पाठ १७
मोशे यहोवाची उपासना करण्याचं निवडतो
मिसरमध्ये याकोबच्या कुटुंबाला इस्राएली लोक म्हणून ओळखलं जाऊ लागलं. काही काळाने याकोब आणि योसेफचा मृत्यू झाला. त्यानंतर एक नवीन फारो राज्य करू लागला. इस्राएली लोक मिसरच्या लोकांपेक्षा जास्त शक्तिशाली बनत आहेत, याची त्याला भीती वाटू लागली. त्यामुळे त्या फारोने इस्राएली लोकांना गुलाम बनवलं. तो त्यांच्याकडून खूप कष्टाची कामं करून घ्यायचा. जसं की, विटा बनवणं आणि शेतात काम करणं. पण मिसरचे लोक त्यांच्यावर जितकी जास्त कष्टाची कामं टाकायचे, तितकीच जास्त त्यांची संख्या वाढत गेली. ही गोष्ट फारोला आवडली नाही. म्हणून त्याने असा हुकूम दिला, की इस्राएली लोकांच्या घरी मुलगा जन्माला आला, तर त्याला लगेच मारून टाकायचं. या परिस्थितीत इस्राएली लोक खरंच खूप घाबरले असतील, हो ना?
योखबेद नावाच्या एका इस्राएली स्त्रीला एक सुंदर मुलगा झाला. त्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी, तिने त्याला एका टोपलीत ठेवून नाईल नदीतल्या गवतामध्ये लपवलं. आता पुढे काय होईल, हे पाहण्यासाठी त्या बाळाची बहीण मिर्याम, जवळच लपून राहिली.
मग फारोची मुलगी नदीवर आंघोळीसाठी आली. तेव्हा तिची नजर त्या टोपलीवर पडली. उघडून बघते तर काय,
त्यात एक बाळ रडत होतं. तिला त्याची खूप दया आली. मग मिर्यामने पुढे येऊन विचारलं: ‘तुमच्यासाठी बाळाला दूध पाजेल, अशी एखादी स्त्री शोधून आणू का?’ फारोच्या मुलीने हो म्हटल्यावर मिर्याम आपल्याच आईला, म्हणजे योखबेदला घेऊन आली. फारोची मुलगी तिला म्हणाली: ‘या बाळाला ने आणि माझ्यासाठी याला दूध पाज. याचे मी तुला पैसे देईन.’जेव्हा ते बाळ मोठं झालं, तेव्हा योखबेद त्याला फारोच्या मुलीकडे घेऊन आली. फारोच्या मुलीने त्याचं नाव मोशे ठेवलं आणि आपला मुलगा म्हणून त्याला वाढवलं. मोशे राजकुमार म्हणून वाढला. त्याला जे काही हवं होतं, ते तो मिळवू शकत होता. असं असलं तरी, मोशे यहोवाला विसरला नाही. तो मिसरचा नसून एक इस्राएली आहे, हे त्याने नेहमी लक्षात ठेवलं. म्हणूनच त्याने यहोवाची उपासना करण्याचं निवडलं.
मोशे ४० वर्षांचा झाला, तेव्हा त्याने आपल्या लोकांची मदत करण्याचं ठरवलं. एक दिवशी मिसरचा माणूस इस्राएली गुलामाला मारत आहे, हे त्याने पाहिलं. त्याला खूप राग आला. त्यामुळे त्याने त्या मिसरच्या माणसाला इतक्या जोरात मारलं, की तो मरून गेला. मोशेने त्याचं शरीर वाळूत लपवलं. पण ही गोष्ट फारोला कळली आणि त्याने मोशेचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. पण मोशे तिथून पळून गेला आणि मिद्यान देशात पोचला. यहोवाने तिथे त्याला सांभाळलं.
“विश्वासानेच, मोशेने . . . स्वतःला फारोच्या मुलीचा मुलगा म्हणवून घेण्यास नकार दिला; . . . त्याने देवाच्या लोकांसोबत अत्याचार सहन करण्याचे निवडले.”—इब्री लोकांना ११:२४, २५