पुनरुत्थानाची आशा
अध्याय ९०
पुनरुत्थानाची आशा
यरुशलेमात अंदाजे तीन किलोमीटर्स अंतरावर बेथानी गावापाशी शेवटी येशू येतो. लाजराचा मृत्यु व दफन यानंतर थोडेच दिवस लोटले आहेत. मरीया व मार्था या त्याच्या बहिणी अजून शोक करीत आहेत व त्यांचे सांत्वन करण्यासाठी अनेक जण त्यांच्या घरी आले आहेत.
ते शोक करीत असताना, येशू येत असल्याचे कोणीतरी मार्थाला सांगते. तेव्हा ती आपल्या बहिणीला न सांगता, त्याला भेटण्यासाठी घाईने जाते असे दिसते. येशूकडे आल्यावर, गेल्या चार दिवसात तिने व तिच्या बहिणीने अनेकदा जे म्हटले असेल त्याचा ती पुनरुच्चार करतेः “आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.”
तथापि, आपल्या भावासाठी येशू अजूनही काही करील असे सुचवत, मार्था आशा व्यक्त करते. ती म्हणतेः “जे काही आपण देवाजवळ मागाल ते देव आपल्याला देईल, हे मला ठाऊक आहे.”
येशू वचन देतोः “तुझा भाऊ पुन्हा उठेल.”
मार्थेचा असा समज होतो की, अब्राहाम व देवाचे इतर सेवकही ज्याची आशा बाळगून होते त्या भावी पार्थिव पुनरुत्थानाबद्दल येशू बोलत आहे. त्यामुळेच ती म्हणतेः “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे.”
परंतु, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे,” असे येशू म्हणतो व तात्काळ मिळणाऱ्या दिलाशाची आशा देतो. “जो माझ्यावर विश्वास ठेवतो, तो मेला असला तरी जगेल, आणि जिवंत असलेला प्रत्येकजण, जो मजवर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही,” असे म्हणून देवाने त्याला मृत्युवर देखील वर्चस्व दिले असल्याची तो मार्थाला आठवण करून देतो.
तेव्हा हयात असलेले विश्वासू लोक कधीच मरणार नाहीत असे येशू मार्थाला तेथे सुचवत नाही. तर त्याच्यावर विश्वास ठेवल्याने सार्वकालिक जीवन मिळेल असा मुद्दा तो मांडत आहे. बहुतेक लोकांना शेवटल्या दिवशी पुनरुत्थान मिळाल्यामुळे अशा जीवनाचा आनंद लुटता येईल. पण इतर विश्वासू लोक पृथ्वीवरील या व्यवस्थेच्या अंतामधून वाचतील व त्यांच्या बाबतीत येशूचे हे शब्द अगदी अक्षरशः खरे होतील. ते कधीच मरणार नाहीत! या असामान्य विधानानंतर येशू मार्थेला विचारतोः “हे तू खरे मानतेस काय?”
ती उत्तर देतेः “होय प्रभुजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र, ख्रिस्त, आपणच आहा असा मी विश्वास धरला आहे.”
मग मार्था आपल्या बहिणीला बोलावण्यासाठी घाईने परत येते व खाजगीत तिला सांगतेः “गुरुजी आले आहेत व ते तुला बोलावीत आहेत.” तात्काळ मरीया घरातून जाते. तिला जाताना पाहून, ती कबरेकडे जात आहे असे समजून, बाकीचे लोक तिच्यामागे जातात.
येशूकडे आल्यावर मरीया रडत त्याच्या पाया पडते. ती म्हणतेः “प्रभुजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.” मरीया व तिच्यामागून येणाऱ्या लोकांच्या समुदायाला रडताना पाहून येशूला गलबलून येते. तो विचारतोः “तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे?”
ते म्हणतातः “प्रभुजी, येऊन पाहा.”
येशूही रडतो. त्यामुळे यहुदी म्हणतातः “पहा, ह्याचे त्याच्यावर कितीतरी प्रेम होते!”
काही महिन्यांपूर्वी, मंडपांच्या सणाच्या वेळी, येशूने एका जन्मांध माणसाला बरे केले होते याची काही लोकांना आठवण होते. ते विचारतातः “ज्याने अंधळ्याचे डोळे उघडले, त्याला ह्याचे मरण टाळण्याचीही शक्ती नव्हती काय?” योहान ५:२१; ६:४०; ९:१-७; ११:१७-३७.
▪ येशू शेवटी बेथानीजवळ कधी येतो व तेथे कशी परिस्थिती असते?
▪ पुनरुत्थानावर विश्वास ठेवण्यासाठी मार्थाजवळ काय आधार असतो?
▪ लाजराच्या मृत्युचा येशूवर कसा परिणाम होतो?