अनुवाद १३:१-१८
-
यहोवाला सोडून इतर देवांची उपासना करणाऱ्यांशी व्यवहार (१-१८)
१३ जर तुमच्यामध्ये एखादा संदेष्टा किंवा स्वप्न पाहून भविष्य सांगणारा उठला आणि त्याने तुम्हाला एखाद्या चिन्हाबद्दल किंवा चमत्काराबद्दल सांगितलं,
२ आणि त्याने सांगितलेलं चिन्ह किंवा चमत्कार खरोखर घडला, आणि जर तो म्हणाला, की ‘चला, आपण तुम्हाला ओळख नसलेल्या इतर देवांच्या मागे जाऊ आणि त्यांची उपासना करू,’
३ तर तुम्ही त्या संदेष्ट्याचं किंवा स्वप्न पाहणाऱ्याचं ऐकू नका.+ कारण, तुम्ही तुमचा देव यहोवा याच्यावर पूर्ण मनाने आणि पूर्ण जिवाने* प्रेम करता की नाही,+ हे पाहण्यासाठी तुमचा देव यहोवा तुमची परीक्षा घेत आहे.+
४ तुम्ही फक्त आपला देव यहोवा याच्यामागे चाला, त्याचंच भय माना, त्याच्या आज्ञा पाळा आणि त्याचं ऐका; तुम्ही त्याचीच सेवा करा आणि त्याला धरून राहा.+
५ पण त्या संदेष्ट्याला किंवा स्वप्न पाहणाऱ्याला ठार मारा,+ कारण त्याने लोकांना तुमचा देव यहोवा, ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणलं आणि तुमच्या गुलामगिरीच्या घरातून सोडवलं, त्याच्याविरुद्ध बंड करायला लावलं. तुमचा देव यहोवा याने ज्या मार्गाने चालण्याची आज्ञा दिली आहे, त्यापासून त्याने तुम्हाला बहकवलं आहे. म्हणून, तुम्ही आपल्यामधून अशा दुष्ट लोकांना काढून टाका.+
६ कदाचित तुझा भाऊ म्हणजे तुझ्या आईचा मुलगा, किंवा तुझा मुलगा वा मुलगी, तुझी प्रिय बायको किंवा सगळ्यात जवळचा मित्र* तुला एकटं गाठून फसवण्याचा प्रयत्न करेल आणि म्हणेल, ‘चल, आपण इतर देवांची उपासना करू,’+ ज्यांची तुला किंवा तुझ्या वाडवडिलांना ओळख नाही,
७ मग हे तुमच्या आजूबाजूच्या राष्ट्रांचे देव असोत, तुमच्या जवळच्या किंवा लांबच्या कोणत्याही राष्ट्राचे देव असोत, किंवा देशाच्या कानाकोपऱ्यांतले कोणतेही देव असोत;
८ तू त्याच्या बोलण्याला बळी पडू नकोस किंवा त्याचं ऐकू नकोस;+ तसंच, त्याला दयामाया दाखवू नकोस किंवा त्याला वाचवण्याचा प्रयत्नही करू नकोस;
९ त्याऐवजी, त्याला कोणत्याही परिस्थितीत ठार मारलं जावं.+ त्याला ठार मारण्यासाठी सगळ्यात आधी तुझाच हात वर आला पाहिजे आणि त्यानंतर इतर सर्व लोकांचा.+
१० आणि तू त्याला दगडमार करून ठार मार,+ कारण तुझा देव यहोवा, ज्याने तुला इजिप्त देशातून, म्हणजे गुलामगिरीच्या घरातून बाहेर आणलं, त्याच्याविरुद्ध जायला त्याने तुला बहकवण्याचा प्रयत्न केला आहे.
११ मग इस्राएलचे सर्व लोक हे ऐकतील आणि त्यांना भीती वाटेल आणि ते पुन्हा कधी अशा प्रकारची कोणतीही वाईट गोष्ट तुमच्यामध्ये करणार नाही.+
१२ तुमचा देव यहोवा तुम्हाला जी शहरं राहण्यासाठी देत आहे, त्यांपैकी एखाद्या शहरात जर तुम्ही कोणाला असं म्हणताना ऐकलं,
१३ ‘तुमच्यातून काही रिकामटेकडी माणसं निघाली आहेत आणि तुम्हाला ओळख नसलेल्या देवांबद्दल ती आपल्या शहराच्या लोकांना असं म्हणून बहकवत आहेत, “चला आपण जाऊन इतर देवांची उपासना करू.”’
१४ तर, तुम्ही या गोष्टीत लक्ष घाला आणि याबद्दल कसून तपासणी आणि चौकशी करा;+ आणि जर ही घृणास्पद गोष्ट तुमच्यात घडल्याची बातमी खरी निघाली,
१५ तर तुम्ही त्या शहराच्या रहिवाशांना कोणत्याही परिस्थितीत तलवारीने ठार मारा.+ ते शहर आणि त्यात जे काही आहे, म्हणजे त्यातल्या गुराढोरांचाही तुम्ही तलवारीने नाश करा.+
१६ मग तुम्ही त्या शहरातून लुटलेल्या सगळ्या वस्तू शहराच्या चौकात जमा करा आणि ते शहर जाळून टाका. ही लूट तुमचा देव यहोवा याच्यासाठी आगीत पूर्णपणे जाळून केलेल्या अर्पणासारखी असेल. त्या शहराची ढिगारं कायम तशीच पडून राहतील. ते पुन्हा कधीच बांधलं जाऊ नये.
१७ नाशासाठी वेगळ्या केलेल्या वस्तूंपैकी तुम्ही काहीही घेऊ नका,+ म्हणजे यहोवाचा भडकलेला क्रोध शांत होईल; आणि तो तुम्हाला दया आणि करुणा दाखवेल आणि त्याने तुमच्या वाडवडिलांना वचन दिल्याप्रमाणे तो तुम्हाला फलदायी करेल.+
१८ तुमचा देव यहोवा याच्या ज्या आज्ञा मी तुम्हाला आज सांगत आहे, त्या सर्व आज्ञा तुम्ही पाळा आणि अशा प्रकारे तुमचा देव यहोवा याच्या नजरेत जे योग्य ते करा.+