अनुवाद १८:१-२२
१८ लेवीय याजकांना, खरंतर लेवी वंशातल्या कोणालाही इस्राएली लोकांसोबत जमिनीचा वाटा किंवा वारसा मिळणार नाही. यहोवासाठी आगीत जाळून केलेली अर्पणं, जी त्याचा वारसा आहेत, त्यांतलं मांस ते खातील.+
२ म्हणूनच, त्यांना त्यांच्या भावांसोबत कोणताही वारसा मिळणार नाही. यहोवाने त्यांना सांगितल्याप्रमाणे, तोच त्यांचा वारसा आहे.
३ बैलाचं किंवा मेंढराचं अर्पण देताना लोकांनी याजकांना हक्काचा भाग म्हणून या गोष्टी द्याव्यात: खांद्याचा भाग, जबडे आणि पोटाचा भाग.*
४ तुमचं पहिलं पीक, नवीन द्राक्षारस आणि तेल, तसंच, तुमच्या मेंढरांची कातरलेली पहिली लोकर तुम्ही याजकांना द्या.+
५ तुमचा देव यहोवा याने तुमच्या सर्व वंशांपैकी, लेवीला आणि त्याच्या वंशजांना यहोवाच्या नावाने कायम सेवा करण्यासाठी निवडलं आहे.+
६ पण इस्राएलमधल्या एखाद्या शहरात राहणाऱ्या लेव्याला आपलं शहर सोडून,+ यहोवाने निवडलेल्या ठिकाणी* जायचं असेल,+
७ तर त्याने तिथे जाऊन, यहोवासमोर सेवा करत असलेल्या लेवी वंशातल्या आपल्या भावांप्रमाणे, आपला देव यहोवा याच्या नावाने सेवा करावी.+
८ आपल्या वाडवडिलांची मालमत्ता विकून त्याला जे काही मिळेल, त्यासोबतच, त्याला आपल्या भावांबरोबर अन्नातून समान वाटा मिळेल.+
९ तुमचा देव यहोवा तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाल, तेव्हा तिथल्या राष्ट्रांचे घृणास्पद रितीरिवाज शिकू नका.+
१० तुमच्यामध्ये कोणीही पुढील गोष्टी करणारा असू नये: आपल्या मुलामुलींचा आगीत होम करणारा,+ भविष्य सांगणारा,+ जादूटोणा करणारा,+ शकुन पाहणारा,+ चेटूक करणारा,+
११ वशीकरण करणारा, भूतविद्या करणारा,+ ज्योतिषी+ किंवा मांत्रिक.+
१२ कारण अशा गोष्टी करणाऱ्याची यहोवाला घृणा वाटते आणि अशा घृणास्पद रितीरिवाजांमुळेच तुमचा देव यहोवा त्या राष्ट्रांना तुमच्यासमोरून हाकलून लावणार आहे.
१३ तुम्ही आपला देव यहोवा याच्या नजरेत निर्दोष राहा.+
१४ कारण ज्या राष्ट्रांना तुम्ही हाकलून लावणार आहात, त्या राष्ट्रांचे लोक जादूटोणा करणाऱ्यांचं+ आणि भविष्य सांगणाऱ्यांचं+ ऐकायचे, पण तुमचा देव यहोवा याने तुम्हाला अशा गोष्टी करण्याची मनाई केली आहे.
१५ तुमचा देव यहोवा तुमच्या भावांमधून माझ्यासारखा एक संदेष्टा तुमच्यासाठी उभा करेल. तुम्ही त्याचं ऐका.+
१६ कारण इस्राएली लोकांच्या मंडळीला होरेबजवळ एकत्र करण्यात आलं,+ त्या दिवशी तुम्ही तुमचा देव यहोवा याला अशी विनंती केली होती, ‘आम्हाला आमचा देव यहोवा याचा आवाज ऐकायचा नाही किंवा ही मोठी आग पाहायची नाही, नाहीतर आम्ही मरून जाऊ.’+
१७ तेव्हा यहोवा मला म्हणाला होता, ‘त्यांचं म्हणणं योग्य आहे.
१८ मी त्यांच्या भावांमधून तुझ्यासारखा एक संदेष्टा त्यांच्यासाठी उभा करीन.+ मी माझे शब्द त्याच्या तोंडात टाकीन+ आणि तो माझ्या सर्व आज्ञा त्यांना सांगेल.+
१९ त्याने माझ्या नावाने सांगितलेल्या आज्ञा जो कोणी ऐकणार नाही, त्याच्याकडून मी याचा हिशोब घेईन.+
२० जर एखाद्या संदेष्ट्याने गर्विष्ठपणे वागून,* मी आज्ञा दिलेली नसताना माझ्या नावाने संदेश दिला, किंवा तो इतर देवांच्या नावाने बोलला, तर त्याला ठार मारलं जावं.+
२१ पण कदाचित तुमच्या मनात असा विचार येईल: “हा संदेश यहोवाने दिला नव्हता, हे आम्हाला कसं समजणार?”
२२ एखाद्या संदेष्ट्याने जर यहोवाच्या नावाने संदेश दिला आणि त्याने सांगितलेली गोष्ट पूर्ण झाली नाही किंवा खरी ठरली नाही, तर यहोवाने तो संदेश दिला नव्हता. तो संदेष्टा गर्विष्ठपणे* बोलला होता. तुम्ही त्याला घाबरू नका.’
तळटीपा
^ किंवा “कोथळ्याचा भाग.”
^ म्हणजे, यहोवाने आपल्या उपासनेचं केंद्र म्हणून निवडलेलं ठिकाण.
^ किंवा “मर्यादा सोडून.”
^ किंवा “मर्यादा सोडून.”