीत आहे. १९  माझ्याशी कोण वाद करेल? शांत राहिलो तर मी मरून जाईन!* २०  हे देवा, माझ्या फक्‍त दोन विनंत्या मान्य कर,*म्हणजे मी स्वतःला तुझ्यापासून लपवणार नाही. २१  तुझा बलवान हात माझ्यापासून दूर कर,आणि मला घाबरवू नकोस.+ २२  एकतर तू बोल आणि मी उत्तर देईन,किंवा मला बोलू दे आणि तू उत्तर दे. २३  माझ्या हातून कोणत्या चुका आणि पापं घडली आहेत? माझे अपराध आणि माझं पाप काय ते मला सांग. २४  तू आपलं तोंड का फिरवतोस?+ आणि मला आपला वैरी का समजतोस?+ २५  वाऱ्‍याने उडणाऱ्‍या पानाला तू घाबरवशील का? किंवा सुक्या गवताच्या मागे धावशील का? २६  तू माझ्याविरुद्ध भयानक आरोपांची नोंद करत राहतोस,आणि माझ्या तरुणपणातल्या पापांचा हिशोब घेतोस. २७  तू माझे पाय खोड्यांत* अडकवले आहेस,तू माझ्या सर्व मार्गांवर पाळत ठेवतोसआणि माझ्या पाऊलखुणांवर नजर ठेवतोस. २८  त्यामुळे माणूस* एखाद्या कुजणाऱ्‍या वस्तूसारखा;कसर लागलेल्या कापडासारखा खराब होत जातो.

तळटीपा

शब्दशः “राखेची सुवचनं.”
शब्दशः “ढाली.”
शब्दशः “मी आपलं मांस दातात का धरावं?”
किंवा “माझ्या वागण्याचं समर्थन करीन.”
किंवा “देवाला सोडून देणारा माणूस.”
किंवा कदाचित, “कोणी राहू शकत असेल, तर मीही शांत राहीन आणि मरून जाईन.”
शब्दशः “फक्‍त दोन गोष्टी माझ्यासोबत करू नकोस.”
शब्दशः “तो.” हे कदाचित ईयोबला सूचित करत असावं.