अनुवाद ११:१-३२
११ तुम्ही आपला देव यहोवा याच्यावर प्रेम करा+ आणि त्याच्याबद्दल असलेलं आपलं कर्तव्य नेहमी पूर्ण करा. तसंच त्याचे कायदे, न्याय-निर्णय आणि त्याच्या आज्ञा नेहमी पाळा.
२ आज मी तुमच्या मुलांशी नाही, तर तुमच्याशी बोलत आहे. कारण तुमच्या मुलांनी तुमचा देव यहोवा याने लावलेली शिस्त,+ त्याचा महिमा+ आणि त्याचं महान सामर्थ्य+ पाहिलेलं नाही आणि त्यांना त्याबद्दल माहीत नाही.
३ इजिप्त देशात अनेक चिन्हं आणि पराक्रम दाखवून, त्याने तिथला राजा फारो याच्यासोबत आणि त्याच्या संपूर्ण देशासोबत काय केलं,+ हे तुमच्या मुलांनी पाहिलेलं नाही.
४ तसंच इजिप्तचं सैन्य, फारोचे घोडे आणि त्याचे युद्धाचे रथ तुमचा पाठलाग करत होते, तेव्हा ते तांबड्या समुद्राच्या पाण्यात कसे बुडाले; आणि यहोवाने कसा त्यांचा कायमचा नाश केला,+ हेही त्यांनी पाहिलेलं नाही.
५ तुम्ही इथे पोहोचेपर्यंत देवाने ओसाड रानात तुमच्यासाठी कायकाय केलं, हे त्यांनी पाहिलेलं नाही.
६ किंवा त्याने रऊबेनचा मुलगा अलीयाब याची मुलं दाथान आणि अबीराम यांच्यासोबत काय केलं; आणि सर्व इस्राएली लोकांसमोर पृथ्वीने आपलं तोंड उघडून त्यांना व त्यांच्या घराण्यांना, तसंच त्यांचे तंबू, त्यांच्यामागे जाणारे सर्व लोक आणि प्राणी यांना कसं गिळून टाकलं, हेसुद्धा त्यांनी पाहिलेलं नाही.+
७ पण तुम्ही मात्र यहोवाने केलेले हे सर्व पराक्रम आपल्या डोळ्यांनी पाहिले आहेत.
८ आज मी तुम्हाला देत असलेल्या सर्व आज्ञा तुम्ही पाळा, म्हणजे तुम्ही शक्तिशाली व्हाल आणि पलीकडे जाऊन त्या देशाचा ताबा घ्याल,
९ तसंच, दूध आणि मध वाहत असलेला जो देश+ तुमच्या वाडवडिलांना आणि त्यांच्या संततीला* देण्याचं यहोवाने वचन दिलं होतं,+ त्या देशात तुम्हाला मोठं आयुष्य लाभेल.+
१० ज्या देशाचा तुम्ही ताबा घेणार आहात तो देश, तुम्ही जिथून आलात त्या इजिप्तसारखा नाही. तिथे तुम्ही बी पेरत होता आणि जसं भाज्यांच्या मळ्यांना पाणी देतात, तसं खूप कष्टाने त्याला पाणी देत होता.*
११ पण ज्या देशात जाऊन तुम्ही त्याचा ताबा घेणार आहात, तो पर्वतांचा आणि दऱ्याखोऱ्यांचा देश आहे.+ तो आकाशातून पडणाऱ्या पावसाचं पाणी पितो.+
१२ तुमचा देव यहोवा स्वतः त्या देशाची काळजी घेतो. वर्षाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत, तुमचा देव यहोवा याचे डोळे सतत त्या देशाकडे लागलेले असतात.
१३ आज मी तुम्हाला देत असलेल्या आज्ञा, जर तुम्ही मनापासून पाळल्या आणि तुमचा देव यहोवा याच्यावर प्रेम केलं आणि पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने* त्याची सेवा केली,+
१४ तर तो* योग्य वेळी तुमच्या देशात, पानझडी आणि वसंत ऋतूचा पाऊस पाडेल आणि तुम्ही आपलं धान्य, नवीन द्राक्षारस आणि तेल गोळा कराल.+
१५ तो* तुमच्या गुराढोरांसाठी जमिनीतून भरपूर गवत उगवायला लावेल. तुम्हीही अन्न खाऊन तृप्त व्हाल.+
१६ पण सावध राहा, नाहीतर तुमचं हृदय तुम्हाला फसवेल आणि तुम्ही भरकटाल आणि इतर देवांपुढे वाकून त्यांची उपासना करू लागाल.+
१७ असं झालं, तर यहोवाचा क्रोध तुमच्यावर भडकेल आणि तो आकाशाची दारं बंद करेल. यामुळे पाऊस पडणार नाही,+ जमीन उपज देणार नाही आणि जो चांगला देश यहोवा तुम्हाला देत आहे, त्यातून काही काळातच तुमचा नाश होईल.+
१८ तुम्ही माझे हे शब्द आपल्या हृदयावर आणि मनावर कोरून ठेवा. तुम्हाला त्यांची आठवण राहावी म्हणून ते आपल्या हातावर बांधा आणि ते तुमच्या डोक्यावर* कपाळपट्टीसारखे असावेत.+
१९ आपल्या मुलांना ते शिकवा आणि घरात बसलेले असताना, रस्त्याने चालताना, झोपताना आणि उठताना त्यांबद्दल बोलत जा.+
२० आपल्या घराच्या चौकटींवर आणि फाटकांवर ते लिहून ठेवा;
२१ म्हणजे जो देश तुमच्या वाडवडिलांना देण्याचं वचन यहोवाने दिलं होतं,+ त्या देशात तुम्हाला आणि तुमच्या मुलांना मोठं आयुष्य लाभेल+ आणि जोपर्यंत पृथ्वीवर आकाश पसरलं आहे, तोपर्यंत तुम्ही तिथे राहाल.
२२ आज मी तुम्हाला देत असलेल्या आज्ञा जर तुम्ही काटेकोरपणे पाळल्या, म्हणजेच तुमचा देव यहोवा याच्यावर प्रेम करून+ त्याच्या सर्व मार्गांवर चाललात आणि त्याला धरून राहिलात,+
२३ तर यहोवा या सर्व राष्ट्रांना तुमच्यासमोरून हाकलून लावेल+ आणि तुम्ही तुमच्यापेक्षा मोठ्या* आणि शक्तिशाली राष्ट्रांचा ताबा घ्याल.+
२४ तुम्ही जिथे पाऊल ठेवाल, तिथली जमीन तुमची होईल.+ तुमची सीमा ओसाड रानापासून लबानोनपर्यंत आणि फरात नदीपासून पश्चिमेकडच्या समुद्रापर्यंत* असेल.+
२५ कोणीही तुमचा सामना करू शकणार नाही.+ तुमचा देव यहोवा याने तुम्हाला वचन दिल्याप्रमाणे, या संपूर्ण देशात तुम्ही जिथेजिथे जाल, तिथेतिथे तो तुमची दहशत आणि भीती पसरवेल.+
२६ पाहा, आज मी तुमच्यापुढे एक आशीर्वाद आणि एक शाप ठेवत आहे.+
२७ तुमचा देव यहोवा याच्या ज्या आज्ञा मी तुम्हाला आज सांगत आहे, त्या तुम्ही पाळल्या तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल.+
२८ पण, जर तुम्ही तुमचा देव यहोवा याच्या आज्ञा पाळल्या नाहीत आणि आज मी सांगत असलेल्या मार्गावरून भरकटून, तुम्हाला ज्यांची ओळख नाही अशा देवांच्या मागे लागलात, तर तुम्हाला शाप मिळेल.+
२९ ज्या देशाचा तुम्ही ताबा घेणार आहात, त्या देशात जेव्हा तुमचा देव यहोवा तुम्हाला नेईल, तेव्हा तुम्ही गरिज्जीम पर्वतावरून आशीर्वाद, तर एबाल पर्वतावरून शाप घोषित करा.*+
३० हे पर्वत यार्देनच्या पलीकडे पश्चिमेला,* अराबात राहणाऱ्या कनानी लोकांच्या देशात, गिलगालच्या समोर, मोरेच्या मोठ्या झाडांजवळ आहेत.+
३१ तुमचा देव यहोवा तुम्हाला जो देश देणार आहे, त्याचा ताबा घेण्यासाठी आता तुम्ही यार्देन ओलांडून जात आहात.+ जेव्हा तुम्ही त्याचा ताबा घेऊन तिथे राहू लागाल,
३२ तेव्हा जे नियम आणि न्याय-निर्णय आज मी तुम्हाला सांगत आहे, ते सर्व तुम्ही काळजीपूर्वक पाळा.+
तळटीपा
^ शब्दशः “बिजाला.”
^ किंवा “पायाने सिंचन करत होता.” म्हणजे, पाणचक्की चालवण्यासाठी किंवा पाण्याचे कालवे बनवण्यासाठी किंवा उघडण्यासाठी पायांचा वापर करून.
^ शब्दार्थसूची पाहा.
^ शब्दशः “मी.” हे देवाला सूचित करतं.
^ शब्दशः “मी.” हे देवाला सूचित करतं.
^ शब्दशः “तुमच्या डोळ्यांच्या मधोमध.”
^ किंवा “जास्त लोकसंख्या असलेल्या.”
^ म्हणजे, महासागर, भूमध्य समुद्र.
^ किंवा “द्या.”
^ किंवा “सूर्यास्ताच्या दिशेला.”