पिलाताकडून हेरोदाकडे आणि परत पिलाताकडे
अध्याय १२२
पिलाताकडून हेरोदाकडे आणि परत पिलाताकडे
आपण राजे आहोत हे पिलातापासून लपवण्याचा येशू कोणताही प्रयत्न करीत नसला तरी त्याच्या राज्यापासून रोमला धोका नसल्याचा तो खुलासा करतो. येशू म्हणतोः “माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य ह्या जगाचे असते तर मी यहूद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु आता माझे राज्य येथले नाही.” अशाप्रकारे, त्या राज्याचा उगम पृथ्वीवरील नसला तरी त्याचे एक राज्य आहे अशी येशू तीनदा कबुली देतो.
तरीही पिलात त्याला पुन्हा खोदून विचारतोः “तर तू राजा आहेस काय?” याचा अर्थ, तुझे राज्य या जगाचे नसले तरी तू राजा आहेस का?
पिलाताने योग्य अनुमान काढल्याचे येशू त्याला सांगतो. तो म्हणतोः “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे व यासाठी जगात आलो आहे की, मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.”
होय, येशूच्या पृथ्वीवरील अस्तित्वाचा हेतूच “सत्या”बद्दल साक्ष देण्याचा आहे. विशेषतः राज्यासंबंधीच्या सत्याबद्दल. त्यासाठी त्याला आपला जीवही गमवावा लागला तरी त्या सत्याशी एकनिष्ठ राहण्याची येशूची तयारी आहे. “सत्य काय आहे?” असे पिलात विचारतो, पण तो पुढील खुलाशासाठी थांबत नाही. त्याने ऐकले आहे ते न्याय करण्यास पुरेसे आहे.
वाड्याबाहेर थांबलेल्या जमावाकडे पिलात परत येतो. “ह्याच्याठायी मला काही अपराध दिसत नाही,” असे तो मुख्य याजक आणि त्याच्या बरोबर असलेल्या लोकांना सांगतो तेव्हा त्याच्याबरोबर येशूही आहे हे उघड आहे.
त्या निर्णयाने संतापून जमाव ठासून सांगू लागतोः “ह्याने गालीलापासून आरंभ करून येथपर्यंत साऱ्या यहूदीयात शिक्षण देऊन लोकांना चिथविले आहे.”
यहूद्यांच्या या हटवादी धर्मवेडाचे पिलाताला नक्कीच आश्चर्य वाटले असणार. यामुळे, मुख्य याजक आणि वडील मंडळी आरडाओरड करीत असताना पिलात येशूकडे वळतो व विचारतोः “हे तुझ्याविरुद्ध किती गोष्टींबद्दल साक्ष देतात, हे तुला ऐकू येत नाही काय?” तरीही येशू उत्तर देण्याचा कोणताही प्रयत्न करीत नाही. या बेताल दोषारोपाला तोंड देतानाही स्तब्ध राहिलेल्या येशूकडे पाहून पिलाताला आश्चर्य वाटते.
येशू गालीली आहे असे समजते तेव्हा आपल्या जबाबदारीतून मोकळे होण्याचा एक मार्ग पिलाताला दिसतो. गालीलचा राजा, हेरोद अंतिपा [येशूच्या जन्माच्या वेळी यहूदीयात राज्य करीत असलेल्या हेरोदाचा मुलगा] वल्हांडण सणासाठी यरुशलेमात आलेला आहे. तेव्हा, पिलात येशूला त्याच्याकडे पाठवतो. मागे हेरोद अंतिपाने बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचा शिरच्छेद केलेला होता आणि येशू करीत असलेल्या चमत्कारांबद्दल त्याने ऐकल्यावर येशू म्हणजे मृतातून उठवलेला योहानच आहे अशा धास्तीने घाबरून गेला होता.
आता येशूला पाहण्याच्या शक्यतेने हेरोदाला अत्यानंद होतो. त्याला येशूच्या कल्याणाची काळजी आहे किंवा येशूविरुद्ध केलेले आरोप खरे आहेत किंवा नाही हे त्याला जाणून घ्यायचे आहे असे नाही; तर त्याला नुसते कुतुहल आहे आणि येशू काही चमत्कार करून दाखवील तर ते पाहण्याची त्याला आशा आहे.
येशू मात्र हेरोदाच्या कुतुहलाचे समाधान करण्यास नकार देतो. इतकेच नव्हे तर हेरोद त्याला प्रश्न विचारतो तेव्हा तो एकही अक्षर बोलत नाही. अपेक्षाभंग झाल्याने हेरोद आणि त्याचे शिपाई येशूची टर उडवतात. ते त्याला झगझगीत वस्त्रे घालतात व त्याचा उपहास करतात. त्यानंतर ते त्याला पिलाताकडे परत पाठवतात. परिणामी, पूर्वी वैरी असलेले हेरोद आणि पिलात यांची चांगली मैत्री जुळते.
येशू परतल्यावर पिलात मुख्य याजक, यहूद्यांचे अधिकारी आणि लोक या सर्वांना एकत्र बोलावतो आणि म्हणतोः “हा मनुष्य लोकांस फितवणारा म्हणून ह्याला तुम्ही माझ्याकडे आणले. आणि पहा, ज्या गोष्टींचा आरोप तुम्ही ह्याच्यावर ठेवता त्यासंबंधी मी तुमच्या समक्ष ह्याची चौकशी केल्यावर मला ह्या मनुष्याकडे काहीही दोष सापडला नाही. हेरोदालाही सापडला नाही. कारण त्याने त्याला आमच्याकडे परत पाठविले आहे. आणि पहा, ह्याने मरणदंड भोगण्यासारखे काही केलेले नाही. म्हणून मी ह्याला फटके मारून सोडून देतो.”
अशा रितीने पिलाताने येशूला दोनदा निर्दोष ठरवले आहे. येशूला मोकळे करण्यास तो फार उत्सुक आहे कारण केवळ द्वेषाने याजकांनी त्याला त्याच्या हवाली केलेले आहे हे पिलाताच्या लक्षात येते. येशूला सोडून देण्याचा प्रयत्न पिलात करीत असताना तसे करण्यास त्याला एक आणखी सबळ कारण मिळते. तो न्यायासनावर बसला असताना त्याची पत्नी निरोप पाठवते आणि “त्या नीतीमान मनुष्याच्या बाबीत आपण पडू नये. कारण आज स्वप्नात [नक्कीच ईश्वरी उगमाकडून] त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या,” असा आग्रह ती त्याला करते.
पिलाताला माहीत आहे की, त्याने येशूला सोडले पाहिजे. पण या निरपराध माणसाला तो कसा सोडू शकेल? योहान १८:३६-३८; लूक २३:४-१६; मत्तय २७:१२-१४, १८, १९; १४:१, २; मार्क १५:२-५.
▪ आपल्या राज्यपदासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना येशू कसे उत्तर देतो?
▪ ज्याविषयी साक्ष देण्यात येशूने आपले पृथ्वीवरील आयुष्य घालवले ते “सत्य” कोणते?
▪ पिलाताचा निर्णय काय आहे, त्यावर लोक कशी प्रतिक्रिया दाखवतात आणि पिलात येशूचे काय करतो?
▪ हेरोद अंतिपा कोण आहे, येशूला पाहून त्याला अत्यानंद का होतो व तो येशूला काय करतो?
▪ पिलात येशूला सोडण्यास अतिशय उत्सुक का आहे?