पाठ २२
लाल समुद्राजवळ चमत्कार
इस्राएली लोक मिसर सोडून गेले आहेत हे समजल्यावर, फारोने लगेच आपलं मन बदललं. त्याने आपल्या सैनिकांना हुकूम दिला: ‘माझे लढाईचे सर्व रथ तयार करा. चला आपण त्यांचा पाठलाग करू! आपण त्यांना उगाचंच जाऊ दिलं.’ मग तो आणि त्याची माणसं, इस्राएली लोकांचा पाठलाग करू लागले.
इथे यहोवा त्याच्या लोकांचं मार्गदर्शन करत होता. यासाठी त्याने दिवसा ढगाचा आणि रात्री आगीचा वापर केला. त्याने त्याच्या लोकांना लाल समुद्रापर्यंत आणलं. याला तांबडा समुद्र असंसुद्धा म्हटलं जातं. तिथे त्याने लोकांना तंबू बांधून राहायला सांगितलं.
फारोची सेना आपला पाठलाग करत आहे, हे इस्राएली लोकांनी पाहिलं. आता ते अडकले होते. एकीकडे समुद्र तर दुसरीकडे मिसरची सेना होती. ते रडून मोशेला म्हणू लागले: ‘आता आपण सर्व मरणार! तू आम्हाला मिसरमध्येच राहू द्यायला हवं होतं.’ पण, मोशे म्हणाला: ‘घाबरू नका! आपआपल्या जागेवर शांत उभे राहा. यहोवा कशा प्रकारे आपल्याला वाचवतो ते पाहा.’ खरंच मोशेला यहोवावर खूप भरवसा होता, नाही का?
यहोवाने मोशेला सांगितलं, की लोकांनी तंबू काढून निघण्याची तयारी करावी. त्या रात्री यहोवाने ढगाची जागा बदलली आणि तो ढग इस्राएली आणि मिसरच्या लोकांच्या मधोमध आणला. यामुळे, मिसरच्या लोकांच्या बाजूला अंधार पडला. पण, इस्राएली लोकांच्या बाजूला उजेड होता.
यहोवाने मोशेला त्याचा हात समुद्राच्या दिशेने उचलायला सांगितला. त्यानंतर यहोवाने संपूर्ण रात्र जोराचा वारा वाहायला लावला. आणि काय आश्चर्य, समुद्राचे दोन भाग झाले! आणि त्याच्या मधोमध चालत जाण्यासाठी रस्ता तयार झाला. लाखो इस्राएली लोक कोरड्या जमिनीवरून चालत गेले. त्यांच्या दोन्ही बाजूला पाण्याच्या मोठमोठ्या भिंती होत्या.
फारोच्या सैन्याने समुद्राच्या कोरड्या जमिनीवरून इस्राएली लोकांचा पाठलाग केला. मग यहोवाने सैनिकांना गोंधळात टाकलं. त्यांच्या रथांची चाकं निघू लागली. मग ते सैनिक घाबरून ओरडू लागले: ‘चला पळून जाऊ या! यहोवा त्यांच्या बाजूने लढत आहे.’
यहोवाने मोशेला म्हटलं: ‘तुझा हात समुद्राच्या दिशेने वर उचल.’ त्याने तसं करताच, पाण्याच्या भिंती मिसरच्या सैनिकांवर कोसळल्या. फारो आणि त्याचे सर्व सैनिक मेले. त्यांच्यातला एकही वाचला नाही!
समुद्राच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या लाखो लोकांनी देवाच्या स्तुतीसाठी असं गीत गायलं: “मी परमेश्वराला गीत गाईन कारण त्याने महान कृत्ये केली आहेत; घोडा व स्वार यांना त्याने समुद्रात फेकून दिले आहे.” लोक गीत गात असताना, स्त्रिया डफ वाजवत होत्या आणि नाचत होत्या. सगळे लोक खूप-खूप खूश होते. कारण आता ते खरोखर मुक्त झाले होते.
“म्हणूनच, आपण धैर्याने असे म्हणू शकतो: ‘यहोवा मला साहाय्य करतो; मी भिणार नाही. माणूस माझं काय करणार?’” —इब्री लोकांना १३:६