अनुवाद २७:१-२६
२७ तेव्हा मोशे आणि इस्राएलचे वडीलजन यांनी लोकांना अशी आज्ञा दिली: “मी आज तुम्हाला देत असलेली प्रत्येक आज्ञा पाळा.
२ आणि ज्या दिवशी तुम्ही यार्देन पार करून तुमचा देव यहोवा तुम्हाला देत असलेल्या देशात जाल, त्या दिवशी तिथे मोठे दगड मांडा आणि त्यांना चुन्याचा लेप लावा.*+
३ मग पलीकडे गेल्यावर त्यांवर या नियमशास्त्राचे सर्व शब्द लिहा, म्हणजे तुमचा देव यहोवा तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही प्रवेश करू शकाल. तुमच्या वाडवडिलांचा देव यहोवा याने तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे, दूध आणि मध वाहत असलेला तो देश आहे.+
४ मी आज तुम्हाला आज्ञा दिल्याप्रमाणे, तुम्ही यार्देन पार केल्यावर एबाल पर्वतावर+ हे दगड मांडा आणि त्यांना चुन्याचा लेप लावा.*
५ तुम्ही तुमचा देव यहोवा याच्यासाठी दगडांची एक वेदीही बांधा. त्या दगडांवर लोखंडी हत्यारं वापरू नका.+
६ तुम्ही तुमचा देव यहोवा याची वेदी अखंड दगडांनी बांधा आणि तिच्यावर तुमचा देव यहोवा याच्यासाठी होमार्पणं अर्पण करा.
७ तुम्ही तिथे शांती-अर्पणं द्या+ व ती तिथेच खा+ आणि तुमचा देव यहोवा याच्यासमोर आनंद साजरा करा.+
८ आणि या नियमशास्त्रातले सर्व शब्द त्या दगडांवर स्पष्टपणे लिहा.”+
९ मग मोशे आणि लेवीय याजक, सर्व इस्राएली लोकांना म्हणाले: “इस्राएली लोकांनो, शांत राहा आणि ऐका. आज तुम्ही तुमचा देव यहोवा याचे लोक झाला आहात.+
१० तुमचा देव यहोवा याचं ऐका आणि मी आज तुम्हाला सांगत असलेल्या त्याच्या सर्व आज्ञा+ आणि नियम पाळा.”
११ त्या दिवशी मोशेने लोकांना अशी आज्ञा दिली:
१२ “तुम्ही यार्देन पार केल्यावर लोकांना आशीर्वाद देण्यासाठी गरिज्जीम पर्वतावर+ शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, योसेफ आणि बन्यामीन हे वंश उभे राहतील.
१३ आणि शाप घोषित करण्यासाठी एबाल पर्वतावर+ रऊबेन, गाद, आशेर, जबुलून, दान आणि नफताली हे वंश उभे राहतील.
१४ आणि लेवी सर्व इस्राएली लोकांना मोठ्या आवाजात असं म्हणतील:+
१५ ‘जो यहोवाला घृणा आणणारी+ आणि कारागिराच्या* हातांनी घडवल्यासारखी, कोरीव+ किंवा धातूची मूर्ती*+ तयार करतो आणि ती लपवतो तो शापित असो.’ (आणि सर्व लोक ‘आमेन’* म्हणतील.)
१६ ‘जो आपल्या वडिलांचा किंवा आईचा अनादर करतो तो शापित असो.’+ (आणि सर्व लोक ‘आमेन’ म्हणतील.)
१७ ‘जो आपल्या शेजाऱ्याच्या सीमेची खूण हलवतो तो शापित असो.’+ (आणि सर्व लोक ‘आमेन’ म्हणतील.)
१८ ‘जो आंधळ्या माणसाला वाट चुकायला लावतो तो शापित असो.’+ (आणि सर्व लोक ‘आमेन’ म्हणतील.)
१९ ‘जो विदेश्यावर, अनाथ मुलावर* आणि विधवेवर अन्याय करतो तो शापित असो.’+ (आणि सर्व लोक ‘आमेन’ म्हणतील.)
२० ‘जो आपल्या वडिलांच्या बायकोशी शरीरसंबंध ठेवून, आपल्या वडिलांचा अपमान करतो तो शापित असो.’+ (आणि सर्व लोक ‘आमेन’ म्हणतील.)
२१ ‘जो कोणत्याही प्राण्यासोबत संभोग करतो तो शापित असो.’+ (आणि सर्व लोक ‘आमेन’ म्हणतील.)
२२ ‘जो आपल्या बहिणीसोबत, म्हणजे आपल्या वडिलांच्या किंवा आईच्या मुलीसोबत शरीरसंबंध ठेवतो तो शापित असो.’+ (आणि सर्व लोक ‘आमेन’ म्हणतील.)
२३ ‘जो आपल्या सासूसोबत शरीरसंबंध ठेवतो तो शापित असो.’+ (आणि सर्व लोक ‘आमेन’ म्हणतील.)
२४ ‘जो आपल्या शेजाऱ्याला ठार मारण्यासाठी लपून बसतो तो शापित असो.’+ (आणि सर्व लोक ‘आमेन’ म्हणतील.)
२५ ‘जो निर्दोष माणसाला ठार मारण्यासाठी लाच घेतो तो शापित असो.’+ (आणि सर्व लोक ‘आमेन’ म्हणतील.)
२६ ‘जो या नियमशास्त्रातल्या गोष्टी मान्य करणार नाही आणि त्या पाळणार नाही तो शापित असो.’+ (आणि सर्व लोक ‘आमेन’ म्हणतील.)
तळटीपा
^ किंवा “त्यांची चुन्याने सफेती करा.”
^ किंवा “त्यांची चुन्याने सफेती करा.”
^ किंवा “असंच व्हावं.”
^ किंवा “ओतीव मूर्ती.”
^ किंवा “लाकडाचं आणि धातूचं काम करणाऱ्याच्या.”
^ किंवा “वडील नसलेल्या मुलावर.”