बायबलने बदललं जीवन
“मी जग बदलायला निघालो होतो”
जन्म: १९६६
देश: फिनलंड
पार्श्वभूमी: सामाजिक कार्यकर्ता
माझं आधीचं जीवन
लहानपणापासूनच माझं निसर्गावर प्रेम होतं. मी मध्य फिनलंडच्या युवासक्युला शहरात लहानाचा मोठा झालो. आमच्या घराच्या जवळपास सुंदर जंगलं आणि तलाव होते. आणि आम्ही कुटुंब मिळून बऱ्याचदा तिथे फिरायला जायचो. मला प्राणीही खूप आवडतात. मी लहान होतो, तेव्हा मला कुठेही कुत्रा किंवा मांजर दिसलं, की लगेच मला त्याला जवळ घ्यावंसं वाटायचं. मी मोठा झालो, तेव्हा लोक प्राण्यांशी किती क्रूरपणे वागतात हे पाहून मला वाईट वाटायचं. पुढे मी प्राण्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या एका संघटनेचा सदस्य बनलो. तिथे माझ्यासारखाच विचार करणारे लोक मला भेटले.
प्राण्यांच्या हक्कांसाठी आम्ही बऱ्याच मोहिमा राबवायचो. आम्ही प्राण्यांच्या कातडीपासून बनलेल्या वस्तू विकणाऱ्या दुकानांच्या आणि प्राण्यांवर चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळांच्या विरोधात होतो. आणि याबद्दल लोकांना जागृत करण्यासाठी आम्ही पत्रिका वाटायचो आणि मोर्चे काढायचो. प्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही एक नवीन संस्थाही काढली. प्राण्यांवर होणाऱ्या अन्यायाचा आम्ही जोरदारपणे विरोध करत असल्यामुळे, आम्ही बऱ्याचदा अधिकाऱ्यांच्या नजरेत यायचो. मला भरपूर वेळा अटक झाली आणि कोर्टात नेण्यात आलं.
मला फक्त प्राण्यांबद्दलच नाही, तर जगातल्या इतर समस्यांबद्दलही चिंता वाटायची. त्यामुळे, मी बऱ्याच संस्थांसोबत काम करू लागलो, जसं की ॲमनेस्टी इंटरनॅशनल आणि ग्रीनपीस. या संस्थांच्या कामात मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. समाजातल्या गोरगरीब आणि गरजू लोकांसाठीही मी काम करायचो.
पण हळूहळू, मला जाणवू लागलं की मी जगाला बदलू शकत नाही. कारण या संस्थांनी जरी समाजात छोटेमोठे बदल केले असले, तरी मोठमोठ्या समस्या आणखीनच बिघडत चालल्या होत्या. कधीकधी असं वाटायचं, की दुष्ट शक्तींनी पूर्ण जगाला संकटांच्या खाईत लोटलंय, आणि कोणालाच कसलीच पर्वा नाही. अगदी हतबल झाल्यासारखं वाटायचं!
बायबलने जीवन कसं बदललं?
या सगळ्या गोष्टींबद्दल मी काहीच करू शकत नाही याचं मला खूप दुःख व्हायचं. आणि म्हणून मी देवाबद्दल आणि बायबलबद्दल विचार करू लागलो. मी आधी यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास केला होता. साक्षीदार खूप चांगले लोक होते आणि त्यांनी माझ्याबद्दल आपुलकी दाखवली होती. हे सगळं मला खूप आवडायचं. पण त्या वेळी मी माझ्या जीवनात बदल करायला तयार नव्हतो. आता मात्र परिस्थिती बदलली होती.
मी बायबल वाचायला सुरुवात केली. यामुळे मला खूप दिलासा मिळाला. बायबल वाचताना मला असे बरेच अहवाल सापडले, ज्यांमध्ये लिहिलं होतं, की आपण प्राण्यांवर प्रेम केलं पाहिजे. जसं की, नीतिसूत्रे १२:१० मध्ये म्हटलंय, “चांगला माणूस आपल्या प्राण्यांची काळजी घेतो.” (ईझी-टू-रीड व्हर्शन) तसंच, बायबलमधून मला कळलं की जगातल्या समस्यांसाठी देव जबाबदार नाही. उलट, लोक स्वतःच या समस्यांसाठी जबाबदार आहेत, कारण ते देवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालत नाहीत. यहोवा किती प्रेमळ आणि सहनशील आहे हे समजल्यावर माझं मन भरून आलं.—स्तोत्र १०३:८-१४.
याच दरम्यान, मला बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाचं कूपन मिळालं आणि मी ते भरून पाठवलं. लवकरच एक साक्षीदार जोडपं माझ्या घरी आलं आणि त्यांनी माझा बायबल अभ्यास सुरू केला. तसंच, मी राज्य सभागृहात सभांनाही जाऊ लागलो. यामुळे, हळूहळू बायबलचं सत्य माझ्या मनात रुजू लागलं.
बायबलमुळे माझं जीवन खूप बदललं. मी सिगरेटचं आणि दारूचं व्यसन सोडलं, नीटनेटके कपडे घालू लागलो आणि व्यवस्थित राहू लागलो. तसंच मी शिवीगाळ करणंही सोडून दिलं. बायबलमधून मी हेही शिकलो की मी सरकारी अधिकाऱ्यांचा आणि कायद्यांचा आदर केला पाहिजे. (रोमकर १३:१) पूर्वी मी खूप अनैतिक जीवन जगत होतो. पण बायबलचा अभ्यास केल्यावर मी त्या सगळ्या वाईट गोष्टी सोडून दिल्या.
एक बदल करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. तो म्हणजे, ज्या सामाजिक संस्थांसाठी मी काम करत होतो, त्यांच्याबद्दल माझा दृष्टिकोन बदलणं. हा दृष्टिकोन बदलायला मला बराच काळ लागला. सुरुवातीला मला वाटलं की मी या संस्थांना राजीनामा दिला तर ते विश्वासघात केल्यासारखं होईल. पण नंतर मला जाणीव झाली की देवाचं राज्यच जगातल्या सगळ्या समस्या काढून टाकू शकतं. म्हणून मी ठरवलं, की यापुढे मी माझी शक्ती देवाच्या राज्यासाठी आणि त्याबद्दल लोकांना शिकवण्यासाठी खर्च करीन.—मत्तय ६:३३.
मला झालेला फायदा
मी एक सामाजिक कार्यकर्ता होतो, तेव्हा मला वाटायचं की या जगात फक्त दोन प्रकारचे लोक आहेत. एकतर चांगले किंवा वाईट. आणि जे लोक वाईट आहेत असं मला वाटायचं, त्यांचा विरोध करायला मी मागेपुढे पाहत नव्हतो. पण बायबलचं ज्ञान घेतल्यामुळे आता मला कोणाचाही तिरस्कार वाटत नाही. उलट, येशूने शिकवलं होतं त्याप्रमाणे मी सगळ्या लोकांशी प्रेमाने वागायचा प्रयत्न करतो. (मत्तय ५:४४) या प्रेमामुळेच, मी लोकांना देवाच्या राज्याचा आनंदाचा संदेश सांगतो. या कार्यामुळे लोकांना शांती, आनंद आणि खरी आशा मिळते. हे पाहून मला खूप आनंद होतो.
सगळ्या गोष्टी यहोवावर सोडून दिल्यामुळे मला मनाची शांती मिळाली आहे. मला याची पूर्ण खातरी आहे की आपला प्रेमळ निर्माणकर्ता यहोवा, प्राण्यांवर आणि मानवांवर कायम अन्याय होऊ देणार नाही. तसंच, तो या सुंदर पृथ्वीची नासधूस होऊ देणार नाही. उलट, आजपर्यंत झालेलं नुकसान तो त्याच्या राज्याद्वारे भरून काढेल. (यशया ११:१-९) या गोष्टी समजल्यामुळे मला स्वतःला तर आनंद होतोच, पण यांबद्दल इतरांना सांगतानाही मला आनंद होतो. एकेकाळी मी जग बदलायला निघालो होतो, पण आता माझा दृष्टिकोन बदललाय.