भूतग्रस्त मुलगा बरा होतो
अध्याय ६१
भूतग्रस्त मुलगा बरा होतो
येशू, पेत्र, याकोब व योहान हे बहुधा हर्मोन पर्वताच्या एखाद्या शिखरावर असावेत. आता बाकीचे शिष्य अडचणीत सापडतात. येशूला परत आल्याबरोबर काहीतरी बिनसले असल्याचे तात्काळ ध्यानात येते. त्याच्या शिष्यांसभोवती जमाव गोळा झाला असून शास्त्री त्यांच्याशी वाद घालत आहेत. येशूला पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटते व ते त्याच्या स्वागतासाठी त्याच्याकडे धावतात. येशू विचारतोः “ह्यांच्याशी तुमचा कसला वादविवाद चालला आहे?”
तेव्हा जमावातून पुढे येऊन एक माणूस येशूपुढे गुडघे टेकतो व खुलासा करतोः “गुरुजी, मी माझ्या मुलाला आपणाकडे घेऊन आलो आहे. ह्याला मुका आत्मा लागला आहे. तो जेथे जेथे ह्याला धरतो तेथे तेथे तो त्याला खाली आपटतो. मग हा तोंडाला फेस आणून कडाकडा दात खातो व निपचित पडतो. त्याला काढावे म्हणून आपल्या शिष्यांना मी सांगितले. परंतु त्यांना तो काढता येईना.”
त्या मुलाला बरे करण्यात शिष्यांना आलेल्या अपयशाचा, शास्त्री पुरेपूर फायदा करून घेत असावेत असे दिसते. ते कदाचित शिष्यांच्या प्रयत्नांची टर उडवत असावेत. आणि अगदी मोक्याच्या क्षणी येशू तेथे येतो. तो म्हणतोः “हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्या बरोबर असणार? कोठवर तुम्हाला वागवून घेणार?”
हे उद्गार, येशूने, तेथे उपस्थित असलेल्या सर्वांना उद्देशून काढल्यासारखे दिसतात. परंतु त्याच्या शिष्यांना त्रास देत असलेल्या शास्त्र्यांना ते विशेषतः उद्देशून असावेत यात शंका नाही. नंतर येशू मुलाबद्दल म्हणतोः “त्याला माझ्याकडे आणा.” परंतु तो मुलगा येशूकडे येऊ लागताच त्याचा ताबा घेतलेले भूत त्याला जमिनीवर आपटते व अनावर आचके आणते. तो मुलगा जमिनीवर लोळतो व त्याच्या तोंडाला फेस येतो.
येशू विचारतोः “ह्याला असे होऊन किती काळ लोटला?”
“बाळपणापासून.” पिता उत्तर देतो. “ह्याचा नाश करावा म्हणून [भूताने] ह्याला पुष्कळदा विस्तवात व पाण्यात टाकले.” मग तो विनंती करतोः “आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हाला साहाय्य करा.”
त्या मुलाचा पिता कदाचित अनेक वर्षे मदतीच्या शोधात आहे. आणि आता येशूच्या शिष्यांच्या अपयशाने त्याची निराशा वाढली आहे. त्याच्या कळकळीच्या विनवणीचा सूर धरून येशू धीर देत म्हणतोः “‘शक्य असेल तर’! असे का म्हणतोस? विश्वास बाळगणाऱ्याला सर्वकाही शक्य आहे.”
लागलीच मुलाचा पिता मोठ्याने म्हणतोः “माझा विश्वास आहे.” पण तो विनंतीही करतोः “माझ्या अविश्वासाविषयी आपण साहाय्य करा.”
लोक त्यांच्याकडे धावत येत असलेले पाहून येशू भूताला दटावतोः “अरे, मुक्या-बहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो, ह्याच्यातून नीघ व पुन्हा कधी ह्याच्यात शिरू नको.” जाताजाता ते भूत त्या मूलाला ओरडायला लावून फार आचके आणवते. मग तो मुलगा जमिनीवर निचेष्ट पडतो. त्यामुळे अनेक लोक म्हणू लागतात: “तो मेला आहे.” पण येशू त्याचा हात धरतो व तो उठतो.
मागे, शिष्यांना प्रचारासाठी पाठवले असताना त्यांनी अशुद्ध आत्मे काढले होते. त्यामुळे ते आता एका घरात शिरल्यावर ते खाजगीमध्ये येशूला विचारतातः “आम्हाला तो का काढता आला नाही?”
हे त्यांच्या अविश्वासामुळे झाल्याचे सूचित करताना येशू म्हणतोः “ही जात प्रार्थनेवाचून दुसऱ्या कशानेही निघणारी नाही.” या बाबतीतले हे विशेष प्रबळ भूत काढण्यासाठी पूर्वतयारीची गरज असल्याचे उघड आहे. येथे, दृढ विश्वास व देवाची शक्तीदायक मदत यांची गरज होती.
मग, येशू पुढे म्हणतोः “मी तुम्हास खचित सांगतो की, जर तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला ‘इकडून तिकडे सरक,’ असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही.” विश्वासात किती शक्ती असू शकते!
यहोवाच्या सेवेतील प्रगतिमधील अडथळे व अडचणी एखाद्या खऱ्या पर्वताप्रमाणे दुर्गम व अनिवार्य असल्यासारखे दिसतील. तरीही, आपण आपल्या हृदयात विश्वास जोपासला, तो वाढण्यासाठी त्याला खत-पाणी घातले व उत्तेजन दिले तर तो पूर्णतेपर्यंत वाढेल व पर्वतप्राय अडथळे व अडचणींवर मात करण्यास आपली मदत करील असे येशू दाखवत आहे. मार्क ९:१४-२९; मत्तय १७:१९, २०; लूक ९:३७-४३.
▪ हर्मोन पर्वतावरुन परतल्यावर येशूला कोणती परिस्थिती दिसून येते?
▪ भूतग्रस्त मुलाच्या पित्याला येशू कसा धीर देतो?
▪ शिष्यांना ते भूत का काढता आले नाही?
▪ विश्वास किती शक्तीशाली असू शकतो असे येशू दाखवतो?