शब्बाथ दिवशी काय करणे नियमानुसार आहे?
अध्याय ३२
शब्बाथ दिवशी काय करणे नियमानुसार आहे?
दुसऱ्या एका शब्बाथ दिवशी येशू, गालील समुद्राजवळच्या एका सभास्थानाला भेट देतो. उजवा हात वाळलेला एक माणूस तेथे उपस्थित आहे. येशू या माणसाला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी शास्त्री व परुशी टपले आहेत. शेवटी ते विचारतातः “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे का?”
यहुदी धार्मिक पुढाऱ्यांचे मत आहे की, जीवन धोक्यात असेल तरच शब्बाथ दिवशी बरे करणे कायदेशीर ठरते. उदाहरणार्थ, मोडलेले हाड जुळवणे वा मुरगळलेल्या भागास पट्टी बांधणे शब्बाथ दिवशी नियमबाह्य आहे. यावरुन, येशूवर आरोप करता यावा म्हणून शास्त्री व परुशी येशूला प्रश्न विचारत आहेत.
परंतु येशूला त्यांचे विचार कळतात. तसेच काम न करण्याच्या शब्बाथाच्या नियमात काय मोडत नाही याबद्दल त्यांनी अतिरेकी व अशास्त्रीय दृष्टीकोण बाळगला असल्याचेही त्याच्या लक्षात येते. तेव्हा, त्या वाळलेल्या माणसाला, “उठ, मध्ये उभा राहा,” असे सांगून येशू एका नाट्यमय घटनेची पार्श्वभूमि तयार करतो.
आता शास्त्री व परुशांकडे वळून येशू म्हणतोः “तुम्हामध्ये असा कोण आहे की, ज्याचे एकच मेंढरु असून ते शब्बाथ दिवशी खाचेत पडले तर तो त्याला उचलून बाहेर काढणार नाही?” मेंढरु ही एक आर्थिक गुंतवणूक असल्यामुळे ते त्याला दुसऱ्या दिवसापर्यंत खड्यात राहू देणार नाहीत; न जाणो, ते आजारी पडून त्यांचे नुकसान व्हायचे. याशिवाय शास्त्रवचने म्हणतातः “धार्मिक मनुष्य आपल्या पशूच्या जिवाकडे लक्ष देतो.”
या उदाहरणाची समांतरता घेत येशू पुढे म्हणतोः “तर मेंढरांपेक्षा माणसाचे मोल किती मोठे आहे! यास्तव शब्बाथ दिवशी सत्कृत्य करणे योग्य आहे.” अशी तर्कशुद्ध व सहानुभूतियुक्त विचारधारा त्या धार्मिक पुढाऱ्यांना खोडता येत नाही व ते गप्प बसतात.
संतापाने तसेच त्यांच्या हेकट मूर्खपणाने खिन्न होऊन येशू सभोवार दृष्टी टाकतो. मग, तो त्या माणसाला म्हणतोः “तुझा हात लांब कर.” तेव्हा तो आपला हात लांब करतो व तो हात बरा झालेला दिसून येतो.
त्या माणसाचा हात बरा झालेला पाहून आनंदी होण्याऐवजी परुशी बाहेर जाऊन येशूचा घात करण्यासाठी लागलीच हेरोदाच्या अनुयायांशी मसलत करतात. या राजकीय पक्षात सदूकी पंथाचे सदस्य असल्याचे स्पष्ट दिसते. सामान्यतः हा राजकीय पक्ष व परुशी यांच्यात उघड विरोध आहे. परंतु येशूला विरोध करण्यात मात्र त्यांचे खंबीर एकमत आहे. मत्तय १२:९-१४; मार्क ३:१-६; लूक ६:६-११; नीतीसूत्रे १२:१०; निर्गम २०:८-१०.
▪ येशू व यहुदी धार्मिक पुढारी यांच्यामधील एका नाट्यमय घटनेची पार्श्वभूमि काय आहे?
▪ शब्बाथ दिवशी बरे करण्याबद्दल यहूदी धार्मिक पुढाऱ्यांची धारणा काय आहे?
▪ येशू त्यांची चुकीची मते खोडून टाकण्यासाठी कोणते उदाहरण वापरतो?