पाठ २३
इस्राएली लोकांनी यहोवाला वचन दिलं
मिसर सोडून जवळपास दोन महिने झाल्यानंतर, इस्राएली लोक सीनाय डोंगराजवळ येऊन पोचले. तिथे ते तंबू बांधून राहू लागले. यहोवाने मोशेला डोंगरावर बोलवलं आणि त्याला म्हटलं: ‘मी इस्राएली लोकांना वाचवलं आहे. जर त्यांनी माझं ऐकलं आणि माझे नियम पाळले, तर ते माझे खास लोक होतील.’ मोशे डोंगरावरून खाली उतरला. यहोवाने त्याला जे सांगितलं होतं, ते त्याने इस्राएली लोकांना कळवलं. यावर इस्राएली लोकांनी काय म्हटलं? त्यांनी असं उत्तर दिलं: ‘यहोवा आम्हाला जे काही सांगेल, ते सर्व आम्ही करू.’
मोशे परत डोंगरावर गेला. तिथे पोचल्यावर यहोवाने त्याला म्हटलं: ‘तीन दिवसांच्या आत मी तुझ्याशी बोलेन. लोकांना बजावून सांग, की त्यांनी सीनाय डोंगरावर येण्याचा प्रयत्न करू नये.’ मोशे खाली आला. त्याने लोकांना सांगितलं, की यहोवा जे बोलणार आहे ते ऐकण्यासाठी त्यांनी तयार राहावं.
तिसऱ्या दिवशी इस्राएली लोकांनी डोंगरावर एक काळा ढग आणि विजा चमकत असल्याचं पाहिलं. त्यांना ढगांचा गडगडाट आणि कर्ण्याचाही आवाज ऐकू आला. तेव्हा यहोवा आगीच्या रूपात डोंगरावर उतरला. हे पाहून इस्राएली लोक खूप घाबरले. ते थरथर कापू लागले. डोंगर जोर-जोरात हालू लागला आणि संपूर्ण डोंगरावर धूर पसरला. त्या कर्ण्याचा आवाज आणखीनच वाढत गेला. यानंतर यहोवाने असं म्हटलं: ‘मी यहोवा आहे. तुम्ही फक्त माझीच उपासना केली पाहिजे. मला सोडून तुम्ही इतर कोणत्याही देवी-देवतांची उपासना करू नका.’
मोशे परत डोंगरावर गेला. या वेळी यहोवाने त्याला लोकांसाठी नियम दिले. लोकांनी यहोवाची उपासना कशी करावी आणि कसं वागावं, याबद्दल ते नियम होते. मोशेने ते नियम लिहून घेतले आणि इस्राएली लोकांना वाचून दाखवले. ते ऐकल्यावर त्यांनी देवाला असं वचन दिलं: ‘यहोवाने आम्हाला जे काही सांगितलं आहे, ते सर्व आम्ही करू.’ इस्राएली लोकांनी यहोवाला वचन तर दिलं, पण त्यांनी ते पाळलं का?
“तू आपला देव यहोवा याच्यावर आपल्या पूर्ण मनाने आणि आपल्या पूर्ण जिवाने आणि आपल्या पूर्ण बुद्धीने प्रेम कर.”—मत्तय २२:३७