अनुवाद ८:१-२०
८ आज मी तुम्हाला देत असलेली प्रत्येक आज्ञा काळजीपूर्वक पाळा, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल+ आणि फलदायी व्हाल. तसंच, जो देश देण्याबद्दल यहोवाने तुमच्या वाडवडिलांना वचन दिलं होतं,+ त्या देशात तुम्ही जाल आणि त्याचा ताबा घ्याल.
२ या ४० वर्षांत तुमचा देव यहोवा याने तुम्हाला ओसाड रानातून ज्या लांब रस्त्याने चालायला लावलं, तो आठवा.+ तुम्हाला नम्र करण्यासाठी आणि तुमची परीक्षा घेण्यासाठी,+ म्हणजेच तुमच्या मनात काय आहे+ आणि तुम्ही त्याच्या आज्ञा पाळाल की नाही, हे पाहण्यासाठी त्याने असं केलं.
३ त्याने तुम्हाला नम्र केलं आणि तुम्हाला उपाशी राहू दिलं;+ तुम्हाला किंवा तुमच्या वाडवडिलांनाही माहीत नसलेला मान्ना त्याने तुम्हाला खायला दिला.+ माणूस फक्त भाकरीने* नाही, तर यहोवाच्या तोंडातून निघणाऱ्या प्रत्येक वचनामुळे जगतो,+ याची तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी त्याने असं केलं.
४ या ४० वर्षांत तुम्ही घातलेले कपडे कधी जुने झाले नाहीत, किंवा तुमचे पाय कधी सुजले नाहीत.+
५ तुम्हाला चांगलं माहीत आहे, की जसा एखादा माणूस आपल्या मुलाला वळण लावतो, तसा तुमचा देव यहोवा तुम्हाला वळण लावत होता.+
६ म्हणून, तुम्ही तुमचा देव यहोवा याच्या मार्गांवर चालून आणि त्याचं भय मानून त्याच्या आज्ञा पाळा.
७ कारण तुमचा देव यहोवा तुम्हाला एका चांगल्या देशात नेत आहे.+ त्या देशाच्या दऱ्याखोऱ्यांतून आणि डोंगरांतून पाण्याचे ओढे, नाले आणि झरे* वाहतात.
८ तिथे जव आणि गहू उगवतात. तिथे द्राक्षवेली, तसंच अंजिरांची+ आणि डाळिंबांची झाडं आहेत. तो जैतुनाच्या तेलाचा आणि मधाचा देश आहे.+
९ त्या देशात तुम्हाला कधीही अन्न कमी पडणार नाही आणि कशाचीही कमतरता भासणार नाही; तिथल्या खडकांमध्ये लोखंड आहे आणि तिथल्या डोंगरांतून तुम्ही तांबं खणून काढाल.
१० पण जेव्हा तुम्ही खाऊन तृप्त व्हाल, तेव्हा हा चांगला देश तुम्हाला दिल्याबद्दल+ तुमचा देव यहोवा याची स्तुती करा.
११ सांभाळा, तुमचा देव यहोवा याला विसरू नका; म्हणजेच, त्याच्या ज्या आज्ञा, न्याय-निर्णय आणि कायदे आज मी तुम्हाला सांगत आहे, ते मोडू नका.
१२ जेव्हा तुम्ही खाऊन तृप्त व्हाल आणि सुंदर घरं बांधून त्यांत राहाल;+
१३ आणि जेव्हा तुमची मेंढरं आणि गुरंढोरं वाढतील, तसंच तुमच्याकडे भरपूर सोनंचांदी आणि मालमत्ता येईल,
१४ तेव्हा गर्विष्ठ बनू नका+ आणि ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून, म्हणजे तुमच्या गुलामगिरीच्या घरातून बाहेर आणलं, त्या तुमच्या यहोवा देवाला विसरू नका.+
१५ त्याने तुम्हाला विषारी साप आणि विंचू असलेल्या; तसंच, पाणी नसलेल्या कोरड्या जमिनीच्या, मोठ्या व भयानक रानातून* नेलं.+ त्याने गारगोटी खडकातून तुमच्यासाठी पाणी काढलं.*+
१६ त्याने ओसाड रानात, तुमच्या वाडवडिलांना माहीत नसलेला मान्ना तुम्हाला खायला दिला.+ पुढे तुमचं भलं व्हावं,+ म्हणून तुम्हाला नम्र करण्यासाठी+ आणि तुमची परीक्षा घेण्यासाठी त्याने असं केलं.
१७ जर कधी तुमच्या मनात असा विचार आला, की ‘ही सगळी संपत्ती मी स्वतःच्या बळावर आणि स्वतःच्या हिमतीवर मिळवली आहे,’+
१८ तर स्वतःला याची आठवण करून द्या, की संपत्ती मिळवण्याचं बळ तुमचा देव यहोवा तुम्हाला देतो.+ तुमच्या वाडवडिलांना वचन दिल्याप्रमाणे, आपला करार पाळण्यासाठी तो असं करतो, जसं की तो आजपर्यंत करत आला आहे.+
१९ जर तुम्ही कधी तुमचा देव यहोवा याला विसरून इतर देवांच्या मागे लागलात आणि त्यांच्यापुढे वाकून त्यांची उपासना करू लागलात, तर आज मी तुमच्याविरुद्ध साक्ष देतो, की तुमचा नक्की नाश होईल.+
२० यहोवा तुमच्यासमोर आज ज्या राष्ट्रांचा नाश करत आहे, त्यांच्यासारखाच तुमचाही नाश होईल, कारण तुम्ही आपला देव यहोवा याचं ऐकलं नाही.+
तळटीपा
^ किंवा “अन्नाने.”
^ किंवा “खोल पाण्याचे स्रोत.”
^ किंवा “ओसाड रानातून.”
^ किंवा “वाहायला लावलं.”