अनुवाद ५:१-३३

  • होरेब इथे यहोवाचा करार (१-५)

  • दहा आज्ञा पुन्हा सांगितल्या जातात (६-२२)

  • सीनाय पर्वताजवळ लोकांना भीती वाटली (२३-३३)

 मग मोशेने सर्व इस्राएली लोकांना एकत्र बोलावलं आणि तो त्यांना म्हणाला: “इस्राएली लोकांनो, आज मी तुमच्यापुढे जे नियम आणि न्याय-निर्णय घोषित करत आहे ते ऐका. ते तुम्ही शिकून घ्या आणि काळजीपूर्वक पाळा. २  होरेब इथे आपला देव यहोवा याने आपल्यासोबत एक करार केला होता.+ ३  यहोवाने हा करार आपल्या वाडवडिलांसोबत नाही, तर आपल्यासोबत, म्हणजे आज इथे जिवंत असलेल्या आपल्या सर्वांसोबत केला होता. ४  यहोवा त्या पर्वतावर तुमच्याशी आगीतून समोरासमोर बोलला होता.+ ५  पण तुम्हाला आगीची भीती वाटल्यामुळे तुम्ही पर्वतावर गेला नाहीत.+ त्यामुळे यहोवाचे शब्द तुम्हाला सांगण्यासाठी, मी यहोवाच्या आणि तुमच्या मध्ये उभा राहिलो.+ तेव्हा तो म्हणाला: ६  ‘मी तुमचा देव यहोवा आहे. मीच तुम्हाला इजिप्त देशातून, तुमच्या गुलामगिरीच्या घरातून बाहेर आणलं.+ ७  माझ्याशिवाय* तुम्हाला कधीच इतर कोणतेही देव नसावेत.+ ८  तुम्ही आपल्यासाठी कोरलेली मूर्ती बनवू नका.+ वर आकाशातल्या, खाली पृथ्वीवरच्या किंवा पृथ्वीच्या खाली असलेल्या जलाशयांमधल्या कशाचीही प्रतिमा आपल्यासाठी बनवू नका. ९  त्यांच्यासमोर वाकू नका किंवा त्यांची उपासना करू नका,+ कारण मी तुमचा देव यहोवा आहे आणि तुम्ही फक्‍त माझीच उपासना करावी अशी मी अपेक्षा करतो.+ जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना, मी तिसऱ्‍या आणि चौथ्या पिढीपर्यंत त्यांच्या वडिलांच्या अपराधाची शिक्षा देतो.+ १०  पण जे माझ्यावर प्रेम करतात आणि माझ्या आज्ञा पाळतात, त्यांच्या हजाराव्या पिढीलाही मी एकनिष्ठ प्रेम* दाखवतो. ११  तुम्ही आपला देव यहोवा याच्या नावाचा दुरुपयोग करू नका,+ कारण जो कोणी त्याच्या नावाचा दुरुपयोग करेल त्याला यहोवा शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही.+ १२  तुमचा देव यहोवा याने तुम्हाला आज्ञा दिल्याप्रमाणे, शब्बाथाचा दिवस पाळा आणि तो पवित्र माना.+ १३  सहा दिवस कष्ट करून तुमची सगळी कामं करा,+ १४  पण सातवा दिवस हा तुमचा देव यहोवा याच्यासाठी शब्बाथाचा दिवस आहे.+ त्या दिवशी तुम्ही कोणतंही काम करू नये.+ तसंच तुमच्या मुलाने, मुलीने, दासाने, दासीने, बैलाने, गाढवाने, तुमच्या कोणत्याही पाळीव प्राण्याने, तसंच तुमच्या शहरांमध्ये* राहणाऱ्‍या विदेश्‍यानेसुद्धा कोणतंही काम करू नये;+ म्हणजे तुमच्या दासाला आणि दासीलाही तुमच्यासारखीच विश्रांती घेता येईल.+ १५  तुम्ही इजिप्त देशात गुलाम होता आणि तुमचा देव यहोवा याने तुम्हाला तिथून आपल्या महान सामर्थ्याने बाहेर आणलं हे विसरू नका.+ म्हणूनच तुमचा देव यहोवा याने तुम्हाला शब्बाथाचा दिवस पाळण्याची आज्ञा दिली आहे. १६  तुमचा देव यहोवा याने तुम्हाला आज्ञा दिल्याप्रमाणे, आपल्या वडिलांचा आणि आईचा आदर करा,+ म्हणजे जो देश तुमचा देव यहोवा तुम्हाला देत आहे, त्यात तुम्ही बराच काळ जगाल आणि तिथे तुमची भरभराट होईल.*+ १७  खून करू नका.+ १८  व्यभिचार करू नका.+ १९  चोरी करू नका.+ २०  शेजाऱ्‍याविरुद्ध साक्ष देताना खोटी साक्ष देऊ नका.+ २१  आपल्या शेजाऱ्‍याच्या बायकोचा लोभ धरू नका.+ तसंच स्वार्थीपणे आपल्या शेजाऱ्‍याच्या घराचा किंवा शेताचा, त्याच्या दासाचा किंवा दासीचा, त्याच्या बैलाचा किंवा गाढवाचा, किंवा त्याच्या मालकीच्या कोणत्याही वस्तूचा लोभ धरू नका.’+ २२  या सर्व आज्ञा* यहोवाने पर्वतावर आगीतून, ढगातून, गडद अंधारातून,+ मोठ्या आवाजात तुमच्या सगळ्या मंडळीला सांगितल्या. तो आणखी काही बोलला नाही. मग त्याने त्या आज्ञा दोन दगडी पाट्यांवर लिहून मला दिल्या.+ २३  पण तो पर्वत जळत असताना, तुम्हाला अंधारातून आवाज ऐकू येताच,+ तुमच्या वंशांचे सर्व प्रमुख आणि वडील माझ्याकडे आले. २४  मग तुम्ही म्हणालात, ‘आमचा देव यहोवा याने आम्हाला त्याचं तेज आणि त्याचा महिमा दाखवला आहे. आम्ही त्याचा आवाज आगीतून ऐकला आहे.+ देव माणसाशी बोलूनही माणूस जिवंत राहू शकतो,+ हे आम्ही आज पाहिलंय. २५  ही मोठी आग आम्हाला भस्म करेल आणि आम्ही मरून जाऊ. आमचा देव यहोवा याचा आवाज आम्ही ऐकत राहिलो तर आम्ही नक्की मरून जाऊ. २६  कारण सर्व मानवांमध्ये असा कोण आहे, ज्याने आमच्यासारखं जिवंत देवाला आगीतून बोलताना ऐकलं आणि तरीही तो जिवंत राहिला? २७  आमचा देव यहोवा जे काही सांगेल, ते ऐकण्यासाठी तू त्याच्याजवळ जा आणि ज्या सर्व गोष्टी आमचा देव यहोवा तुला सांगेल, त्या तू आम्हाला सांग. आम्ही त्या ऐकू आणि तसं वागू.’+ २८  तेव्हा तुम्ही जे बोललात ते यहोवाने ऐकलं आणि यहोवा मला म्हणाला, ‘हे लोक तुझ्याशी जे बोलले ते मी ऐकलं आहे. त्यांचं म्हणणं योग्य आहे.+ २९  जर ते मनापासून माझं भय मानून+ माझ्या सर्व आज्ञा पाळत राहिले,+ तर त्यांचं आणि त्यांच्या मुलांचं नेहमी भलं होईल.+ ३०  जा आणि त्यांना सांग: “आपापल्या तंबूंमध्ये परत जा.” ३१  पण तू इथेच माझ्यासोबत थांब, म्हणजे मी तुला माझे सर्व नियम, न्याय-निर्णय आणि आज्ञा सांगीन. तू त्यांना त्या शिकव, म्हणजे ज्या देशाचा मी त्यांना ताबा देणार आहे, त्यात गेल्यावर ते लोक त्या सर्व पाळतील.’ ३२  तर आता तुमचा देव यहोवा याने आज्ञा दिल्याप्रमाणेच या सर्व गोष्टी करण्याची तुम्ही काळजी घ्या.+ उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका.+ ३३  तुम्ही सर्व बाबतींत तुमचा देव यहोवा याने दाखवलेल्या मार्गावर चाला,+ म्हणजे तुम्ही जिवंत राहाल; तुमची भरभराट होईल आणि ज्या देशाचा तुम्ही ताबा घ्याल, त्यात तुम्हाला भरपूर आयुष्य लाभेल.+

तळटीपा

किंवा “माझ्या विरोधात.” शब्दशः “माझ्या चेहऱ्‍यासमोर.”
किंवा “प्रेमदया.”
शब्दशः “फाटकांच्या आत.”
किंवा “तुमचं भलं होईल.”
शब्दशः “शब्द.”